कॅबसह सिटी टॅक्सींचे एकसमान भाडे निश्चित
परिवहन विभागाकडून अधिसूचना जारी : नागरिकांची होणारी आर्थिक लूट थांबणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
पीक अव्हर्समध्ये दर वाढवून नागरिकांची आर्थिक लूट करत असलेल्या अॅप-आधारित पॅब अॅग्रीगेटर असलेल्या ओला, उबर, रॅपिड आणि सिटी टॅक्सींचे राज्य सरकारने प्रवासी आणि मालवाहतुकीचे एकसमान भाडे निश्चित केले आहे. परिवहन विभागाने जारी केलेल्या या नवीन आदेशामुळे राज्यभरातील अॅप्लिकेशन आधारित कॅब अॅग्रीगेटर आणि सिटी टॅक्सींचे सुधारित भाडे तात्काळ लागू होणार आहे. याबाबत परिवहन विभागाने अधिसूचना जारी केली आहे.
यापूर्वी दोन श्रेणीतील टॅक्सींचे भाडे वेगवेगळे होते. नवीन भाड्यानुसार, वाहनाच्या किमतीप्रमाणे पॅबचे तीन श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. 10 लाख रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या वाहनांसाठी चार किमीपर्यंत किमान भाडे 100 रुपये निश्चित करण्यात आले आहेत. 4 कि.मी नंतर प्रतिकिमीसाठी 24 रुपये असे भाडे निश्चित केले आहे. 10 लाख ते 15 लाख ऊपयांच्या दरम्यानच्या वाहनांसाठी किमान भाडे 115 रुपये आहे. 4 कि.मी. नंतर प्रति 1 किमीसाठी 28 रु. भाडे असणार आहे.
15 लाखांपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांसाठी 130 भाडे निश्चित केले आहे. तर 4 कि.मी नंतरच्या प्रति 1 कि.मीसाठी 32 रुपये भाडे आकारले जाणार आहे. 120 किलोपर्यंतच्या वैयक्तिक साहित्यासाठी सूट मिळणार आहे. पहिल्या 5 मिनिटांच्या प्रतीक्षेसाठी कोणतेही शुल्क नाही. प्रवाशांकडून जीएसटी, टोलवसुली करण्याची मुभा देण्यात आली आहे. सकाळी 6 वाजेपर्यंत चालणाऱ्या टॅक्सींसाठी 10 टक्के अतिरिक्त भाडे आकारण्याचीही मुभा दिली आहे.