For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

99,99,999 मूर्ती असणारे उनाकोटी

06:37 AM Jun 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
99 99 999 मूर्ती असणारे उनाकोटी
Advertisement

ईशान्य भारतातील राज्य असलेल्या त्रिपुरात उनाकोटी नावाचे स्थळ आहे. जंगलांनी वेढलेल्या या दुर्गम पर्वतीय भागात देवी-देवतांच्या 99 लाख 99 हजार 999 मूर्ती निर्माण करण्यात आल्या आहेत. या मूर्ती कधी आणि कुणी निर्माण केल्या, कुठल्या राजाच्या देखरेखीत हे काम झाले होते हे आजही रहस्य आहे. परंतु येथील नैसर्गिक सौंदर्य आणि भगवान शिवाला समर्पित हे स्थळ अत्यंत मनमोहक आहे. उनाकोटी येथील या प्राचीन मूर्तींना जागतिक वारसास्थळात स्थान मिळवून देण्यासाठी पुरातत्व विभाग आणि त्रिपुरा सरकार एकत्रितपणे प्रयत्न करत आहे.

Advertisement

त्रिपुरा आणि बांगलादेशच्या सीमेवर कैलाशहर आहे. येथून 10 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलांमध्ये वसलेले आहे उनाकोटी. याच मार्गावरून एक कोटी देवी-देवता काशी येथे पोहोचले होते अशी मान्यता आहे. इतक्या दुर्गम आणि एकांत असलेल्या ठिकाणी कुणी आणि कधी पर्वतीय खडकांना कोरून इतक्या मूर्ती निर्माण केल्या याचे रहस्य अद्यात अबाधित आहे.

दुर्गम भागात या स्थळाच्या निर्मितीची कथा रहस्यमय आहे. कुठलाही इतिहास या रहस्याची उकल करू शकलेला नाही. कुठल्या कालखंडात, कुठल्या युगात येथे मूर्ती साकारण्यात आल्या हेच माहित नाही. इतक्या साऱ्या भव्य मूर्ती कधीच एकाच ठिकाणी देशाच्या कुठल्याही कोपऱ्यात दिसून आलेल्या नाहीत.

Advertisement

पाल साम्राज्यादरम्यान हे स्थळ निर्माण झाल्याचे काही लोक मानतात, तर 8 व्या-9 व्या शतकात हे स्थळ निर्माण झाल्याचे काही जण सांगतात. येथे निर्मित मूर्ती बौद्ध संस्कृतीने प्रभावित असल्याचे काही लोक मानतात. परंतु तरीही कुणीच ठोस दावा करू शकत नाही.

भोलेनाथ याच मार्गाने गेले काशीला

उनाकोटीविषयी अनेक वदंता आहे. भगवान शिव अनेक देवीदेवतांसोबत येथून काशीला जात होते. याचदरम्यान रघुनंदन पर्वतावरून ते गेले, उनाकोटीला पूर्वी रघुनंदन पर्वत या नावाने ओळखले जायचे. रात्रीची वेळ असल्याने सर्व देवीदेवता थकून गेले होते. तेव्हा भगवान शंकराने सर्वांनी रात्री रघुनंदन पर्वतावर आराम करावा आणि सूर्योदय होताच वाराणसीसाठी प्रस्थान करू असे सांगितले होते. परंतु दुसऱ्या दिवशी सूर्योदयासमयी कुठल्याही देवी-देवतेला जाग आली नाही.  केवळ भगवान शिव यांनाच जाग आली, हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी शाप देऊन सर्वांना दगड करून टाकल्याची लोककथा त्रिपुरामध्ये प्रचलित आहे. उनाकोटीविषयी अनेक लोककथा प्रचलित असून लोक त्या मानतात.

उनाकोटीचा अर्थ एक कोटीपेक्षा एक कमी

उनाकोटीमध्ये दगडांना कापून पर्वतांमध्ये मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या मूर्ती कधी आणि कशा निर्माण करण्यात आल्या हे सांगणे अत्यंत अवघड आहे. तर उनाकोटी शब्द हा बंगाली भाषेतील असून याचा अर्थ एक कोटीपेक्षा एक कमी असा होतो असे त्रिपुरा विद्यापीठातील इतिहासाचे प्राध्यापक डॉ. सुकेंदू देववर्मन यांनी सांगितले आहे.

