युनियन जिमखाना बाद फेरीत दाखल
बेळगाव : कर्नाटक राज्य क्रिकेट संघटना धारवाड विभाग यांच्या मान्यतेने सुरू असलेल्या धारवाड विभागीय 14 वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब क्रिकेट स्पर्धेत युनियन जिमखाना मैदानावर झालेल्या सामन्यात कर्णधार मोहम्मद हमजाने शानदार नाबाद द्विशतकाच्या जोरावर जिमखाना संघाने चॅलेंजर्स क्रिकेट क्लब निपाणी संघाचा तब्बल 252 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना युनियन जिमखाना संघाने 50 षटकात चार बाद 356 धावा केल्या सलामीचा फलंदाज डावखुऱ्या मोहम्मद हमजाने चौफेर फटकेबाजी करताना 168 चेंडूत 36 चौकारांसह नाबाद 213 धावा झळकविल्या.
मोहम्मद हमजाचे हे द्विशतक विक्रमी ठरले आहे. शाहरुख धारवाडकरने तीन चौकारांसह 33, शिवकुमारने 26, साईराज पोरवालने पाच चौकारांसह 24 तर सार्थक मुरुडकर यांनी 19 धावा केल्या. चॅलेंजर्स क्रिकेट क्लबतर्फे अर्णव ए. एम.ने दोन गडी बाद केले. त्यानंतर चॅलेंजर्स क्रिकेट क्लब निपाणी संघाचा डाव 44.3 षटकात सर्व बाद 104 धावांत आटोपला. यात समर्थ के. ने पाच चौकार एक षटकारासह 32 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे कौस्तुभ पाटील व साईराज पोरवाल यांनी प्रत्येकी तीन मोहम्मद हमजाने दोन तर वीरेंद्र गोरखा व सुहास हिरेकोडी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला युनियन जिमखाना संघाचा हा सलग तिसरा विजय होता या विजयासह त्यांनी या स्पर्धेत बाद फेरीत प्रवेश मिळविला आहे.