For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:ला समजून घेताना..

09:39 PM Mar 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वत ला समजून घेताना
Advertisement

त्या दिवशी आम्ही मैत्रीणी खूप दिवसांनी भेटलो होतो. त्या निमित्ताने मुलेही एकत्र आली होती. अशाच गप्पा सुरु होत्या. गप्पा मारताना स्वाभाविकच वेगवेगळे विषय, हसणे हे ओघाने आलेच. मैत्रीणीची मुलगी मला म्हणाली, ‘मावशी तुमची कीती छान मैत्री आहे. अगदी छान मनमोकळी!!

Advertisement

हो..अगं..

बघ ना, तुम्ही खरंतर वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आहात. कुणाचे पार्लर आहे, कुणी गृहिणी, कुणी डॉक्टर, वकिल, टिचर, क्षेत्रं वेगवेगळी पण काय बाँडिंग आहे गं तुमचं..स्टेटस वगैरे असले प्रकार आड येत नाहीत तुमच्या मैत्रीच्या..

Advertisement

मला हसू आलं..अगं, यालाच तर खरी मैत्री म्हणतात ना?

हो! पण मला सांग मावशी, असं का होतं गं की काही माणसं आपल्याला खूप जवळची वाटतात. एखाद्याजवळ पटकन् वेव्हलेंथ जुळते तर एखादा वर्षानुर्षे संपर्कात असूनही छान बाँडिंग होत नाही. असं का गं? मी हसले आणि मयूराला समजेल अशा सोप्या पद्धतीने उत्तरही दिलं. पण या निमित्ताने मला आठवण झाली ती ‘जोहॅरी विंडो’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण मानसशास्त्राrय तंत्राची.

पहा हं, कुठलंही नातं निभावताना वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या स्तरांवर संबंध

प्रस्थापित होत असतात. मित्र मैत्रिणींच्या एकाच ग्रुपमध्ये सर्वांची एकमेकांशी घट्ट मैत्री असतेच असं नाही. कुटुंबामध्ये, नातेसंबंधामध्येही जिव्हाळ्याच्या किंवा दुराव्याच्या अनेक छटा असतात. आपले शाळेचे किंवा कॉलेजचे दिवस आठवून पाहिले तर लक्षात येईल. अनेक शिक्षकांचा सहवास आपल्याला लाभलेला असतो परंतु यातले एखादे सर वा मॅडम आपल्या ह्दयात वेगळ्या स्थानी असतात.

वेगवेगळ्या ठिकाणी काम करत असताना अनेक माणसे भेटतात. कुणाशी छान गट्टी जमते तर कुणाशी जेवढ्यास तेवढेच नाते राहते.

खरंतर वरील प्रत्येक ठिकाणी आपले आपल्या सहकाऱ्यांसोबत, शेजाऱ्यांसोबत, नातेवाईकांसोबत म्हणजेच इतरांबरोबरचे संबंध चांगले रहावेत असे सामान्यपणे सर्वांना वाटत असते. जो पर्यंत दोन व्यक्ती एकमेकांना समजून घेत असतात तोपर्यंत अगदी दृष्टिकोन वेगवेगळे असूनही उत्तम समायोजन साधलं जातं.

त्यांच्या सोबतीने मिळून आपलं एक लहानसं विश्व तयार होतं. त्याचा केंद्रबिंदू आपण स्वत:च असतो. त्यामुळे इथे ‘स्व’ चा विचार खूप आवश्यक ठरतो. इतरांपेक्षा आपण स्वत:ला अधिक ओळखत असतो. याच ओळखीला ‘स्व-संकल्पना’ म्हणतात. सोप्या शब्दात सांगायचे तर प्रत्येक व्यक्तीची स्वत:विषयीची कल्पना वा अभिवृत्ती. उदा. स्वरालीला वाटतं ती खूप सहनशील आहे. म्हणजे स्वरालीचे हे वाटणे तिचे स्व संवेदन आहे.

यालाच जमग्न् perceived self अर्थात संवेदित स्व म्हणतात. परंतु असे जरी असले तरी तिचा Real self म्हणजेच ‘वास्तव स्व’ कसा आहे याचं ज्ञान करुन देणं आवश्यक असतं. हे ज्ञान वा जाणीव इतरांच्या मार्फत करुन घ्यायचं असतं. म्हणजे स्वरालीला वाटतं की ती सहनशील आहे परंतु इतरांनाही तिच्याबाबतीत तसंच वाटतं का, हे जाणणं अर्थात यालाच social self ‘सामाजिक स्व’ असे म्हणतात.

