For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुळेभावीत विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू

11:02 PM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुळेभावीत विजेच्या धक्क्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू
Advertisement

मंदिराचे शटर बंद करताना घडली दुर्घटना

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

महिला स्व-साहाय्य संघाची बैठक आटोपून मंदिराचे शटर बंद करताना विजेचा धक्का बसून दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुळेभावी, ता. बेळगाव येथे ही घटना घडली असून सारा गाव पहिल्या श्रावण सोमवारच्या भक्तीत दंग असताना घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement

कलावती मारुती बिदरवाडी (वय 37) व सविता फकिराप्पा वंटी (वय 36) दोघेही राहणार सुळेभावी अशी दुर्दैवी महिलांची नावे आहेत. सोमवारी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून घटनेची माहिती समजताच मारिहाळचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ नायक व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या बेळगाव दौऱ्यावर असताना ही घटना घडली आहे.

कलावती व सविता या धर्मस्थळ स्व-साहाय्य संघाच्या सदस्या होत्या. सोमवारी गावातील श्री महर्षि वाल्मिकी मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठक आटोपल्यानंतर पहिला श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिराची साफसफाई करण्यात आली. शेवटी मंदिराचे शटर बंद करताना विजेचा धक्का बसून ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सुरुवातीला एका महिलेला विजेचा धक्का बसला. तिला सोडवताना दुसऱ्या महिलेलाही धक्का बसला. या दोघी जणींना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलवण्यात आले. त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. मंदिराची साफसफाई करताना वीजतार तुटून लोखंडी शटरवर पडल्यामुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

कलावती यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, दोन मुली तर सविता यांच्या पश्चात पती, एक मुलगा, तीन मुली असा परिवार आहे. विजेचा धक्का बसून दोन महिलांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. कलावती यांचे पती मारुती यांनाही विजेचा धक्का बसल्याची माहिती मिळाली आहे.

दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी

कलावती व सविता या सुळेभावी येथील जागृत श्री महालक्ष्मी मंदिरासमोर नारळ व पूजा साहित्य विक्री करीत होत्या. त्यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर आघात झाला आहे. सरकारने या दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना भरपाई द्यावी, अशी मागणी ग्राम पंचायतीचे सदस्य प्रभू खवाशी यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत यासंबंधी मारिहाळ पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

कुटुंबीयांना महिला व बालकल्याण खात्याकडून मदत देणार

सुळेभावी येथील दुर्घटनेची माहिती समजताच महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दु:ख व्यक्त केले आहे. दोन्ही महिलांच्या कुटुंबीयांना महिला व बालकल्याण खात्याकडून मदत देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.