For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल..!

11:56 AM Oct 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
अंडरवर्ल्ड डॉनची हत्या होईल
Advertisement

सिद्धार्थ डोणे महाराज यांची भाकणूक : आप्पाचीवाडी-कुर्ली हालसिद्धनाथ यात्रेत भाविकांचा महापूर : मंदिर परिसरात भंडाऱ्याची उधळण, पालखी मिरवणूक

Advertisement

निपाणी : जगातल्या अंडरवर्ल्ड डॉनची हत्या गा होईल. टोळीयुद्ध होतील, बारा बाजार मोडून एक बाजार तयार होईल. ज्याच्या अंगी भक्ती तोच सुखात राहिलं, लाकूड सोन्याच होईल, लाकडाची डोरली येतील, चालत्या-बोलत्या मनुष्याचा प्राण जाईल. देशात समान नागरी कायदा येईल, महाराष्ट्र राज्यात नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल, नंदनवन होईल. हाय धर्माची गादी हाय, धर्माच्या गादीला तुम्ही रामराम करा. अतिरेकी लोक येतील, मोठा घोटाळा करतील, बॉम्बस्फोट होतील, दिल्लीच्या गादीला धक्का बसलं. दिल्ली शहराची मोठी हानी होईल. बारा कोसाला एक दिवा दिसेल, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ बंद पडलं, दुनिया कालवून जाईल. भारत-पाक सीमेवर रण घुमलं, आया-बहिणींची अब्रू लुटतील, मुस्लिम राष्ट्र उद्ध्वस्त होईल, जगाच्या नकाशातून पुसून जातील. वादळ, भुकंपानं देशाच्या संपत्तीच नुकसान होईल. कृष्णेच्या काठी नऊ लाख बांगड्या फुटतील, रक्ताचे पाट वाहतील, अशी हालसिद्धनाथांची भाकणूक सिद्धार्थ डोणे महाराज यांनी कथन केली.

कर्नाटक-महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीक्षेत्र आप्पाचीवाडी-कुर्ली येथील हालसिद्धनाथांच्या अश्विन यात्रेला 18 ऑक्टोबर रोजी उत्साहात सुऊवात झाली. नाथांची पहिली भाकणूक 21 रोजी पहाटे झाली. सिद्धार्थ डोणे महाराज यांनी नाथांच्या दरबारात येत्या काळातील होणाऱ्या बदलांचे भाकीत कथन केले. त्यात सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, देश-विदेश, अतिरेकी, हवामान, नैसर्गिक आपत्ती याबद्दल भाकीत केले. त्या भाकणुकीचा हा घोषवारा...

Advertisement

मेघयान मळा माझ्या आकाशाच्या फळा, अमृताच्या धारा. हाय मेघ उदंड हाय, बांधा आड बांध, शिवा आड शिव. मेघाची कावड गैरहंगामी पण उदंड हाय. मेघाच्या पोटी आजार हाय, द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय, लागलायं त्यो दुनिया न्याहाळू लागलायं. त्याच्या मागं अंधार, म्होरं अंधार पडलाया. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशातलं हाय, भोंबेच्या पुनवेला वाडीकुर्लीच्या खडकाच्या माळाला झेंडा मिरवलं, भोंबेच्या पुनवेला माझा सोहळा निघतोया, चिंचेच्या बनात मी खेळायला जातोया. कारीच्या माळाला माझी विश्रांती हाय, खडकाच्या माळाला भाषण चाललया, वाडीकुर्लीच्या खडकाच्या माळाला फार पूर्वी काळाला आशान टाकलंय, निशाण रोवलंय. पिंजऱ्यातील राघू भाषण करलं, चित्त देवाचं, पहिला मोगरा धोपून जाईल, दुसरा मोगरा मध्यम राहील, उड्डाण मारील. तिसरा मोगरा राज्य करील, तुम्ही बगाल अश्विनी, भरणी, कात्या, वॅढतिका, रोहिणी मृगाच्या बहिणी, सरती रोहिणी निघता मृग मिरवेल कुरी, मिरवेल कोकण बंधारी मिरवेल. बांधा आड बांध, शिवा आड शिव, रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा, साधलं तो सज्जन, हातात भाकरी, खांद्यावर चाबूक, साधलं तो सोबती. सरता मृग निघता आर्द्रा मध्यम फाट्याचा पेरा होईल. सरता आर्द्रा निघता तरणा, अलम दुनियेचा पेरा होईल, कुरी थाऱ्याला बसलं, रोहिणीची पेरणी त्याला हादक्याची पुरवणी क्हईल.

