For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अंडरवॉटर मेट्रो

06:48 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
अंडरवॉटर मेट्रो
Advertisement

आजपर्यंत देशात जमिनीच्या वरच्या आणि भूमिगत मेट्रोमध्ये प्रवास केला जात होता. पण आता लवकरच नदीखालूनही मेट्रो प्रवास अनुभवायला मिळणार आहे. कोलकाता मेट्रोने हा चमत्कार केला आहे. देशात प्रथमच नदीखालून मेट्रो धावणार आहे. पश्चिम बंगालमध्ये हुगळी नदीखाली बोगदा साकारण्यात आला असून या बोगद्यातून मेट्रो कोलकाताहून हावडा गाठणार आहे. या अंडरवॉटर मेट्रोच्या ट्रायल रनच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता या वर्षअखेरीस अभियांत्रिकीचा हा आणखी एक चमत्कार दिसणार आहे. हुगळी नदीखाली मेट्रो रेल्वे बोगदा आणि स्टेशन बांधण्यात आले आहे. कोलकाता ते हावडा या मार्गावरील मेट्रो सेवा वर्षअखेरीस सुरू होत आहे. देशातील पहिली अंडरवॉटर मेट्रो रेल्वे 31 डिसेंबर 2023 रोजी येथे धावणार आहे. या माध्यमातून 39 वर्षांनंतर सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासात पुन्हा एकदा कोलकात्याचे नाव उज्ज्वल होणार आहे.

Advertisement

Underwater Metro1984 मध्ये देशाची पहिली मेट्रो कोलकात्यातून धावली होती. त्यानंतर दुसरी मेट्रो दिल्लीत 2002 मध्ये सुरू झाली. त्यापाठोपाठ मुंबई, पुणे, नागपूर अशा इतर अनेक शहरात मेट्रोचे जाळे विणण्यात आले. देशभर मेट्रोसह मोनोरेल, बुलेट ट्रेन आणि इतर रेल्वे प्रकल्पांचे काम प्रगतीपथावर असताना आता देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचा श्रीगणेशा कोलकात्यातून सुरू होत आहे. भारताची ही पहिली पाण्याखालील मेट्रो टेन लंडन-पॅरिसच्या धर्तीवर सुरू होत आहे. यामध्ये वर्ल्ड क्लास सेवा असणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याआधीच याची तुलना लंडनमधील युरोस्टारशी करण्यात येत आहे. हावडा स्टेशन ते महाकरण स्टेशन असा 520 मीटर लांबीचा प्रवास मेट्रो एका बोगद्यातून पूर्ण करेल. मेट्रो 80 किमी/तास या वेगाने फक्त 45 सेकंदात बोगदा पार करेल. या बोगद्याद्वारे हावडा थेट कोलकात्याशी जोडला जाईल आणि दररोज 7 ते 10 लाख लोकांचा प्रवास सुकर होईल. मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक पी. उदयकुमार रेड्डी यांनी ही ऐतिहासिक घटना असल्याचे म्हटले आहे.

 देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानक

Advertisement

कोलकाता येथे हुगळी नदीपात्रात जमिनीपासून 33 मीटर आणि नदीच्या पृष्ठभागाच्या 13 मीटर खाली 520 मीटर लांबीच्या बोगद्यात दोन ट्रॅक टाकण्यात आले आहेत. नदीखाली मेट्रोसाठी दोन बोगदे बांधण्यात आले आहेत. या बोगद्यातून मेट्रोसेवा सुरू झाल्यावर हावडा हे देशातील सर्वात खोल मेट्रो स्थानक बनेल. ते पृष्ठभागापासून 33 मीटर खाली आहे.

 बोगदा अर्धा किलोमीटर लांब

हुगळी नदीखाली बांधण्यात आलेला हा मेट्रो बोगदा 520 मीटर लांब आहे. हावडा ते एस्प्लेनेड हा एकूण मार्ग 4.8 किलोमीटर लांबीचा आहे. यात 520 मीटर लांबीचा पाण्याखालील बोगदा आहे. या अर्ध्या किलोमीटरच्या पाण्याखालील बोगद्यातून प्रवासी एक मिनिटापेक्षा कमी वेळात जातील. बोगदा बांधण्यासाठी

प्रतिकिलोमीटर 120 कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे समजते. कोलकाता मेट्रोचे हे बोगदे लंडन आणि पॅरिस दरम्यानच्या चॅनल बोगद्यातून जाणाऱ्या युरोस्टार गाड्यांप्रमाणे बांधण्यात आले आहेत.

