19 वर्षांखालील महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून
भारतीय संघ जेतेपद राखण्याच्या मोहिमेवर, उद्या वेस्ट इंडिजशी लढत
वृत्तसंस्था/ क्वालालंपूर
आयसीसी 19 वर्षांखालील महिला टी-20 विश्वचषकाला आज शनिवारपासून सुरू होत असून महिला क्रिकेटमधील भारताच्या नव्या पिढीतील खेळाडू आपले विजेतेपद राखून ठेवण्यास आणि जागतिक स्तरावरील आपले वर्चस्व वाढवण्यास उत्सुक असतील. वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि यजमान मलेशियासह गट ‘अ’मध्ये असलेला भारत रविवारी येथील बायुमास ओव्हल येथे होणाऱ्या कॅरिबियन संघाविऊद्धच्या लढतीने आपली मोहीम सुरू करेल.
भारताने 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या पहिल्या 19 वर्षांखालील विश्वचषकात विजय मिळवला होता. त्यांनी अंतिम सामन्यात इंग्लंडला सात गड्यांनी हरवले होते. पहिल्या दिवशीच्या सामन्यांमध्ये गेल्या विश्वचषकात उपांत्य फेरीत पोहोचलेल्या ऑस्ट्रेलियाचा सामना गट ‘ड’मध्ये स्कॉटलंडशी होईल, तर 2023 चा उपविजेता इंग्लंडचा सामना गट ‘ब’मध्ये आयर्लंडशी होईल.
शनिवारच्या इतर सामन्यांमध्ये सामोआ विऊद्ध नायजेरिया, बांगलादेश विऊद्ध नेपाळ, पाकिस्तान विऊद्ध अमेरिका आणि न्यूझीलंड विऊद्ध दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. 16 संघांचा समावेश असलेली ही स्पर्धा चार गटांत विभागली गेली आहे, प्रत्येक गटातील आघाडीचे तीन संघ सुपर सिक्स टप्प्यात पोहोचतील. तिथून प्रत्येक सुपर सिक्स गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत पोहोचतील आणि 2 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्याने स्पर्धेचा शेवट होईल.
दक्षिण आफ्रिकेतील 2023 च्या स्पर्धेतील अंतिम सामन्यात शफाली वर्माच्या नेतृत्वाखालील भारताने इंग्लंडवर मिळवलेला विजय हा महिला क्रिकेटसाठी एक ऐतिहासिक क्षण होता. त्या संघात भारतीय वरिष्ठ संघातून सध्या खेळणाऱ्या तितस साधू, श्वेता सेहरावत आणि मन्नत कश्यप, पार्श्ववी चोप्रा आणि अर्चना देवी या फिरकीपटूंचा समावेश होता. या वर्षाच्या अखेरीस एकदिवसीय सामन्यांची विश्वचषक स्पर्धा भारतात होणार असल्याने निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील संघातील खेळाडू या संधीचा फायदा घेऊन वरिष्ठ संघात झेप घेण्यास उत्सुक असतील. आशादायक खेळाडूंमध्ये हैदराबादची आक्रमक फलंदाज त्रिशा जी. हिचा समावेश असून या संघात डावखुरी फिरकी गोलंदाज पाऊनिका सिसोदिया, सोनम यादव आणि आयुषी शुक्ला यांचा समावेश आहे.