महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बिबट्याच्या पंजाखाली

10:32 PM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

गेल्या वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एका प्राण्याने दहशत माजवली आहे, तो आहे बिबट्या. राज्याच्या वेगवेगळ्या भागात मानवी वस्तीच्या अगदी जवळ बिबट्या पोहोचला असून त्याचे प्रजननसुध्दा या वस्त्यांच्या जवळच होऊ लागलेले आहे. या प्राण्याचा बंदोबस्त करा अशी गावोगाव मागणी होत असते. मात्र त्याचा बंदोबस्त म्हणजे त्याला पकडायचे आणि सोडायचे कुठे? हा वन खात्यासमोरचा प्रश्न आहे. मात्र हा प्रश्न ज्वलंत बनत चालला आहे, ज्याकडे म्हणावे तितक्या गांभीर्याने पाहिले जात नाही. ज्या भागात बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुले, तरुणांचा आणि शेतकऱ्यांचा मृत्यू होतो त्या भागापुरता कलकलाट होतो. लोकांची काहीतरी सांगून वन आणि महसूल खात्याकडून बोळवण केली जाते. राज्यकर्ते तोंडदेखले कठोर बंदोबस्ताचे आदेश देतात. मध्यंतरी तर राज्याच्या वनमंत्र्यांच्या दालनात यावर चर्चा झाली तेव्हा भटक्या कुत्र्यांची केली जाते तशी बिबट्यांची नसबंदी का करण्यात येऊ नये? अशी चर्चाही झाली. गावोगावी भटकी कुत्री वाढली आहेत तीच बिबट्यांचे पहिले खाद्य बनत आहेत. त्यांची संख्या आटोक्यात आणणे सरकारला शक्य नसताना बिबट्याची नसबंदी करता येईल का? यावर राजकारण्यांनी चर्चा केली हे विशेषच! इतक्या चर्चेनंतर ज्या भागात बिबट्या दिसत होता त्या भागातील जनतेला दिलासा मिळाला. आपल्यासाठी सरकार, आमदार काहीतरी करत आहेत अशी भावना निर्माण झाली. तेवढाच दिलासा जनतेला आता आणखी काही काळ पुरेसा ठरेल. याकाळात लोकांचे प्रबोधन करण्याची जबाबदारी वन अधिकारी पार पाडून मोकळे होतील. त्या त्या भागातील फोटो, बातम्यांची कात्रणे काढून सरकारला अहवाल दिला जाईल आणि लोक बिबट्याच्या अस्तित्वासह जणू जगायला तयारच झाले आहेत अशा अविर्भावात त्या समस्येकडे डोळेझाक केली जाईल. वनक्षेत्राच्या जवळच्याच नव्हे तर त्यापासून कितीतरी दूर अंतरावर बिबट्याचे हल्ले होऊ लागले आहेत. हत्तींच्या कळपांचा हल्ला, गव्यांचा हल्ला, हरणांचा आणि रानडुकरांचा हल्ला या घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडत असल्याच्या तक्रारी रोजच्या झाल्या आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात सांगली जिह्यात नुकताच दोन लहान मुलींना जीव गमवावा लागला. कुत्र्यांवर होणारे हल्ले फार मोठ्या प्रमाणावर आहेत. लोकांना या प्राण्यांच्या अस्तित्वासह जगण्याचे आवाहन करतोच आहे. महाराष्ट्रातच कर्मचाऱ्यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. ती जंगलातच घडली. म्हणजे प्राण्यांचे हल्ले काही सांगून होण्यासारखी घटना नाही आणि त्यासाठी कितीही काळजी घेतली तरी जेव्हा वाघ, बिबट्यासारखा प्राणी समोर असतो तेव्हा कशा पद्धतीने सामोरे जायचे या सुचनेची अंमलबजावणी ही सहजसाध्य गोष्ट नाही. विचार करायचा झाल्यास बिबट्यांची संख्या प्रचंड वाढत आहे हे निश्चित आहे. त्यात या प्राण्याने आता जंगल सोडलेले आहे. जंगलापासून चाळीस-पन्नास किलोमीटर अंतरावरील उसाच्या शेतीतसुद्धा आता बिबट्याचे अस्तित्व जाणवते. उसाच्या फडात तोड येते तेव्हा बिबट्याचा हल्ला होईल या भीतीने अलीकडच्या काळात शेतात काम करण्यासाठी मजूर मिळणेही मुश्किल झाले आहे. शेतकऱ्याला रोज सकाळी घराचे दार उघडले की बिबट्याचे दर्शन होते अशा तक्रारी गावागावातून होऊ लागल्या आहेत. आज शेळ्या पळवल्या, उद्या कुत्र्याला मारले, परवा माणसावर हल्ला केला असे कसे चालणार? असा लोक प्रश्न विचारत आहेत. वन खात्याकडे यावर देण्यासाठी काहीही उत्तर नाही. विशेष म्हणजे बिबट्यांची संख्या भरमसाठ वाढलेली असताना ती किती आहे याची माहिती वन खाते लोकांना देत नाही. कारण संतप्त जमावाच्या रोशाला सामोरे जाण्याची त्यांची अजिबात तयारी नाही. शिवाय गावोगावचे लोक एकत्रित झाले तर त्यांना उत्तर काय द्यायचे हा प्रश्न आहेच. बिबट्या अव्वल दर्जाचा वन्यप्राणी असल्यामुळे वन विभाग त्याला वाचवण्याचेच बोलत राहणार. मात्र हा वन्य जीव संरक्षण कायदा वनात राहणा