बोगद्यांची निर्मिती म्हणजे चमत्कारच!

2010 मध्ये बोगदा बांधण्याचे कंत्राट अफकॉन्स कंपनीला देण्यात आले होते. ‘अफकॉन्स’ने एप्रिल 2017 मध्ये बोगदे खोदण्यास सुऊवात केल्यानंतर त्याच वषी जुलैमध्ये ते काम पूर्ण केले. अभियांत्रिकीच्या चमत्कारातील ही एक मोठी झेप आहे. पाण्याखालील खोदाई, वॉटरप्रूफिंग आणि गॅस्केटची रचना ही या बोगदा निर्मिती बांधकामातील प्रमुख आव्हाने होती. बोगद्याच्या बांधकामादरम्यान 24×7 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. येथे मजबूत नदी बोगदा प्रोटोकॉलचे पालन केले गेले. हे बोगदे 120 वर्षे सुरक्षितपणे सेवा देण्यासाठी बांधले आहेत. नदीच्या बोगद्यात पाण्याचा थेंबही जाऊ शकत नाही.

कोलकातामध्ये या प्रकल्पासमोर दोन मोठी आव्हाने होती. प्रथम, खोदण्यासाठी योग्य मातीची निवड आणि दुसरे म्हणजे दर 50 मीटरवर सुरक्षित टीबीएमची उभारणी करणे. येथे वेगवेगळ्या प्रकारच्या माती वेगवेगळ्या अंतरावर आढळतात. बोगद्यासाठी योग्य जागा ओळखण्यासाठी 5-6 महिने माती सर्वेक्षण करण्यात येत होते. 3 ते 4 सर्वेक्षणानंतर हावडा पूल हुगळी नदीच्या पात्रापासून 13 मीटर अंतरावर जमिनीत बोगदा तयार होऊ शकतो, यावर शिक्कामोर्तब झाले.

हुगळीखालील बोगद्याचे खोदकाम 125 दिवसांत पूर्ण करायचे होते. मात्र, ते 67 दिवसात पूर्ण झाले. 1 सप्टेंबर 2019 रोजी टीबीएम चंडी सियादाहपासून सुमारे अर्धा किमी दूर असताना एका मोठ्या दगडावर आदळली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मातीचा भराव होऊन बहुबाजारच्या अनेक इमारतींचे नुकसान झाले. या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले. शेकडो कुटुंबांना हॉटेलमध्ये स्थलांतरित व्हावे लागले. उच्च न्यायालयाने हे काम थांबविले. त्यानंतर सर्व अडथळे पार पाडल्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये पुन्हा कामाला सुरुवात होऊन आता ते पूर्णत्वास आले आहे. कोलकाता पूर्व-पश्चिम मेट्रो प्रकल्पांतर्गत सहा डब्यांच्या दोन गाड्या चाचणीसाठी तयार करण्यात आल्या होत्या. आता बऱ्याच ट्रायल रन पूर्ण झाल्यानंतर पाण्याखालून मेट्रो प्रवासाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.

जलद कनेक्टिव्हिटीसाठी हायस्पीड ट्रेनची गरज 

भारतीय रेल्वे हा प्रत्येक सामान्य व्यक्तीच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. भारतात दररोज हजारो गाड्या धावतात. कोणत्याही देशाच्या उत्तम रेल्वे नेटवर्कमुळे माल किंवा लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची सुविधा निर्माण होते. जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या भारताने येत्या काही वर्षांत चीनला मागे टाकण्याचे ध्येय ठेवले आहे. परंतु चीनला मागे टाकून जागतिक विकासाचा सर्वात मोठा भाग बनण्यासाठी भारताला अनेक आघाड्यांवर आव्हानांना सामोरे जावे लागेल.

सध्या जगातील अनेक कंपन्या चीनवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताकडे वळत आहेत. पण पुढचा चीन बनण्यासाठी भारताला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. सध्या भारतासाठी आपल्या पायाभूत सुविधांवर काम करणे आणि त्यात सुधारणा करणे सर्वात महत्वाचे आहे. भारताने सध्या जलद कनेक्टिव्हिटीसाठी हायस्पीड रेल्वे नेटवर्क सुधारण्यावर लक्ष केंद्रीत केलेले दिसते.