आप्पाचीवाडी-कुर्ली भूमिचा महिमा अगाध हाय

अगा येगा बाबा, डोण्या तू प्रधाना, अगा येगा बाबा धरतो हेगडी प्रधाना, जळा यान स्थळा, माझ्या पूर्वीच्या हेल्लाळा, जोती यान जोती डोंगराचा बालपणाचा सोबती, काढावी पोती काढावं काढावं पोती पुराण काढावं, वाचून दावावं सभेत बोलावं, खोटं तू बोलशील खरं मी करीन, शब्दा सादर राहीन, पेरलं ते उगवलं. शेवटाला लावीन, चालवीन क्रिया चालवीन डोण्याच्या बाळाची क्रिया चालवीन, वस घडवीन. कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय हाय, आप्पाचीवाडी-कुर्ली भूमिचा महिमा अगाध हाय, जगात झेंडा मिरवलं, भोगीच्या पुनवेला माझा सोहळा निघतोय, शेजारच्या बनात खेळायला जातोय. खडकाच्या माळाला माझी विश्रांती हाय.

वैरण काडीची चोरी मारी वाढत राहील

देवयान धान्य उदंड पिकलं, राजयान धान्य उदंड पिकलं. धारणं धुरणं जगाचे जगवनं. खळ्याच्या काठी 3 मापटी म्हणतील, 3 मापटी म्हणता शेरावर येईल. चढलं उतरलं, शेर म्हणता मापट्या चिपट्यावर येईल. खरीप भोरीप बहुत उदंड पिकलं, जमिनीतलं धान्य बहुत बेमानं राहील, तांबडी रास मध्यम पिकलं, मोलानं विकलं, काळी रास सुफळ जाईल, मूग कडधान्य तूर उदंड पिकलं. सर्वसामान्य माणूस खात राहील. दीड महिन्याचं धान्य येईल. पांढरी रास उदंड पिकलं, गोरगरिबाला पुरावा करील, तांबडी कळी मध्यम पिकलं. ती ताजव्यातून जोकलं, कागदातून विकलं, धान्य दारात, वैरण कोन्यात, वैरण सोन्याची होईल, सांभाळून ऱ्हावा, ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल, वैरण काडीची चोरी मारी वाढत राहील. कानानं ऐकाल, डोळ्यानं बघत राहशीला, सांभाळून ऱ्हावा. गक्हाची पेंडी मध्यम पिकलं. पिकलं ती बांध आड बांध शिवा आड शिव पिकलं.

आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी क्हईलं

शेतकरीवर्ग दिवस-रात्र कष्ट करल, कष्ट करून गुऱ्हढोर घेईल, घेऊन निगा करून धारदुबत डेरीला घाललं, डेरीचा मॅनेजर मलई खाईल, दूध घालणारा कर्जातच राहिल, गाई-म्हशींचा भाव गगनाला भिडेल. खडकाच्या माळाला 33 कोटी देवांचा दरबार भरलाया. कांबळ्याच्या खोळत मी फुले माळत बसलोया. बसलोया बसलोया मी पृथ्वीची घडामोड करत बसलोया, आप्पाचीवाडी तीर्थक्षेत्र प्रति शिर्डी क्हईल. तिऊपती बालाजीचा इथं अवतार हाय. आप्पाचीवाडी सोन्याची काडी, वाडीकुर्ली आगार इथं नाथांचा भरलाय नाथांचा दरबार. हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, हालसिद्धनाथांची पुण्यभूमी पवित्र राहील, महिमा जगात वाढत राहील. वाडीकुर्लीच्या पुजारी, मानकऱ्यासनी माझा आशीर्वाद हाय, वाडीकुर्लीच्या सबिन्यात फूट पाडशीला तर यमपुरी बघशीला.

मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल

12 वर्षांची मुलगी आई होईल, कानानं ऐकालं, डोळ्यानं बघशीला, उगवत्या सूर्याला संकट पडलया, भूमिमाता दुभंगून जाईल, भूमिमातेतून भोंग निघतील. माणसाच्या जीवाला हानी करतील, पारव फूल सुफळ जाईल, पिवळं फूल उदंड पिकलं, मोलानं विकल, पांढरं फूल मध्यम पिकलं, तांबडं फूल उदंड पिकलं, देवा धर्माला पुरावा करील, लुगडी घोंगडी कपडा, लत्ता माणसाला फुकाचा होईल. सरकी फुकाची, मेंढी मोलाची होईल, जग दुनियेत मोठं एक नवल होईल, मेंढीच्या पोटाला मुलगा जन्माला येईल, होईल त्याची कीर्ती होईल. आहे म्होरचं भविष्य आहे. मेंढीच्या मेंडक्याला माझा आशीर्वाद हाय. मेंढी माउली मेंडक्याची सुखाची सावली होईल. मेंढीच्या जीवावर मेंढका सुखी होईल. मेंढीबाईला कलम जडलं, मेंढीपासून वेगळी पैदास होईल, मेंढीचा भाव एक लाखाच्या घरात जाईल, मेंढीबाई सोन्यापेक्षा पिवळी होईल. मेंढीबाई पालखीतून मिरवलं, धनगराचं बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारलं. कळपातला बकरा कळपात लढलं, फुटेल मुढा फुटेल, कालवेल दुनिया कालवेल, कालवून जाईल, मायेचं लेकरू मायेला ओळखायचं नाही. गाईचं वासऊ गायीला भेटणार नाही. पडेल जग-दुनियेत अंधार पडंल.

राजकीय नेते कोलांटी उड्या मारतील

नऊ वर्षाची मुलगी भरतार मागलं, दागिने-पैसे माणसाला घातक ठरतील, घरातून गेलेला माणूस परत येईल म्हणून आशा धरू नकोसा, तांबडं धान्य मोलानं विकेल, सोनं काही वर्षानं फुकाचं होईल, चांदीचा भाव वाढत राहील, राजकारणात सट्टाबाजार चाललाया, राजकीय नेते सत्तासंपत्ती गोळा करतील, देशाचा बाजार मांडतील, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटी उड्या मारतील. तोंडघशी पडतील. पैसा न खाणारा मनुष्य देशात सापडणार नाही. स्त्रीवर्ग राजकारणात मोठी बाजी मारेलं, राजकीय नेत्यांची खुर्ची काढून घेतील, नोकरवर्ग समाज खाईल, बारा महिने लग्नकार्य चालतील. काँग्रेस पक्षात दोन पक्ष पडून झंझावात लागलं. पंच लोक दोन्हीकडील लाच खाऊन भांडणं लावतील. पैशाच्या जोरावर माणसाला न्याय मिळेल, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करतील.

कागदी घोडा माणसाला खुळ लावलं

घरातील लक्ष्मी दडून बसलीया, रानातील लक्ष्मी पळून खेळतीया, कोकण्यातील बसक्या सरहद्दीवर येईल, देशातील बसक्या सरहद्दीवर येईल. सरहद्दीवर दोघांची टक्कर लागेल. शेतासाठी देशात खून पडतील, कागदाचा घोडा माणसाला खूळ लावलं, काळी कांडी पोटाशी जतन करावी, एक औत चौघात होईल, बारा बैलाचा तिवडा रोवलाया, मदनातला बैल उफराटा फिराया लागलाया, बसक्याचं शिंगाट सोन्याचं होईल. बसक्या राजाची तुम्ही सेवा करावी, शर्यतीतील बसव्या शाप देईल, कुळंब्याच्या बाळाला विचार पडलाया, जग दुनियेत तीन राजे हायेत, एक राजा मेघराजा, दुसरा राजा बसक्याराजा, तिसरा राजा कुळंबीराजा, कुळंब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय.

करशिला चाकरी, तर खाशिला भाकरी

शिवाजी महाराजांचा जयजयकार करा, शिवाजी महाराज जन्माला येतील, भगवा झेंडा राज्य करील. सभेतून मिरवेल, एक तारणार कळप मारणार, कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार. ज्याच्या अंगी भक्ती तो चार दिवस सुखाचं खाणार, हालसिद्धनाथांची करशीला चाकरी तर खाशीला भाकरी, थराचा धोंडा थराला बसंल, नऊ पृथ्वी दहा खंड काशीबरोबर हाय, दहाक्या काशीत माझं दप्तर हाय, करवीर काशीत माझा ठिकाणा हाय, आहे ही गोसाक्याची पांढरी आहे, गोसाक्याच्या पांढरीत तुम्ही एकीनं वागावं, वागू नये गर्वाने वागू नये. गर्वाने वागशीला तर फसून जाशीला, गर्वाचे घर खाली हाय. मी थोरला, तू थोरला म्हणू नकोसा, लहानाचा मोठा, मोठ्याचा लहान होईल, हाय की हाय हा विषाचा पेला हाय ह्यो खैराचा इंगोळ हाय, वाडीकुर्लीच्या बाळांनो एकीने वागा. करशीला सेवा तर खाशीला मेवा, तुमचे दु:ख माझ्या पायाशी घेऊन, माझ्या झोळीतली रिद्धीसिद्धीr तुम्हाला देईन, पोटाशी धरीन, जतन करीन, करीन पांढरीची राखण करीन.

