For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

स्वत:ला समजून घेताना

06:31 AM Mar 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
स्वत ला समजून घेताना
Advertisement

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रकट स्व अथवा ओपन सेल्फमध्ये व्यक्तीची परिचयात्मक माहिती तिच्या संपर्कातील इतरांना असते वा असणं अपेक्षित आहे. त्या व्यक्तिची बलस्थाने, उणिवा यांचीही जाणीव असते. दोघेही एकमेकांना समजून घेऊन वागतात. त्यामुळे संघर्षाची शक्यता नसते. दोन व्यक्तींमध्ये कितपत सुसंवाद घडेल वा घडू शकतो याची सुस्पष्ट कल्पना ओपन सेल्फच्या क्षेत्राच्या व्याप्तीवरुन येते.

Advertisement

मागच्या लेखामध्ये आपण जोहॅरी विंडो या मानसशास्त्राrय तंत्राची ओळख करुन घेत असताना याच्या चार भागांपैकी प्रकट स्व विषयी माहिती जाणून घेतली होती. खरंतर जोहॅरी विंडो ही चार तावदानांची खिडकी म्हणता येईल, आपल्या स्व-जाणिवेचे हे चार भाग आहेत. 1. प्रकट-स्वOpen self) )ि 2.अंध-स्व(Blind self) 3.खाजगी-स्व(Private self)ि 4.अज्ञात-स्व(Unknown self)ि अशी कल्पना करा की खिडकीची एक बाजू, तावदानाची एक बाजू जर धुळीने माखलेली आहे किंवा अर्धपारदर्शक आहे तर आपण पलीकडचे नीट पाहू शकू का? अगदी तसेच या जोहॅरी विंडोचे तावदान एकबाजूदर्शी असेल तर दुसऱ्या व्यक्तीची मते, माहिती, भावना स्पष्टपणे कळणार नाहीत. परस्पर संबंधामध्ये अडथळा किंवा गोंधळ निर्माण होईल. जर हेच तावदान टू वे ग्लास असेल तर दोन्ही बाजूंची देवाणघेवाण मुक्त आणि खुलेपणाने सुरु राहील.

Advertisement

मागच्या लेखात म्हटल्याप्रमाणे प्रकट स्व अथवा ओपन सेल्फमध्ये व्यक्तीची परिचयात्मक माहिती तिच्या संपर्कातील इतरांना असते वा असणं अपेक्षित आहे. त्या व्यक्तिची बलस्थाने, उणिवा यांचीही जाणीव असते. दोघेही एकमेकांना समजून घेऊन वागतात. त्यामुळे संघर्षाची शक्यता नसते. दोन व्यक्तींमध्ये कितपत सुसंवाद घडेल वा घडू शकतो याची सुस्पष्ट कल्पना ओपन सेल्फच्या क्षेत्राच्या व्याप्तीवरुन येते.

दोन्ही व्यक्तीच्या प्रकट स्व चा जेव्हा विस्तार झालेला असतो तेव्हा एकमेकांशी आपली वेव्हलेंथ जुळते असे आपण म्हणतो. पहा..काही जणं वर्षानुवर्षे आपल्याला भेटत असतात परंतु कसं काय? काय म्हणता? सर्व ठिक ना? या पलीकडे त्यांच्याशी नातं डेव्हलप होत नाही तर काहींजवळ अगदी अल्पकाळात घट्ट मैत्री होते ते यामुळेच! प्रकट स्व चे क्षेत्र विस्तारीत असेल तर संपूर्ण सहकार्य, मुक्त असा परस्पर सुसंवाद साधला जातो. म्हणून हे क्षेत्र विस्तारित करण्याचा प्रयत्न असायला हवा. यातील दुसरी खिडकी आहे ती 2.अंध-स्व Blind self)ि

बऱ्याचदा व्यक्तीला स्वत:च्या उणिवा, बलस्थाने यांची पुरेशी जाणीव नसते किंवा त्याबद्दल तिच्या अवास्तव कल्पना तरी असतात. कुणी याबाबत त्या व्यक्तीला जाणीव करुन दिली तर अशा व्यक्ती अनेकदा दुखावल्या जातात. मग अशांच्या बाबतीत परस्पर संबंध बिघडतात. अनेकांना स्वत:मधील दोष वा उणिवा मान्य करणं ही अवघड गोष्ट वाटते. वरील आकृतीमधील अंध-स्व ची व्याप्ती जितकी कमी तितकी चांगली.

काहीवेळा आपल्या अवतीभवती अशी अनेक माणसे असतात जी स्वत:बद्दल अनेक भ्रामक समजुती करुन घेऊन वावरत असतात अशा व्यक्तींचा अंध-स्व खूप मोठा असतो.

स्व-जाणीव किंवा आत्मभान(Self awareness )असण्याने आणि आत्मनियंत्रण करण्याने आपल्यातील अंध-स्व कमी करता येतो. त्यासाठी आपल्या स्वभावातील उणिवांची जाणीव असणं हा पहिला टप्पा तर बदल घडवून आणण्यासाठी स्वेच्छेने तयार होणं(Willingness)हा दुसरा टप्पा आहे. तिसऱ्या टप्प्यात काही कृती करणं आणि त्यामध्ये सातत्य राखणे अपेक्षित असतं.

