सुरक्षा परिषदेत भारताला स्थान न मिळाल्यास ‘युएन’ कमकुवत
फिनलंडकडून भारताच्या सदस्यत्वाला समर्थन
वृत्तसंस्था/ हेलसिंकी
फिनलंडचे अध्यक्ष एलेक्झेंडर स्टब यांनी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेत भारताला सामील करण्याच्या मागणीचे समर्थन केले आहे. भारताला सुरक्षा परिषदेत स्थान न मिळाल्यास संयुक्त राष्ट्रसंघ (युएन) कमकुवत होत राहणार आहे. जागतिक स्थिरता आणि विकासात भारताची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे म्हणत स्टब यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विदेशमंत्री एस. जयशंकर यांचा उल्लेख केला आहे. अमेरिका तसेच चीनसोबत भारत पुढील महाशक्ती ठरणार असल्याचे मला वाटते. पंतप्रधान मोदी असो किंवा विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या माध्यमातून भारत सध्या जे करतोय, त्यातून रणनीतिक दृष्टीकोन दिसून येतो, यामुळे जगभरात भारताला सन्मान मिळत असल्याचे वक्तव्य स्टब यांनी केले आहे.
महासभेत मी दोनवेळा भारताला सुरक्षा परिषदेत स्थान मिळणे आवश्यक असल्याची भूमिका मांडली आहे. सुरक्षा परिषदेत विस्तार व्हावा असे माझे मानणे आहे. सुरक्षा परिषदेचे सदस्यत्व कमीतकमी दुप्पट केले जावे. भारतासारखा देश सुरक्षा परिषदेत सामील नसणे चुकीचे आहे. दक्षिण अमेरिकेतील एक, आफ्रिकेतील दोन आणि आशियातील दोन सदस्यांना सुरक्षा परिषदेत सामील केले जावे अशी सूचना स्टब यांनी केली आहे.
युएनला दिला इशारा
भारतासारख्या देशाला जागतिक संस्थेत स्थान नसल्याने संस्था कमकुवत होत राहणार आहे. आंतरराष्ट्रीय व्यवस्थेला आकार देण्यात फिनलंड भारताला एक महत्त्वपूर्ण भागीदाराच्या स्वरुपात पाहतो. बहुपक्षीय व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि ती यशस्वी ठरण्यासाठी भारताला व्यवस्थेत सामील करणे आवश्यक असल्याचे उद्गार स्टब यांनी काढले आहेत.