तिळारीतील तडीस न गेलेला हत्ती ग्राम प्रकल्प
गेल्या दोन दशकांपासून कर्नाटक राज्यातून अन्न, पाण्याच्या शोधार्थ स्थलांतर केलेल्या हत्तींसाठी महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने सहय़ाद्रीच्या पर्वतरांगात विसावलेल्या तिळारीत हत्ती ग्राम निर्माण करण्याची घोषणा केली होती. बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम यांनी तिळारी धरणाचा जलाशय आणि परिसरातल्या वनक्षेत्राला हत्ती ग्रामचा दर्जा लाभावा या मागणी संदर्भातला प्रस्ताव जुलै 2008 मध्ये तत्कालीन वनमंत्री बबनराव पाचपुते यांची विशेष भेट घेऊन, त्यांचा होकार मिळविला होता. वन्यजीव अभ्यासक आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माहितीपट निर्माते माईक पांडे यांनी हत्तीसाठी नैसर्गिक अधिवास म्हणून तिळारी खोऱयाच्या क्षमतेसंदर्भातले महत्त्व अधोरेखित केले होते परंतु हत्ती ग्रामचा हा प्रस्ताव काही आजतागायत पूर्ण होण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र वन खात्याने कोणतीच ठोस पावले उचलली नसल्याने सध्या हत्तींवर प्रतिकूल परिस्थितीला सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. नाही म्हणायला, शेवटी महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने जून 2020 मध्ये इथल्या सरकारी राखीव जंगल क्षेत्राला तिळारी संवर्धन क्षेत्र म्हणून अधिसूचित केले.
29.53 चौरस किलोमीटरच्या राखीव जंगलाला जो संवर्धन क्षेत्राचा दर्जा दिल्यानंतर त्याच्यासाठी प्रशिक्षित वन कर्मचारी, स्वतंत्र वन परिक्षेत्राधिकारी त्याचप्रमाणे आवश्यक साधनसुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न झालेले नसल्याने हे संवर्धन क्षेत्र कागदापुरतेच मर्यादित राहिलेले आहे. कोल्हापूर जिल्हय़ातल्या राधानगरी अभयारण्यापासून गोव्यातल्या म्हादई आणि कर्नाटकातल्या भीमगड अभयारण्यापर्यंतच्या 38 कि.मी. परिसरात जंगली श्वापदांच्या अस्तित्वाखातर पोषक परिस्थितीबरोबर विविध उपाययोजना करण्यात येतील, असा निसर्गप्रेमींना आशावाद होता परंतु कागदोपत्री संवर्धन क्षेत्राची अधिसूचना काढण्याशिवाय महाराष्ट्र सरकारच्या वन खात्याने रंगीत सूचना फलक लावून वन्यजीवांच्या संरक्षण आणि संवर्धनाकडे कानाडोळा आरंभलेला आहे. तिळारी संवर्धन क्षेत्राची अधिसूचना काढून दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्याच्या वाटेवर असताना वन खात्यामार्फत हत्ती, पट्टेरी वाघ, बिबटे यासारख्या जंगली श्वापदांच्या संवर्धन आणि संरक्षणाला प्राधान्य देण्याची घोषणा बुडबुडय़ासारखी ठरणार असल्याची चिन्हे स्पष्ट होऊ लागलेली आहे. कोल्हापूर वन क्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेन यांनी चंदगड तालुक्यात घाटकरवाडी येथे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्हय़ातल्या रानटी हत्तींसाठी ट्रान्जिट कॅम्प उभारण्याच्या प्रस्तावाचे सुतोवाच केले होते. एकेकाळी तीन डझनाच्या आसपास हत्तींनी महाराष्ट्रात स्थलांतर केले होते. त्यातले केवळ नऊच हत्ती शिल्लक राहिले असल्याचे सांगण्यात येत होते. सध्या तिळारी खोऱयातल्या केर, मोर्ले, घोटगेवाडी या परिसरात एका नर सुळेवाल्यासह मादी आणि तीन बछडे संचार करीत असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