भारतात पहिला बुलेट टेन प्रकल्प आता म्हणजेच 2023 मध्ये मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान बांधला जात आहे. 2026 पर्यंत हा प्रकल्प सुरू होईल. याचदरम्यान चीनचे हायस्पीड रेल्वे नेटवर्क 30,000 मैलांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा आहे. सध्या आपल्या देशात सर्वात वेगवान धावणाऱ्या टेनचे नाव ‘वंदे भारत’ आहे. सध्या भारतात 34 ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस धावत आहेत. त्याचा वेग 180 किमी आहे. पण रेल्वे बोर्डाने त्याला फक्त 160 किमीच्या वेगाने धावण्याची परवानगी दिली आहे. ही टेन क्वचितच पूर्ण वेगाने धावू शकते. अनेक राज्यांमधील ट्रॅकची खराब स्थिती पाहता वेग 160 पेक्षा कमी आहे.

रेल्वेच्या प्रगतीत अपघातांचे अडथळे

एकीकडे रेल्वेचे जाळे व्यापक आणि वेगवान करण्यावर भर दिला जात असतानाच वेगवेगळ्या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे रेल्वेच्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. 2014 पासून आतापर्यंत म्हणजेच 2023 पर्यंत दहा रेल्वे अपघात झाले आहेत. या अपघातांमध्ये सुमारे 600 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1,300 हून अधिक लोक जखमी झाले आहेत.

रेल्वेच्या वाढत्या अपघातांचे कारण मानवी चूक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, भारतात असे मोठे रेल्वे अपघात होण्याची ही पहिलीच वेळ नाही. या देशातील रेल्वे अपघातांचा इतिहास बराच जुना आहे. 1999 मध्ये पश्चिम बंगालमध्ये दोन टेनच्या धडकेत 285 लोकांचा मृत्यू झाला होता. 2010 मध्येही पश्चिम बंगालमध्येच प्रवासी टेन ऊळावरून घसरून मालगाडीला धडकल्याने 145 जणांचा मृत्यू झाला होता.

ऑगस्ट 2017 मध्ये उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथे अपघातात 23 जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नोव्हेंबर 2016 मध्ये इंदूर पाटणा एक्स्प्रेसला कानपूरजवळ अपघात झाला होता. ज्यामध्ये 150 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मार्च 2015 मध्ये जनता एक्सप्रेस ऊळावरून घसरली होती. या अपघातात 34 जणांचा मृत्यू झाला.

2012 मध्ये एकूण 14 छोट्या-मोठ्या अपघातांची नोंद झाली होती. जुलै 2010 मध्ये पश्चिम बंगालमध्ये उत्तर बंगा एक्स्प्रेसचा अपघात झाला होता. त्याच वषी सप्टेंबर महिन्यात मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इंटरसिटी एक्स्प्रेसचा अपघात झाला होता, ज्यामध्ये अनेक लोकांचे प्राण गेले होते.

चालू वर्षातील रेल्वे अपघातांपैकी तीन दुर्घटना मोठ्या आहेत. जून महिन्यात ओडिशातील बालासोर येथे भीषण रेल्वे अपघात झाला. ही दुर्घटना गेल्या 15 वर्षांतील सर्वात भीषण ठरली. यात 291 लोकांना आपला जीव गमवावा लागला. तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले. अलिकडेच 15 नोव्हेंबरला दोन रेल्वे अपघात झाले. दिल्लीहून सहरसाकडे जाणाऱ्या वैशाली एक्स्प्रेसला आग लागली होती. या घटनेत 19 प्रवासी जखमी झाले होते. यापूर्वी इटावा टेनमध्ये आग लागली होती. याशिवाय गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये आठवडाभरात दोन मोठे रेल्वे अपघात झाले. आंध्रप्रदेशातील विजयनगरम जिह्यात 29 ऑक्टोबर रोजी दोन प्रवासी गाड्यांची टक्कर झाल्यामुळे 14 जणांना आपला जीव गमवावा लागला. तर 50 प्रवासी जखमी झाले. या दुर्घटनेनंतर अवघ्या दोन दिवसांनी म्हणजेच 31 ऑक्टोबरला झारखंडच्या हजारीबाग जिह्यात रेल्वे अपघात झाला होता.

जयनारायण गवस

Advertisement
Tags :

.