पूर्ण खोरेच वाटते मंदिराचा हिस्सा

उनाकोटीचे पूर्ण खोरे एका विशाल मंदिराप्रमाणे दिसते. सुमारे एक किलोमीटरच्या कक्षेत फैलावलेल्या पर्वतांवर जिथवर नजर जाते तिथवर दगडांमध्ये कोरण्यात आलेल्या देवी-देवतांच्या प्राचीन मूर्ती दिसून येतात. येथे चतुर्मुखी गणेश, दुर्गामाता, लक्ष्मीमातेसमवेत अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. याचबरोबर येथे रावणाची मूर्तीही दिसून येईल, ज्यात हातात धनुष्य-बाण घेऊन लक्ष्यभेद करू पाहणारा रावण दिसून येतो. उनाकोटी येथे पोहोचल्यावर लोकांना वेगळीच अनुभूती होते. नैसर्गिक सौंदर्याने भरपूर या स्थळाच्या चहुबाजूला पर्वत असून घनदाट वृक्षसंपदा आहे. हा भाग अत्यंत घनदाट जंगलांमध्ये वसलेला असून अत्यंत दुर्गम आहे. वेगवेगळ्या काळात या मूर्ती निर्माण केल्या असाव्यात असेही मानले जाते.

सीताकुंडात स्नान केल्यास मिळते पुण्य

भगवान शिवाच्या अनेक मूर्ती येथे दिसून येतात. येथील सर्वात मोठी मूर्ती भगवान शिवाचीच आहे. तसेच या मूर्तीकडे नंदी देखील आहे. बांगलादेश आणि शेजारील राज्यांमधून अनेक लोक येथे येतात आणि पूजा करतात. येथे पोहोचल्यावर मनाला वेगळीच शांतता मिळत असते. उनाकोटीमध्ये मोठमोठ्या मूर्तींदरम्यान छोट्या मूर्तीही दिसून येतात. उनाकोटीनजीकच सीता पुंड असून त्यातून जलप्रवाह बाहेर पडतो. या ठिकाणी स्नान केले तर पुण्य लाभते अशी धार्मिक मान्यता आहे. याचमुळे येथे येणारे लोक या कुंडात स्नान अवश्य करतात.

शिल्पकाराविषयी कहाणी

स्थानिक लोकांदरम्यान आणखी एक कहाणी प्रचलित आहे. कालू नावाचा एक शिल्पकार होता, जो भगवान शिव आणि माता पार्वती यांच्यासोबत कैलास पर्वतावर जाऊ इच्छित होता, परंतु हे शक्य नव्हते. पण शिल्पकाराच्या हट्टामुळे भगवान शिव यांनी त्याला एका रात्रीत एक काटी देवी-देवतांच्या मूर्ती तयार केल्यास स्वत:सोबत कैलासास नेईन असे सांगितले होते. हे ऐकताच शिल्पकार ताबडतोब कामाला लागला आणि त्याने जलदपणे मूर्तींची निर्मिती सुरू केली. त्याने पूर्ण रात्र मूर्ती साकारण्याचे काम केले, परंतु सकाळी जेव्हा मूर्तींची मोजणी झाली तेव्हा एक कोटीपेक्षा एक मूर्ती कमी असल्याचे कळले. याचमुळे त्या शिल्पकाराला भगवान शिवासोबत कैलासास जाता आले नाही अशीही कहाणी आहे.

 आणखी एक कहाणी प्रचलित

आणखी एक कहाणीनुसार कलियुगाच्या प्रारंभी देवी-देवतांनी पृथ्वी सोडून स्वर्गात जाण्याचा निर्णय घेतला. कलियुगात पृथ्वी राहण्यायोग्य नसेल हे त्यांना ठाऊक होते. स्वत:च्या मूर्ती पृथ्वीवर सोडून जाण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून ज्यांना आशीर्वाद घ्यायचा आहे, त्यांना घेता यावा अशीही कहाणी प्रचलित आहे.

अंगकोरवाट सारख्या मूर्ती

रघुनंदन हिल्सवर असलेल्या मूर्ती कंबोडियातील अंगकोरवाटमध्ये निर्मित मूर्तींप्रमाणेच आहेत. प्रसिद्ध इतिहासकार पन्नालाल यांनी या मूर्तींची तुलना कंबोडियाच्या अंगकोरवाटशी केली आहे. या मूर्ती अत्यंत दुर्लभ असून बंगालच्या पाला साम्राज्यावेळी उनाकोटी शिवभक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान होते. असे म्हणत पन्नालाल रॉय यांनी या मूर्तींचे संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे म्हणत अनेक मूर्ती हवामान आणि अन्य कारणांमुळे खराब झाल्याचे सांगितले आहे. परंतु पुरातत्व विभागाने हे स्थळ स्वत:च्या ताब्यात घेतल्यापसून येथील मूर्ती वाचविण्यासाठी गंभीर प्रयत्न सुरू झाले आहेत.