लाकूड सोन्याचं होईल, ताजक्यातन विकलं

वांग्याच्या झाडाला शिडी लावशीला, चालता-बोलता माणसाचा प्राण जाईल, उशाची भाकर उशालाच राहील, माझं माझं म्हणू नका हे भरांतीचं ओझं हाय, पाण्याचा बुडबुडा हाय, पाण्याचा कप विकत मिळलं, पाळी लागलं, जाळ-ताप-किरम-खोकला आजार वाढल्यात, लाकूड सोन्याचं होईल. ताजक्यातन विकलं. लाकडाची डोरली येतील, गाई-म्हशीला तुम्ही गहू घालशीला, रेड्यापाड्याला तुम्ही पंद घालशीला, धर्माचं पारडं वर हाय, गंमत बघतयं, कर्माचं पारडं खेळ करतया, आपली जागा शेवटी साडेतीन हात हाय, पाची बोटांनी माणसानं धर्म करावा, उंदराला भिशीला खरं वाघाला भिणार नाहीसा, खडा थोडा पर घोडा जास्त सुटलं. चैत्राच्या महिन्यात गायत्री माळाला जातीला, एक ऊपयं गाडीचं चकार होईल, च्या-च्या, म्या-म्या करशीला, येईल कापाकापी, लपाछपी येईल.

दोऱ्याच्या आधारे डोंगर तरलाया

भाऊ-बहिणीचं प्रेमप्रकरण चालेल, प्रेमप्रकरणातून लग्नकार्य होईल. भाऊ-बहिणीच्या नात्याला कलंक लागेल, काळिमा फासलं, भावाला बहीण ओळखना झालीया. सासऱ्याला सून ओळखना झालीया, जगात डोंगराएवढं पाप, दोऱ्याएवढं पुण्य राहीलंया, दोऱ्याच्या आधारे डोंगर तरलाया, विचार करावा, शेषाच्या फडीवर ही धरणीमाता हाय, धरणीमाता डळमळू लागलीया. करावा तुम्ही विचार करावा, ऋषिमुनींना कोडं पडलय. वर इंद्रसभेच्या देवाचा धावा करशीला, काही वर्षानं सूर्य-चंद्र एकत्र येतील आणि दोघांची टक्कर लागलं अन् पृथ्वी गडपं होईल. आलाय पृथ्वीचा करार संपत आलाय. जगात धर्म बुडून गेलाय, सत्य फासावर गेलंय, धर्माची बाजू म्होरं हाय, चाललया चाललया जगाचं भविष्य चाललया.

साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील

उन्हाळ्याचा पावसाळा, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, बारमाही पाऊस होईल, धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल. काळ्या खडकाच्या लाह्या उडतील, खडकाच्या माळाला तुम्ही धडका खाशीला, कोल्हापूरच्या देवीला मोठं संकट पडलंय, रात्री बाराच्या वेळेला तिच्या नेत्रातून पाणी पडतया, परमेश्वर त्याचा न्यायनिवाडा करतील, साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील, शेती व्यवसायावर संकट येईल, हाय ही भाकरीवरची भाजी हाय, सांभाळून खावा. कामगारांना भाव येईल, मोठे लोक दारात बसतील. संप हारताळाची पाळी देशावर येईल. जंगलातील प्राणी, पक्षी गावात येतील, धुमाकूळ घालतील, गावातला माणूस भयभीत होईल, अशी सिद्धार्थ डोणे महाराज यांनी भाकणूक कथन केली.

