विनाअनुदानित शाळा शिक्षकांचे अधिवेशनकाळात आंदोलन
राज्यभरातील शिक्षक होणार सहभागी
बेळगाव : राज्यातील 1995 नंतरच्या प्राथमिक, माध्यमिक व पदवीपूर्व कॉलेजना राज्य सरकारकडून अनुदान देण्यात आलेले नाही. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासोबत घर चालविण्यासाठी रोजंदारीवर काम करण्याची वेळ आली आहे. काही शिक्षक निवृत्तीच्या जवळ पोहोचले आहेत. त्यामुळे आतातरी अनुदान द्या, या मागणीसाठी बेळगावच्या सुवर्णविधानसौध येथे येत्या अधिवेशनादरम्यान आंदोलन करण्याचा इशारा अखिल कर्नाटक विनाअनुदानित खासगी शिक्षण संस्था महासंघाच्यावतीने देण्यात आला आहे. मंगळवारी बेळगावच्या कन्नड साहित्य भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. मराठी, कन्नड, उर्दू माध्यमातील शाळांना मागील 35 वर्षांपासून कोणतेही अनुदान देण्यात आलेले नाही.
यामुळे शिक्षकांना तुटपुंज्या पगारावर सेवा द्यावाr लागत आहे. काही संस्थांमध्ये पगारच दिला जात नसल्यामुळे कुटुंब कसे चालवायचे? असा प्रश्न शिक्षकांपुढे आहे. शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी राज्य सरकारकडून दरवर्षी लाखोंचा निधी खर्च केला जात आहे. या निधीतून जर विनाअनुदानित शाळांना अनुदान दिल्यास विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सोयीचा होणार आहे. 8 डिसेंबरपासून बेळगावच्या सुवर्णविधानसौध येथे कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होणार असून या दरम्यान संघटनेच्यावतीने राज्यभरातील शिक्षक आंदोलन करणार असल्याची माहिती देण्यात आली. यावेळी कर्नाटक माध्यमिक शाळा नोकर संघाचे राज्याध्यक्ष एस. एस. मठद, राज्याचे मुख्य सचिव सलिम कित्तूर, विनाअनुदानित शाळा शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष रेवणसिद्धप्पा गुरुनाथ रेड्डी, इराण्णा व्हरगीनमठ, एम. एम. कोरीशेट्टी, व्ही. व्ही. होसूर, जिल्हाध्यक्ष मारुती अजानी यांसह बेळगाव, विजापूर, बागलकोट येथील विनाअनुदानित शिक्षक सहभागी झाले होते.