अहमदाबाद... क्रीडा राजधानीचं स्वप्न!
सध्या अहमदाबाद झपाट्यानं कामाला लागलंय ते 2030 च्या राष्ट्रकुल खेळांचं आयोजन डोळ्यांसमोर ठेवून...त्याअंतर्गत विविध क्रीडा पायाभूत साधनसुविधांच्या उभारणीला वेग मिळालाय. या शहरानं आधीच जगातील सर्वांत मोठा क्रिकेट स्टेडियम उभारण्याचा मान मिळविलाय... ही सारी तयारी चार वर्षांनी होणाऱ्या क्रीडास्पर्धेसाठीची असली, तरी त्यामागं महत्त्वाकांक्षा दडलीय ती 2036 च्या ऑलिम्पिकचं आयोजन करण्याची अन् अहमदाबादला देशाची क्रीडा राजधानी म्हणून पुढं आणण्याची...
26 नोव्हेंबर...स्थळ ग्लास्गो...‘कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्ली’नं अधिकृतरीत्या जाहीर केलं की, 2030 सालचे 100 वे राष्ट्रकुल खेळ (सीडब्ल्यूजी) आयोजित करण्याचा मान देण्यात आलाय तो भारताच्या अहमदाबाद शहराला...मग सारा गुजरात अक्षरश: जल्लोषात बुडाला...त्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली आणि ती म्हणजे अहमदाबाद-गांधीनगर पट्टा साधनसुविधांच्या दृष्टीनं प्रचंड प्रगती करेल, तिथं पाया घालण्यात येईल तो डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या विविध बांधकामांचा. ‘कॉमनवेल्थ स्पोर्ट जनरल असेंब्ली’नं या जुळ्या शहरांच्या विकासाची गती बदलण्याचं काम इमाने इतबारे पार पाडलंय ते हिरवा झेंडा दाखवून...
राज्यातील अधिकारी ठामपणे, आत्मविश्वासानं सांगतात की, बहुतेक क्रीडा संकुलं पूर्ण करण्याचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळण्यात येईल. अहमदाबादनं ‘कॉमनवेल्थ गेम्स’चे हक्क मिळविल्यानंतर गुजरातचे प्रधान सचिव (क्रीडा, युवा व्यवहार व सांस्कृतिक) अश्विनी कुमार यांनी म्हटलंय, ‘येऊ घातलेल्या दिवसांत भारताची क्रीडा क्षेत्रातील राजधानी बनण्याचा मान मिळेल तो या शहराला. सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह आणि पोलिस अकादमी स्पोर्ट्स हब यांच्या बांधकामाला प्रारंभ होईल तो एप्रिल, 2026 साली नि त्यांच्यावर शेवटचा हात फिरविण्यात येईल तो नोव्हेंबर-ंडिसेंबर 2028 मध्ये वा 2029 सालच्या सुरुवातीला. निधीची व्यवस्था करण्यात आलीय व आयोजन समितीची निवड होईल ती महिन्याभरात’...
सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्ह केंद्रस्थान...
सारं चक्र फिरेल ते सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्ट्स एन्क्लेव्हच्या भोवती. त्याची रचना करण्यात येईल ती गुजरातच्या क्रीडा जगताच्या भविष्याचा विचार करूनच. त्याच्यात समावेश असेल तो ‘एरिना’चा, जलतरण तलावाचा, टेनिस कोर्टांचा, प्रशिक्षणासाठीच्या सोयींचा आणि अॅथलीट नगरीचा...कराई पोलिस अकादमी संकुल आयोजन करेल ते अॅथलेटिक्स, नेमबाजी व अन्य खेळांचं. गुजरात राज्याच्या दृष्टीनं राष्ट्रकुल खेळांना फार फार महत्त्व आहे ते साधनसुविधांच्या दृष्टीनं. कारण खेळ संपल्यानंतर देखील त्यांचा वापर होईल. सध्या विश्वातील अनेक स्पर्धा संयुक्तरीत्या आयोजित करण्याचं पेंव फुटलंय. परंतु 2030 सालचे खेळ मात्र अहमदाबाद-गांधीनगर ‘क्लस्टर’मध्येच होतील...
या पार्श्वभूमीवर खेळाडूंना मदत होईल ती जलद हालचाल करण्याच्या बाबतीत. खेरीज त्यांच्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहतुकीवरील बोजा देखील फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. ‘गेम्स व्हिजन कन्सेप्ट अँड लेगसी-कॉमनवेल्थ गेम्स, 2030’ हा दस्तऐवज ‘सीडब्ल्यूजी’ समितीला सादर करण्यात आलाय. फक्त सायकलिंगचं आयोजन ‘स्टेच्यू ऑफ युनिटी’ (केवाडियाजवळ), तर महिलांच्या क्रिकेटचं बडोद्यात करण्यात येईल. विश्वातील सर्वांत मोठा क्रिकेट स्टेडियम म्हणून गणल्या गेलेल्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळांचा उद्घाटन व समारोप सोहळा रंगेल आणि त्यासाठी करावी लागेल ती जय्यत तयारी...
