For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अपराजित राजस्थानचा दबावाखालील गुजरातशी आज सामना

06:55 AM Apr 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
अपराजित राजस्थानचा दबावाखालील गुजरातशी आज सामना
Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

Advertisement

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज बुधवारी अपराजित असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना दबावाखाली असलेल्या गुजरात टायटन्सशी होणार असून यावेळी यशस्वी जैस्वाल आपल्या बॅटचा प्रताप दाखविण्यास उत्सुक असेल. राजस्थानने चार सामन्यांत सलग चार विजय नोंदवले आहे. मात्र राष्ट्रीय संघातर्फे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जैस्वालला चार सामन्यांत केवळ 39 धावा करता आल्या आहेत.

जर जैस्वाल फॉर्ममध्ये आला, तर ते राजस्थानला विलक्षण दिलासा देऊन जाईल. कारण त्याचा सलामीचा जोडीदार जोस बटलर रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरविऊद्धच्या नाबाद शतकासह फॉर्ममध्ये परतला आहे. संजू सॅमसनने संघाचे नेतृत्व करताना त्यास शोभेलशी कामगिरी केली आहे. त्याने चार सामन्यांतून दोन अर्धशतकांसह 178 धावा केल्या आहेत. पण रियान परागची फलंदाजीतील कामगिरी ही राजस्थानसाठी एक सुखद धक्का ठरली आहे. गुवाहाटीचा हा अष्टपैलू खेळाडू दोन नाबाद अर्धशतकांसह 185 धावा काढून स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

Advertisement

त्यांच्या शिमरॉन हेटमायर आणि ध्रुव जुरेल या खेळाडूंनी मधल्या फळीत अधिक योगदान देण्याची गरज आहे. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि नांद्रे बर्गर तसेच लेगस्पिनर यजुवेंद्र चहल यांच्या रूपाने राजस्थानकडे चांगला मारा आहे. चहलने आठ बळी घेताना उत्कृष्ट कामगिरी केली असून तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. पण रविचंद्रन अश्विनचा खराब फॉर्म आश्चर्यकारक आहे. त्याने षटकामागे आठ धावा दिलेल्या असून चार सामन्यांत त्याला फक्त एक बळी घेता आलेला आहे.

दुसरीकडे, गुजरातची मोहीम संमिश्र राहिलेली असून त्यांनी आतापर्यंतच्या पाच सामन्यांत दोन विजय आणि तीन पराभव पाहिलेले आहेत. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ बुधवारी पराभवाची हॅट्ट्रिक टाळण्याचा प्रयत्न करेल, परंतु ते सोपे जाणार नाही. लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या फलंदाजीतील खराब प्रदर्शनानंतर ते आता उसळी घेण्यास सज्ज झालेले असतील. गिलने आतापर्यंत वैयक्तिकरीत्या चांगला खेळ केलेला असून त्याने पाच सामन्यांतून 147 च्या स्ट्राइक रेटने 183 धावा केल्या आहेत.

त्याचा सलामीचा जोडीदार बी. साई सुदर्शनही चांगल्या धावा जमवत आहे, पण त्याने अद्याप स्पर्धेत अर्धशतक नोंदवलेले नाही. मागील सामन्यात त्याला रिद्धिमान साहाच्या जागी आघाडीला पाठविण्यात आले आणि बुधवारी देखील तो गिलसोबत फलंदाजीला उतरेल अशी अपेक्षा आहे. अनुभवी मोहित शर्मा आणि उमेश यादव यांनी गुजरातसाठी गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे, परंतु ते पंजाब किंग्जविरुद्धच्या थरारक लढतीत शशांक सिंग आणि आशुतोष शर्मा यासारख्या खेळाडूंसमोर निप्रभ ठरले. अझमतुल्ला उमरझाई, रशिद खान आणि नूर अहमद या अफगाण त्रिकुटानेही आपला खेळ उंचावण्याची गरज आहे.

संघ : राजस्थान रॉयल्स-संजू सॅमसन (कर्णधार), जोस बटलर, शिमरॉन हेटमायर, यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल, रियान पराग, डोनोवन फरेरा, कुणाल राठोड, रविचंद्रन अश्विन, कुलदीप सेन, नवदीप सैनी, केशव महाराज, संदीप शर्मा, ट्रेंट बोल्ट, यजुवेंद्र चहल, आवेश खान, रोवमन पॉवेल, शुभम दुबे, टॉम कोहलर-कॅडमोर, आबिद मुश्ताक, नांद्रे बर्गर.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, रॉबिन मिन्झ, केन विल्यम्सन, अभिनव मंधार, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, अजमतुल्ला ओमरझाई, शाहऊख खान, जयंत यादव, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी, सुशांत मिश्रा, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, साई किशोर, उमेश यादव, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा आणि मानव सुतार.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.

थेट प्रक्षेपण :

Advertisement
Tags :

.