केर गावातल्या देवराईत भेरली माड त्याचप्रमाणे अन्य पालापाचोळय़ासह देवतळीतल्या चिखलात आणि पाण्यात पोषक वातावरण असल्याने हत्तीच्या कुटुंबाला ही जागा भावली होती परंतु दरदिवशी दीडशे लिटरच्या आसपास पेयजल आणि दीडशे किलोग्रामचा पालापाचोळा, कंदमुळे यांची प्राप्ती होण्यास अडथळे निर्माण होत असल्याने, हे हत्तीचे कुटुंब केरहून अन्यत्र स्थलांतर करीत आहे. मोसमी फणसाबरोबर केळ, बांबू यासारख्या घटकांवरती हत्ती मनसोक्तपणे ताव मारत असताना, खाद्यान्नांसाठी सुरू असलेली धडपड या परिसरात पाहायला मिळत आहे. 2002 साली कर्नाटक राज्यातून मान-हुळंदमार्गे हत्ती पाटयेमार्गे तिळारी खोऱयात दाखल झाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने मागचा पुढचा विचार न करता हत्तींची पाठवणी करण्यासाठी कोटय़ावधी रुपयांचा चुराडा करून मोहीम राबविली परंतु अल्पकाळाचा विचार करून अंमलात आणण्याच्या अघोरी उपायांमुळे महाराष्ट्र सरकारने हत्तीचा फुटबॉल केला. सौर ऊर्जा कुंपण, मधमाशी पालन, फटाके लावणे, ढोल बडविण्याच्या उपद्व्यापांनी हत्ती आणि तिळारी खोऱयातल्या मानवातला संघर्ष काही कमी झाला नाही. मधमाशांचे पालन करण्यास पेटय़ांद्वारे मधनिर्मिती बरोबर हत्तींची समस्या निराकरण होईल, ही आशा मावळलेली आहे. हत्तींचे तिळारीत आगमन झाल्यानंतर इथले शेतकरी वायंगणी शेतीद्वारे भाताची पैदासी करायचे परंतु भाताबरोबर केळी, नारळ अशा बागायती पिकाला फस्त करण्याबरोबर हत्तींमार्फत नासधूस करण्याच्या प्रमाणाला आळा बसलेला नाही. त्यामुळे हत्तीसंदर्भातला जनप्रक्षोभ वाढत चाललेला आहे.
त्यामुळे महाराष्ट्राच्या वन खात्याने इथल्या मानवी समाजाला हत्तीसोबत जीवन जगण्यासाठी प्रशिक्षित करण्याची गरज आहे. हत्ती भात फस्त करीत असल्याने केर, मोर्ले परिसरातल्या शेतकऱयांनी वायंगणी शेतीची परंपरा खंडित केलेली आहे. एकेकाळी तिळारी खोऱयात नाचणी, कुळीथ, वरी, कांगो, राळो आदी पिकांचे मोसमानुसार उत्पन्न घेतले जायचे. हत्ती हे धान्य खात नसल्याने या पिकांच्या शेतीसाठी त्यांना राजी करण्याची गरज आहे. वायंगणी शेतीच्या जमिनीत चवळी, कुळीथ, उडीद, तीळासारख्या पिकांसाठी शेतकऱयांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तिळारी धरणाच्या जलाशयाच्या एकूण अस्तित्वालाच आव्हान देण्याचे असंख्य प्रताप इथे निर्धास्तपणे चालू आहेत. खडी क्रशर, चिरेखाणीसारख्या पर्यावरण विघातक व्यवसायांचे प्रस्थ निर्माण झालेले आहे. रबराच्या लागवडीबरोबर अननस आणि तत्सम पिकांची पैदासी करणाऱया मंडळींचा विळखा या जलाशयाला पडलेला आहे. तिळारीच्या जलाशयाला आव्हान देणाऱया संकटांचे निराकरण होण्याऐवजी जंगलतोड करून काजूसारख्या नगदी बागायती पिकाखाली डोंगर उतारांचे क्षेत्र येऊ लागलेले आहे. त्यामुळे माती, गाळाने धरणाची जलसंचय क्षमता कमी झालेली आहे.
या परिसरातल्या वर्तमान आणि भविष्याला सुरक्षित ठेवण्यासाठी तिळारी जलाशयाच्या राखीव वनक्षेत्रात हत्ती ग्राम निर्माण होणे महत्त्वाचे आहे. हत्तींना आवश्यक असणाऱया भेरली माड, कनक, चिवार, हुडेलसारख्या बांबूची लागवड करण्याबरोबर जंगली कर्दळीच्या प्रजातींना वाव देण्याची गरज आहे. हत्तींना आवडणारे गवत, तृणपाती निर्माण व्हावे म्हणून माळरानाचे, पठाराचे रक्षण महत्त्वाचे आहे. तिळारी संवर्धन राखीव क्षेत्रात हत्ती ग्रामाची संकल्पना मूर्त स्वरुपात यावी आणि हत्ती इथे निर्धोकपणे वावरतील, जलाशयात मनसोक्त पोहतील आणि पालापाचोळय़ासह अन्य खाद्यान्न खातील, यासाठी नैसर्गिक अधिवास सुरक्षित झाला पाहिजे. तिळारी संवर्धन राखीव क्षेत्रासाठी या परिसरातल्या स्थानिक पर्यावरण, वन्यजीवांविषयी अभिरुची असणाऱया तरुणांना योग्य प्रशिक्षण देऊन रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. पर्यावरणस्नेही पर्यटन प्रकल्पांचे नियोजनबद्ध जाळे विस्तारताना नियोजित हत्ती ग्रामसाठी प्रयत्न झाले पाहिजेत.
- राजेंद्र पां. केरकर