अंध-स्व हा व्यक्तीच्या उणिवांबद्दल असतो तसाच तो क्षमतांबद्दलही असतो. कधी कधी व्यक्तीला आपल्या गुणांची, कौशल्यांची जाणीवही नसते. सुजाण पालक-शिक्षक मुलांमधील सुप्त गुण हेरुन त्यांना विकसित करण्यासाठी निश्चितपणे प्रोत्साहित करु शकतात. असं झाल्यास व्यक्तीचं अंध-स्व चं क्षेत्र कमी होण्यास मदत होते. व्यक्तिगत सुधारणा आणि विकासासाठी अंध-स्व कडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आकृतीमधील तिसरा भाग सुप्त किंवा खाजगी स्व(Private self))ि- यामध्ये व्यक्तीला स्वत:बद्दल पूर्ण माहिती असते परंतु इतरांना ती नसते किंवा चुकीची असते. क्वचित ती व्यक्ती स्वत:बद्दल बोलत नाही, पण इतरांना आपली माहिती आहे असं गृहित धरुन वागते. समोरच्या व्यक्तीला या गोष्टीची कल्पना नसल्याने, कल्पना न दिल्याने अनेकदा गोंधळ उडतो, संघर्ष, गैरसमज निर्माण होतात. अरे, मला वाटलं तुम्हाला माहिती असेल हे सुप्त स्व वाल्यांचे परवलीचे वाक्य असते.

खाजगी स्व मध्ये अनेक भावना, गुपितं किंवा इतर गोष्टी व्यक्तीला माहित असलेल्या पण उघडपणे चर्चा नको असलेल्या गोष्टीही मोडतात. काही माणसे मोकळेपणाने बोलतात तर काही खूप हातचे राखून बोलतात. खाजगी स्व कमी करणे म्हणजे प्रकट स्व वाढविणे परंतु समजून योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य तऱ्हेने आपली माहिती सांगणे उचित ठरते. तसे केल्यास परस्परसामंजस्य, सहकार्य, विश्वास वाढून संपूर्ण क्षमतेनिशी प्रभावीपणे काम करणे सहजसाध्य होते. यामधील चौथी चौकट ही अज्ञात स्व (Unknown self) ची आहे. जाणीवेच्या पातळीखाली नेणिवेत दडलेल्या अनेक गोष्टी आपल्यावर परिणाम करत असतात. काही मानसशास्त्रज्ञांच्या मते अबोध अशा या भागाचं क्षेत्र इतर तीन भागांच्या एकत्रित क्षेत्रापेक्षाही मोठ्ठ असतं. यात अनेक इच्छा, सुप्त क्षमता! कौशल्येही असतात. त्याची माहिती त्या व्यक्तीलाही नसते आणि इतरांनाही! आपल्या वागण्याबोलण्यामध्ये अनेकदा लहानपणीचे बरे वाईट अनुभव दडलेले असतात, याची आपल्याला कल्पनाही नसते. बऱ्याचदा व्यक्तीला स्वत:च्या निसर्गदत्त क्षमतेची जाण नसते, तर कधी संधीच न मिळाल्यामुळे तिच्या क्षमता, कौशल्यांचा वापरच झालेला नसतो. क्वचित एखादी अनामिक भीती वा आजार व्यक्तीला स्वकौशल्याचा वापर करण्यापासून रोखत असतो. मात्र आत्मविश्वास, प्रोत्साहन आणि प्रशिक्षण यांमुळे व्यक्तीच्या अंगभूत गुणांना वाव मिळून तिचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते.

अनेक गायक, खेळाडू, कलाकार त्या त्या क्षेत्रात आपण अपघाताने आलो असे ज्यावेळी सांगतात तेव्हा त्यांच्या अज्ञात-स्व चे काही पैलू उजेडात येण्याची त्यांना संधी मिळाल्यामुळे त्यांचे हे कौशल्य लक्षात आले.

अज्ञात स्व चे दालन काही प्रमाणात निश्चित उघडलं जाऊ शकतं. परंतु त्यासाठी व्यक्तीला स्वत:चा शोध घेता येणं आवश्यक आहे. आपल्याला कोणकोणत्या गोष्टी करायला आवडतात? कशामध्ये विशेष रस वाटतो, कोणती गोष्ट आनंद देते, कशाबद्दल उत्सुकता वाटते हे लक्षात येणं आवश्यक आहे. तसंच आपली बलस्थानं, उणिवा किंवा क्षमता आणि मर्यादा हे स्वत:च्या लक्षात येत नसेल तर त्याचा शोध घेण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे. एकंदरच जोहॅरी विंडोच्या चार भागांची माहिती घेतल्यानंतर प्रकट स्व चे क्षेत्र विस्तारित करण्यावर भर आणि इतर तीन क्षेत्रांची व्याप्ती कमी करायला हवी हे लक्षात येतं. परंतु हे करायचे कसे? यासाठी दोन मार्ग या प्रारुपात सांगितले आहेत त्याविषयी जाणून घेऊया पुढच्या लेखात..

-अॅड. सुमेधा संजिव देसाई

Advertisement
Tags :

.