भविष्याचा विचार करून तयारी...
गुजरात राज्यानं 2022 सालच्या राष्ट्रीय खेळांचं आयोजन केलं होतं अन् सध्या त्या राज्याचे जोरदार प्रयत्न चाललेत ते नेटबॉल, लाँग बाऊल्स, कब•ाr, योगासनांसारख्या प्रकारांचं विश्वाला दर्शन घडविण्यासाठी...अहमदाबाद-गांधीनगर जुळ्या शहरांची तयारी चाललीय ती वर्षाचे 365 ही दिवस विविध खेळांचं आयोजन करण्याच्या दृष्टीनं. त्यासाठी ‘हाय पर्फोमन्स लॅब्स’, कम्युनिटी स्पेसिस, विद्यापीठ पायाभूत सुविधा यांच्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आलंय...‘गुजरात क्रेडाई’चे अध्यक्ष तेजस जोशी यांच्या शब्दांत सांगायचं झाल्यास राष्ट्रकुल खेळ म्हणजे अहमदाबाद शहरासमोर असलेलं एक फार मोठं आव्हान. या खेळांमुळं शहरातील साधनसुविधांचा पूर्णपणे कायापालट घडल्याचं चित्र पाहायला मिळेल. शिवाय रस्ते व कनेक्टिव्हिटी यांच्यात भरपूर सुधारणा होतील’...
सोयी-सुविधांत वाढ...
विविध तारांकित हॉटेलांतील खोल्यांची गरज 20 हजारांवर पोहोचणार असून स्थलांतरितांमुळं घरांच्या संख्येत देखील वृद्धी होईल. अहमदाबाद-गांधीनगर पट्ट्यात सध्या 4520 तारांकित खोल्या असून 3 हजारांची त्यात भर घालण्याचं नियोजन करण्यात आलंय. त्यात समावेश असेल तो 1500 पंचतारांकित खोल्यांचा. शिवाय विद्यापीठातील हॉस्टेल्सचा दर्जा खेळांच्या वेळी पाहुण्यांच्या राहण्याची सोय व्हावी म्हणून वाढविण्यात येईल...सध्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ दरवर्षी हाताळतोय ते 13.4 दशलक्ष प्रवाशांना. ही संख्या 2026 पर्यंत दुप्पट करण्यात येईल ती नवीन टर्मिनलच्या साहाय्यानं...
ऑलिम्पिकवर नजर...
पण खरं सांगायचं झाल्यास गुजरात राज्याचा डोळा आहे तो 2036 सालच्या ऑलिम्पिक खेळांवर. या पार्श्वभूमीवर येऊ घातलेल्या दशकात क्षमता आहे ती राज्याला अक्षरश: 360 अंशांत फिरविण्याची. गुजरातचं खेळांसाठीचं अंदाजपत्रक गेल्या 20 वर्षांत पोहोचलंय ते चक्क 521 कोटी रुपयांवर...अॅथलीट्सचा दर्जा सुधारण्यावर जास्तीत जास्त भर देण्यात येईल. त्यादृष्टीनं क्रीडा गुणवत्तेचा शोध घेणाऱ्या ‘खेल महाकुंभ’सारख्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं अन् त्यात भाग घेतला होता तो देशभरातील 70 लाख खेळाडूंनी. खेरीज अॅथलीट्सना साहाय्य करणारी ‘शक्तिदूत’सारखी योजना अंमलात आणली गेलीय...
विविध उपक्रमांची आखणी...
कुठलीही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी अत्यंत गरज असते ती त्यात सर्वसामान्य लोकांनी भाग घेण्याची आणि त्याला राष्ट्रकुल खेळ देखील अपवाद नाहीत...‘अॅक्टिव्ह गुजरात’सारख्या कार्यक्रमांच्या साहाय्यानं नदीच्या काठावरील प्रदेश व बगिचे यांचं रुपांतर करण्यात येईल ते ‘फिटनेस झोन्स’मध्ये. ‘नॅशनल सर्व्हिस स्कीम’ (एनएसएस) व ‘नॅशनल कॅडेट कोअर’ (एनसीसी) यांच्या माध्यमातून विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना ‘यूथ अॅम्बॅसेडर्स’ म्हणून सामावून घ्sाण्यात येईल. 2030 पर्यंत गुजरात राज्याची योजना आहे ती 10 हजार स्वयंसेवक तयार करण्याची आणि 30 हजार लोकांना रोजगार पुरविण्याची...