स्वरालीला स्वत:बद्दलचे वाटणे आणि इतरांचं तिच्याबद्दलचे वाटणे यामध्ये जेवढे जास्त अंतर असेल तेवढी स्वराली ‘वास्तव स्व’ पासून दूर आहे असं म्हणता येईल. परंतु हे जाणून घेण्यासाठी तिला इतरांचे आपल्याबद्दल काय मत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. बऱ्याचदा इतरांनी आपले दोष सांगितले किंवा टीका केली तर आपण ते पटकन् स्वीकारत नाही. परंतु तारतम्याने विचार केला आणि स्वत:मध्ये बदल केला तर वास्तव स्वची ओळख होऊ शकते.

परस्परसंबंध चांगले राखण्याच्या दृष्टीने ‘संवेदित स्व’ आणि ‘सामाजिक स्व’ यामधील अंतर कमी कसं करायचं आणि त्यातून ‘वास्तव स्व’ ला कसं समजुन घ्यायचं हे जोहॅरी विंडोद्वारा नेमकेपणाने कळू शकतं. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ जोसेफ लुफ्त आणि हॅरी इंघाम यांनी मांडलेले हे मॉडेल! जोसेफमधील ‘जो’ आणि ‘हॅरी’ हे शब्द जोडून जोहॅरी प्रारुप तयार झाले.

जोहॅरी विंडो हे असं प्रारुपe(Model)आहे की त्याद्वारे सेल्फ अवेरनेसमध्ये सुधारणा होण्याबरोबर परस्परसंबंध कसे राखावेत हे ही कळू शकते. व्यक्तिगत विकास तसेच ग्रुप डेव्हलपमेंट, परस्पर संवाद सुधारणा यासाठी हे मॉडेल उपयुक्त ठरले आहे. काही जाणकारांच्या मते ते माहिती विशद आणि विश्लेषण करण्याचेही उपयुक्त साधन आहे

जोहॅरी विंडो प्रारुप म्हणजे काय...

ही चार तावदानांची खिडकी म्हणता येईल, आपल्या स्व-जाणिवेचे हे चार भाग आहेत. 1. प्रकट-स्व(Open self) 2.अंध-स्व(Blind self) 3.खाजगी-स्व (Private self)4.अज्ञात-स्व (Unknown self)

खालील आकृतीतील चारही भाग(तावदाने)एकाच आकाराचे दिसत आहेत. प्रत्यक्षात हा आकार व्यक्तीला स्वत:बद्दल वा इतरांबद्दल असलेल्या माहितीच्या प्रमाणानुसार बदलत असतो. त्या चारही तावदानातून आपण जसं स्वत:ला व्यक्त करत असतो तसंच इतरांचा आपल्याबद्दलचा दृष्टिकोन आपल्याला ज्ञात होत असतो. माहितीच्या देवाणघेवाणीचा हा प्रवाह अव्याहत सुरु असतो ज्याला पुनर्भरण किंवा फीड बॅक असेही म्हणतात. हा प्रवाह जसा लहानमोठा होत असतो तसा आकारमानात फरक पडू शकतो.

प्रकट स्व अथवा ओपन सेल्फमध्ये व्यक्तीची परिचयात्मक माहिती तिच्या संपर्कातील इतरांना असते वा असणं अपेक्षित आहे. त्या व्यक्तिची बलस्थाने, उणिवा यांचीही जाणीव असते. दोघेही एकमेकांना समजून घेऊन वागतात. त्यामुळे संघर्षाची शक्यता नसते. दोन व्यक्तींमध्ये कितपत सुसंवाद घडेल वा घडू शकतो याची सुस्पष्ट कल्पना ओपन सेल्फच्या क्षेत्राच्या व्याप्तीवरुन येते.

दोन्ही व्यक्तीच्या प्रकट स्व चा जेव्हा विस्तार झालेला असतो तेव्हा एकमेकांशी आपली वेव्हलेंथ जुळते असे आपण म्हणतो. पहा.. काही जणं वर्षानुवर्षे आपल्याला भेटत असतात परंतु कसं काय? काय म्हणता? सर्व ठिक ना? या पलीकडे त्यांच्याशी नातं डेव्हलप होत नाही तर काहींजवळ अगदी अल्पकाळात घट्ट मैत्री होते ते यामुळेच! प्रकट स्व चे क्षेत्र विस्तारीत असेल तर संपूर्ण सहकार्य, मुक्त असा परस्परसुसंवाद साधला जातो.

अर्थात याविषयी अधिक जाणून घेऊया पुढच्या लेखात..

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :

.