Advertisement

ऱ्या जीवांच्या रक्षणासाठी आहे. पण, आज बिबट्या वन क्षेत्रापासून फार पुढे निघून गेला आहे आणि बिबट्या-मानव संघर्ष आता गंभीर वळणावर पोहोचण्याची शक्यता आहे. जंगलात झालेली वृक्षतोड या कारणाने बिबट्याने जंगल सोडले असे मानावे तर जंगलाचे सगळे रस्ते वन विभागाने अडवले असतानाही वृक्षतोड होते कशी आणि इतके सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतानाही तोड आणि वाहतूक दिसत कशी नाही? हा प्रश्न वन विभागाला कोणीही विचारत नाही. आता जेव्हा ही समस्या गंभीर बनली आहे तेव्हा प्रत्येकवर्षी बिबट्याचे प्रजनन होत राहणार आणि ही संख्या प्रचंड वाढत राहणार. बिबट्या ज्या विभागात वावरला तिथून तो पुढे जात राहतो आणि त्याने वास्तव्य केलेल्या ठिकाणी नवा बिबट्या येतो. पूर्वीच्या बिबट्याला त्या परिसरातील लोकांच्या वेळा, वावर यांची माहिती झाल्याने आणि बिबट्या कधी दिसतो याची लोकांना साधारण वेळ माहिती असल्याने ते हा संघर्ष टाळण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्यातूनही दुर्घटना घडतात. विशेष करून लहान मुलांच्या बाबतीत हा धोका अधिक आहे. बिबट्याच्या नजरेच्या टप्प्यातील उंचीच्या कोणत्याही प्राण्यांवर तो हल्ला करतो. शिराळा, शाहूवाडी तालुक्यात जाधववाडी, खुंदलापुर व इतर  अनेक भागात शाळकरी मुलांनासुद्धा दीड दोन किलोमीटर जंगलातून चालत शाळेला जावे लागते. तिथली बालकेही बिबट्याच्या पंजाखाली असल्याची स्थिती आहे. महाराष्ट्रातल्या अनेक जिह्यात त्यामुळे बिबट्या आणि मानव संघर्ष अटळ बनू लागला आहे. मुक्या प्राण्यांची समस्या वेगळी आणि मानवाची वेगळी आहे. बिबट्यासह जगा असे सांगणे सोपे आहे पण वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वन कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची अशी समजूत घालणे शक्य आहे का? बिबट्या मानवी वस्तीत आला आहे, कुठल्या भागापर्यंत त्यांचा वावर किती संख्येने आहे आणि पुढील काळात तो दुप्पट, तिप्पट कसा होईल हे वन विभागाला माहीत आहे. मात्र ती माहिती लपवून लोकांना खोटे सांगून संकटात जगायला सोडून देणे हे एका प्रशासकीय यंत्रणेला शोभणारे नाही.

Advertisement

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article