पाकिस्तान राष्ट्र उद्ध्वस्त होईल

अठरा तऱ्हंच माणसाला आजार होतील, आडं चुकलं पण खेडं चुकणार नाही, डॉक्टर लोक हात टेकतील, बारा कोसाला एक दिवा लागलं, माणसाची वसती विरळ होईल. वादळ, भूकंपानं समुद्राची उलथापालथ होईल. अलम दुनियेचा चवथाई कोना वसाड पडलं. कोरोना किती बी वाढला तरी त्याला पायाखाली घेईन, पण लक्षात घ्या, जपून ऱ्हावा. मराठा सैनिक मृत्यूला भिणार नाही, छातीची ढाल करील, भारत-पाकिस्तान लढत राहील, पाकिस्तानचा चौथाई कोना भारतात समाविष्ट होईल, भारतमातेचा जगभरात जयजयकार होईल, पाकिस्तान राष्ट्र उद्ध्वस्त होईल. जगाच्या नकाशातून पुसून जाईल. जगातील तापमानाचा धोका वाढत जाईल, जंगलात आग लागलं, वणवा पेटलं, वन्यजीवन अडचणीत येईल, औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील, भारत देशात समान नागरी कायद्याचा हक्क येईल, महाराष्ट्रात नदीजोड प्रकल्प येईल, दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल, नंदनवन होईल. जाती-धर्माचं राजकारण बिघडून जाईल, जाती-धर्मात वैरत्व वाढंल, वाढलेल्या वैरत्वातून हाणामाऱ्या होतील.

नदीकाठाची जमीन ओसाड पडलं

लायटाअभावी जनजीवन विस्कळून जाईल. महाराष्ट्रात एनरोन येईल, लुटालूट होईल, भागात हालसिद्धनाथ भेटायला येईल, सुख-दु:खाच्या गोष्टी मागणं घालतील, सीमाप्रश्न राजकर्त्यांच्या चर्चेत राहील, निपाणी भागात अतिरेकी मोठा गोंधळ घालतील, होईल फायरिंग होईल, होईल जाळपोळ होईल, कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठं भगदाड पडलं. चौथाई कोना जलमय होऊन कोना वसाड पडलं. दुधाचा भाव दिवसान् दिवस वाढत राहील. सत्तेसाठी भांडून खेळतील. निपाणीकर सरकारला हालसिद्धनाथ शापमुक्त करेल, तुळजापुरची अंबा त्यांच्या पाठिशी राहिल. नदीकाठाची जमीन ओसाड पडलं.

पस्तीस वर्षाच म्हातारपण येईल

बैलाची किंमत बकऱ्याला येईल, बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल, कोंबडं माणसाच्या पाठी लागलं. माशापासून माणसाला आजार होतील. बारा वर्षाचं बालपण खेळत राहील, चोवीस वर्षाचं तरुणपण पस्तीस वर्षाच म्हातारपण येईल. माणसाला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील. एका पुऊषाला सात बायका होतील, पुऊष झाडाच्या शेंड्यावर चढून बसलं. नवऱ्याला बायको थोबाडीत मारील, माळाची नदी, नदीचा माळ होईल, नदीबाईला कुलपं पडल्यात. नावबाईपाशी सतपण हाय, इजबाईचा मोठ्ठा कलाटा होईल, इजबाईनं मोठ्ठ नुकसान होईल, डोंगर-पर्वत वाफेने जातील, समुद्रातील संपत्ती नाश पावेल. स्मगलर लोकांची हत्या होईल. नाचतील हिजडं नाचतील.

तंबाखूपासून तरुणपिढी बरबाद व्हईल

शुगर फॅक्टरीचा मालक आनंदात राहील, साखरेचा भाव काही दिवस तेजीत राहील, साखरेचं पोतं तेजी-मंदीत राहील, गुळाचा भाव वाढत राहील, साखरंचं पोतं मोलानं इकलं, मांडवाचे दारी 2600 म्हणतील, 2600 म्हणता 2500 वर येईल. 2500 म्हणता 2400 वर येईल 2400 म्हणता 2300 येईल, चढलं, उतरलं. तंबाखूची पेंडी मध्यम पिकलं. तंबाखूचा भाव गगनाला भिडलं, तंबाखूपासून तरुणपिढी, घरदार बरबाद होतील. माणसाला आजार लागलं, रस भांड उदंड पिकलं, रसाला धारण माणसाला मरण येईल, उसाचा काऊस होईल, सडकंवर पडलं, औषधाला मिळणार नाही, उसासाठी देशात आणि राज्यात आंदोलन छेडतील, गावोगावी-खेडोपाडी दंगा-धोपा होईल, जाळपोळ होईल.

Advertisement
Tags :

.