केंद्रीयमंत्री डॉ.चंद्रशेखर यांच्याकडून दाबोळीतील प्रकल्पांची पाहणी
प्रतिनिधी/ वास्को
केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री डॉ. पेम्मासनी चंद्रशेखर यांनी शनिवारी दाबोळी मतदारसंघातील विकास प्रकल्पांची पाहणी केली. दाबोळीत स्थानिक आमदार व राज्याचे मंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. दाबोळीतील विकास प्रकल्पांबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.
शनिवारी सकाळी दाबोळी विमानतळावरून दिल्लीला उ•ाण करण्यापूर्वी केंद्रीयमंत्री डॉ. चंद्रशेखर यांनी दाबोळी मतदारसंघाला भेट दिली. त्यांनी विविध प्रकल्पांची पाहणी केली. त्यांच्यासोबत मंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह चिखलीचे सरपंच कमलाप्रसाद यादव, उपसरपंच ऐश्वर्या कोरगावकर, शासकीय अधिकारी प्रसन्ना नाईक, इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत उभारण्यात आलेल्या चिखली येथील ‘व्हाव’ प्रकल्पाला प्रथम भेट दिली. त्यांनी या प्रकल्पाची प्रशंसा केली. हा प्रकल्प ‘ऑल ईन वन’ असा असून सुक्या व ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया, कचऱ्याचे विकेंद्रीकरण, गॅस निर्मिती, वीज निर्मिती, सांडपाणी प्रक्रिया व त्याचा वापर असे विविध उद्देश साध्य केले जात आहेत हे वैशिष्ट्या आहे. आंध्रप्रदेशमध्ये आपल्या क्षेत्रात असाच प्रकल्प उभारण्याचा आपला विचार असल्याचे ते म्हणाले.
महिलांच्या कौशल्याला संधी देण्यासाठी गोव्यात भव्य प्रदर्शन भरवणार
केंद्रीय राज्यमंत्री डॉ. चंद्रशेखर यांनी यावेळी दाबोळी मतदारसंघातील जॉगर्स पार्क, चिखली उपजिल्हा इस्पितळ व वाडे तलावाची पाहणी केली. चिखलीच्या हॉस्पिटलमधील स्थितीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. त्यानंतर डॉ. चंद्रशेखर यांनी मंत्री माविन गुदिन्हो यांच्या नवेवाडे येथील कार्यालयाला भेट दिली. स्थानिक स्वयं सहाय्य गटांच्या महिलांशी त्यांनी संवाद साधला. केंद्रीय मंत्र्यांनी महिलांचे कौशल्य व त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या. महिलांनी आपल्या उत्पादनांच्या विक्रीसंबंधी येणाऱ्या अडचणी मांडल्या. मंत्री माविन गुदिन्हो यांनी यावेळी विचार मांडले. केंद्रीयमंत्र्यांनी यावेळी बोलताना स्वयं सहाय्य गटांच्या माध्यमातून ग्रामीण समुदायांना सक्षम बनवण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी यावेळी ग्रामीण विकास मंत्रालयातर्फे गोव्यात एक मोठे प्रदर्शन आयोजित करण्याची योजना असल्याचे सांगितले. त्यामुळे स्वयं सहाय्य गटांच्या कौशल्याला वाव मिळेल. उत्पादनांचे प्रदर्शन मांडण्यासाठी योग्य व्यासपीठही उपलब्ध होईल असे ते म्हणाले. डॉ. चंद्रशेखर यांनी विकासाचे महत्त्व सांगून शाश्वत ग्रामीण विकासासाठी सतत पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.