For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणूक आयोगाचा अनोखा ‘विक्रम’

06:06 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणूक आयोगाचा अनोखा ‘विक्रम’
Advertisement

भारताच्या लोकसभा निवडणूक इतिहासात कधी घडला नव्हता, असा विक्रम करण्याची सज्जता केंद्रीय निवडणूक आयोगाने केली आहे. मतदानपूर्व काळात मतदारांना विविध आमिषे देऊन, पैसे किंवा वस्तू वाटप करुन त्यांची मते खेचण्याचा राजकीय पक्षांचा खेळ हाणून पाडण्याची योजना करण्यात आली आहे.

Advertisement

2019 च्या लोकसभा निवडणूक काळात निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यापासून मतदान संपेपर्यंतच्या काळात निवडणुकीच्या संदर्भातील 3,475 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली होती. यंदा मतदानाचा प्रथम टप्पा पार करण्याच्या अगोदरच, अशा प्रकारचे 4,650 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम हस्तगत करण्यात आली आहे, अशी माहिती उपलब्ध करण्यात आली आहे.

Advertisement

अंमली पदार्थांचा सुळसुळाट

निवडणूक आयोगाने आतापर्यंत जप्त केलेल्या मालमत्तेपैकी 45 टक्के मालमत्ता अंमली पदार्थांच्या जप्तीतून मिळालेली आहे. अलिकडच्या काळात मते मिळविण्यासाठी मतदारांना नशा आणणारे पदार्थ देण्याचीही पद्धत निघाली आहे. पूर्वीच्या काळी पैसे वाटपावर समाधानी असणाऱ्या मतदारांपैकी किंवा कार्यकर्त्यांपैकी अनेकजण अंमली पदार्थांची अपेक्षा उमेदवारांकडून करु लागले आहेत. हा अतिशय धोकादायक कल असून त्यावर आघात करण्याचा निर्धार निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे अनेक संशयास्पद स्थानी छापे टाकून धडक कारवाई करण्यात आली आहे. अशी कारवाई निवडणूक आयोग मतगणना पूर्ण होईपर्यंत करत राहणार आहे. निवडणुकीत सर्व पक्षांना समान अवसर मिळावा. विशेषत: लहान आणि फारसे उत्पन्नाचे स्रोत नसणाऱ्या पक्षांना समान संधीचे वातावरण निर्माण करण्यासाठी व्यापक योजना सज्ज करण्यात आली आहे.

नेत्यांनाही सोडण्यात येणार नाही

मोठ्या नेत्यांची वाहने, वाहनताफे, हेलिकॉप्टर्स आणि विमानांची सातत्याने तपासणी करण्याची योजना आयोगाने तयार केली आहे. हेलिकॉप्टर्स आणि विमाने प्रचारासाठी राजकीय नेत्यांना पुरविणाऱ्या कंपन्यांना इशारे देण्यात आले आहेत. वाहने, विमाने आणि हेलिकॉप्टर्स यांच्यामधून पैसे, दारु किंवा अंमली पदार्थ यांची वाहतूक केली जाऊ नये, यासाठी आयोग अतिशय दक्ष आहे.

 विमानतळ, वाहनतळांवर देखरेख

आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय विमानतळ, जलमार्ग आणि वाहनमार्ग तसेच वाहनतळ यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. अंमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यांची जप्ती गेल्या काही महिन्यांमध्ये विमानतळांवर आणि जलमार्गावर झाली आहे. पाकिस्तानसारख्या शेजारी देशांमधून निवडणूक काळात भारतात अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणावर तस्करी केली जाते. कारण निवडणूक काळात या पदार्थांना मोठी मागणी असते. सर्वसामान्यांनाही आयोगाने अमिषांचे वाटप चाललेल्या स्थानांची माहिती देण्याचे आवाहन केले असून अमिषे न स्वीकारता स्वेच्छेने मतदान मतदारांनी केले तर ही अपप्रवृत्ती नष्ट होण्यास साहाय्य होईल, असे आयोगाने स्पष्ट केले असून तशी यंत्रणाही उपलब्ध केली आहे.

राहुल गांधींच्याहेलिकॉप्टरची तपासणी

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी राहुल गांधींच्या हेलिकॉप्टरची तपासणी केली आहे. तामिळनाडूतील नीलगीरी महाविद्यालयाच्या परिसरात हे हेलिकॉप्टर उतरले तेव्हा त्याची तपासणी करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या नव्या नियमांच्या अनुसार ही तपासणी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. राहुल गांधी येथून वायनाड या त्यांच्या मतदारसंघात जाणार होते. त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी झाल्यामुळे काँग्रेसने नाराजीचा सूर लावला आहे. निवडणूक आयोग पक्षपातीपणे विरोधकांशी वागत आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसने व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :

.