उपांत्य सामन्यांसाठी पंच जाहीर
वृत्तसंस्था / दुबई
2025 च्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यांसाठी आयसीसीने पंच आणि सामना अधिकाऱ्यांची घोषणा केली. मंगळवारी दुबईत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला उपांत्य सामना तर बुधवारी लाहोरमध्ये द. आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना खेळविला जाईल.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी ख्रिस गॅफेनी आणि रिचर्ड इलिंगवर्थ हे मैदानावरील पंच म्हणून राहतील. मायकेल गॉ तृतिय पंच, अॅड्रीयन होल्डस्टॉक चतुर्थ पंच, सामनाधिकारी अॅन्डी पायक्रॉप्ट यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
द. आफ्रिका आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या दुसऱ्या उपांत्य सामन्यासाठी कुमार धर्मसेना आणि पॉल रायफल हे मैदानावरील पंच म्हणून राहतील. जोयल विल्सन तृतिय पंच, एहसान रझा चतुर्थ पंच, रंजन मदुगुले सामना अधिकारी म्हणून राहतील.