संघ नेहमीच आरक्षणाच्या बाजूने : भागवत
विरोधी पक्षांच्या आरोपांदरम्यान सरसंघचालकांचा स्पष्ट संदेश
वृत्तसंस्था/ हैदराबाद
आरक्षण संपविण्याचा कट असल्याच्या आरोपांदरम्यान सरसंघचालक मोहन भागवत यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. संघ परिवाराने कधीच कुठल्याही खास समुहांना देण्यात येणाऱ्या आरक्षणाला विरोध केलेला नाही. जोपर्यंत गरज असेल तोपर्यंत आरक्षण जारी ठेवले जावे असे संघाचे मानणे आहे असे भागवत यांनी हैदराबाद येथील एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे. मोदी सरकार तिसऱ्या कार्यकाळात आरक्षण संपुष्टात आणणार असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने केला जात आहे.
आरक्षण आणि संघावरून फेक व्हिडिओ फैलावले जात आहेत. संघाविषयी पूर्णपणे खोटे दावे केले जात आहेत. संघपरिवाराने काही समुहांना आरक्षण देण्यास कधीच विरोध केलेला नाही. जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत आरक्षण दिले जावे असे संघाचे मानणे असल्याचा स्पष्ट संदेश भागवत यांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात दिला आहे. तर भागवत यांनी मागील वर्षी नागपूर येथे बोलताना समाजात भेदभाव असेपर्यंत आरक्षण दिले जावे, भेदभाव दिसत नसला तरीही तो समाजात व्याप्त असल्याचे म्हटले होते.
400 पारचे लक्ष्य
2014 च्या लोकसभा निवडणुकीत 282 तर 2019 च्या निवडणुकीत 303 जागा जिंकल्यावर भाजप यंदाच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा बहुमत प्राप्त करण्याचे लक्ष्य बाळगून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यंदाच्या निवडणुकीत केवळ भाजपसाठी 370 हून अधिक जागा तर रालोआसाठी 400 हून अधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे.
राहुल गांधींचा आरोप
भाजपच्या अनेक नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीयांनी केलेली वक्तव्यं पाहता त्यांचा उद्देश घटनेत बदल करणे आहे. देशाच्या लोकशाहीला नष्ट करून दलित, मागास, आदिवासींचे आरक्षण काढून घेत त्यांची भागीदारी संपविण्याचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. राज्यघटना आणि आरक्षणाच्या रक्षणासाठी काँग्रेस ठामपणे भाजपच्या मार्गात उभा आहे. काँग्रेस असेपर्यंत वंचितांकडून त्यांचे आरक्षण जगातील कुठलीच शक्ती हिरावून घेऊ शकत नाही असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी काँग्रेसच अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती आणि ओबीसींचे आरक्षण मुस्लीम समुदायाला देऊ इच्छित असल्याचा आरोप केला आहे.