क्रिकेट, हॉकीच्या पुनरागमनासह होईल भव्य स्पर्धा...
भारतीयांचे आवडते खेळ क्रिकेट (टी-20) नि हॉकी यांचा समावेश दोन ‘कोअर स्पोर्ट्स’ म्हणून 2030 सालच्या राष्ट्रकुल खेळांत करण्यात आलाय. यजमान देशाला ‘कोअर स्पोर्ट्स’ म्हणून दोन खेळांचा नियमांनुसार अंतर्भाव करावा लागतो. त्यानुसारच त्यांना स्थान देण्यात आलंय...पुरुषांच्या क्रिकेटनं राष्ट्रकुल खेळांत पुनरागमन केलंय ते तब्बल 32 वर्षांनी. क्वालालंपूर इथं 1998 साली झालेल्या खेळांत सहभागी झालेल्या संघात समावेश होता तो सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळेसारख्या दिग्गजांचा नि एकदिवसीय लढतीच्या अंतिम फेरीत त्यांच्यावर मात केली होती ती स्टीव्ह वॉच्या ऑस्ट्रेलियानं...महिलांच्या टी-20 स्पर्धेनं पदार्पण केलं होतं 2022 मध्ये बर्मिंगहॅमनं आयोजित केलेल्या खेळांत. क्रिकेट व हॉकीपुढं ‘रग्बी सेव्हन्स’चं शहाणपण चाललं नाही...
‘कोअर’ खेळ म्हणून समावेश असतो तो 10 प्रकारांचा नि त्यातील आठ खेळांची निवड करण्यात येते ती या स्पर्धेची जागतिक प्रशासकीय संस्था ‘कॉमनवेल्थ स्पोर्ट’कडून. खेळांचा अंतिम कार्यक्रम एप्रिल, 2026 मध्ये जाहीर करण्यात येईल. 2022 मध्ये बर्मिंगहॅम इथं झालेल्या नि 2026 मध्ये ग्लास्गो इथं होणाऱ्या खेळांत समाविष्ट न करण्यात आलेल्या सर्व क्रीडाप्रकारांना अहमदाबादनं स्थान दिलंय. त्यामुळं दर्शन घडेल ते एका फार मोठ्या स्पर्धेच्या आयोजनाचं....बर्मिंगहॅमनं नेमबाजी व तिरंदाजीला वगळलं होतं, तर ग्लास्गोनं बॅडमिंटन, क्रिकेट, हॉकी, नेमबाजी, स्क्वॅश, टेबल टेनिस आणि कुस्ती अशा महत्त्वाच्या नऊ खेळांना स्थान दिलेलं नाहीये. 2030 मधील राष्ट्रकुल खेळांत झळकतील एकूण 17 प्रकार अन् त्यातील 10 खेळांना ‘कोअर स्पोर्ट्स’चा मान देण्यात आलाय...
राष्ट्रकुल खेळांसाठीची महत्त्वाची केंद्रं...
स्थळ होणारे खेळ
पेठापूर सायकलिंग, बीएमएक्स रेसिंग, सायकलिंग रोड, सायकलिंग बीएमएक्स फ्रीस्टाईल, सायकलिंग ट्रॅक
भारतीय क्रीडा प्राधिकरण प्रशिक्षण केंद्र हॉकी
स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ गुजरात एरिना बास्केटबॉल, हॅँडबॉल
गुजरात पोलिस अकादमी अॅथलेटिक्स, मॅरेथॉन, जलतरण, फुटबॉल, वेटलिफ्टिंग, रग्बी, नेमबाजी, ट्रायथलॉन
गिफ्ट सिटी अॅथलेटिक्स, मॅरेथॉन, चालण्याची शर्यत, बीच व्हॉलीबॉल
नरानपुरा क्रीडा संकुल बॅडमिंटन, ऱ्हदमिक जिम्नेस्टिक्स, वॉटर पोलो
साऊथ वेस्ट अहमदाबाद स्पोर्ट्स एरिना तिरंदाजी, टेबल टेनिस, बॉक्सिंग, तायक्वांदो, कुस्ती, तलवारबाजी, ज्युदो, स्केट बोर्डिंग
एका एरिना फुटबॉलची प्राथमिक फेरी
एसव्हीपी स्पोर्ट्स एन्क्लेव्ह जलतरण, बास्केटबॉल, क्रिकेट, आर्टिस्टिक जिम्नेस्टिक्स, 3×3 बास्केटबॉल, ट्रेम्पोलिन, डायव्हिंग, टेनिस, व्हॉलीबॉल, आर्टिस्टिक स्विमिंग, स्पोर्ट क्लाईम्बिंग
संकलन : राजू प्रभू