एप्रिलमध्ये आयोजित होतो मेळा

पर्वतीय भाग असल्याने पावसाळ्यात येथील अनेक मूर्तींवरून झरे वाहत असतात. त्रिपुराचे सरकार उनाकोटी येथील या मूर्तींच्या आसपास पर्यटन स्थळ विकसित करु पाहत आहे. येथे दोन प्रकारच्या मूर्ती आहेत. पर्वतांवर कोरण्यात आलेल्या तसेच दगड कापून तयार करण्यात आलेल्या मूर्ती येथे दिसून येतात. येथील भगवान शिव यांची मूर्ती सुमारे 30 फूट उंच आहे. या मूर्तीनजीकच नंदी बैलाच्या तीन मूर्ती देखील आहेत. यातील काही खास मूर्तींनजीक लोकांना जाण्याची अनुमती नसते. एप्रिल महिन्यात येथे यात्रेचे आयोजन होते, ज्याला अशोकाष्टमीचा मेळा असे म्हटले जाते. या मेळ्यात सहभागी होण्यासाठी दूर दूरवरून लोक येत असतात. उनाकोटी येथे निर्मित भगवान शिवाच्या मूर्तीला उनाकोटिश्वरा काल भैरव नावानेही संबोधिले जाते. ही मूर्ती सुमारे 30 फूट उंच आहे.

कसे पोहोचाल?

त्रिपुराची राजधानी अगरतळा देशाच्या विविध शहरांसाठी विमानसेवेद्वारे जोडली गेलेली आहे. उनाकोटी जिल्ह्याचे मुख्यालय कैलाशहर हे अगरतळापासून 178 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून उनाकोटीसाठी दररोज बससेवा संचालित केली जाते. येथे पोहोचण्यासाठी नजीकचे रेल्वेस्थानक एनएफ रेल्वेचे कुमारघाट असून ते कैलाशहरापासून 26 किलोमीटर अंतरावर आहे.  याचबरोबर गुवाहाटी, शिलाँग, सिलचर आणि राज्याच्या अनेक जिल्हे आणि उपविभागीय शहरांमधूनही कैलाशहरसाठी दररोज बस धावत असते. कैलाशहरपासून उनाकोटी केवळ 8 किलोमीटर अंतरावर आहे, जेथे पोहोचल्यावर अद्भूत अनुभव प्राप्त होतो. तेथील नैसर्गिक सौंदर्य मंत्रमुग्ध करणारे आहे. उनाकोटी येथे खाली आणि वर चढण्यासाठी जिने तयार करण्यात आले आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी रेलिंग तयार करण्यात आले आहेत. पूर्ण स्थळाला पुरातत्व विभागाने संरक्षक भिंतीद्वारे वेढले आहे. तर त्याबाहेर जवानांचा पहारा असतो. पर्यटकांना दिवसात एका निश्चित कालमर्यादेतच येथे येण्याची अनुमती असते. उनाकोटीच्या सुमारे 10 किलोमीटरच्या परिघात कुठलेच हॉटेल नाही. सरकारकडून करण्यात येणाऱ्या प्रयत्नांमुळे आता या स्थळाच्या आसपास पर्यटकांसाठी वास्तव्ययोग्य सुविधा निर्माण होत असल्याचे सांगण्यात येते.

चबीमुरा किंवा देवतामुरा

त्रिपुरातील आणखी एक स्थळ लोकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला आहे. चबीमुरा हे त्रिपुरातील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. चबीमुराच्या शिखराला देवतामुरा म्हणजेच देवतांचा पर्वत असेही म्हटले जाते. गोमती नदीच्या काठावर असलेल्या या पर्वतावर अनेक मूर्ती कोरण्यात आल्या आहेत. दरवर्षी जानेवारी महिन्यात येथे मेळा आयोजित होते आणि लोक त्यावेळी पवित्र गोमती नदीत स्नान करत असतात.

उमाकांत कुलकर्णी

Advertisement
Tags :

.