Satara News: बंद असलेली CCTV प्रणाली पूर्ववत करा, शिवसेनेचे ग्रामपंचायतीला निवेदन
एखादा गुन्हा घडला तर निदर्शनास येणे अवघड आहे
उंब्रज : उंब्रजमधील बंद असलेले सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याबाबत उंब्रज ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी समाधान माने यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिंदे गटाचे शिवसैनिक रवि हजारे, सचिन जाधव,अतुल पाटील, विक्रम वाघमारे, विठ्ठल जाधव, सुहास देशमाने, निलेश भोसले, विशाल शेजवळ, निलेश संपकाळ, महेश जाधव यांनी निवेदनाद्वारे ही मागणी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
निवेदनात म्हटले आहे की, उंब्रज गावच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून जवळपास ३६ ठिकाणी कार्यांन्वित केलेली सीसीटीव्ही प्रणाली गत दोन वर्षापासून बंद अवस्थेत असल्यामुळे चोरी, महिला तसेच शाळकरी विद्यार्थिनींची छेडछाड, दरोडा, अपहरण, खून आदी प्रकारचे गुन्हे घडून उंब्रज गावात गुन्हेगारी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याचबरोबर एखादा गुन्हा घडला तर निदर्शनास येणे अवघड आहे. कॉलेज रोड परिसरात सीसीटीव्ही प्रणाली नसल्यामुळे रोड रोमिओ धूम स्टाईलने दुचाकी चालवत असल्यामूळे गंभीर अपघाताबरोबरच शाळकरी विद्यार्थिनींना असुरक्षित वातावरणात शिकावे लागत आहे. या सर्व गोष्टींचा गांभीर्याने विचार करून त्वरित सीसीटीव्ही प्रणाली कार्यान्वित करून उंब्रजच्या नागरिकांची सुरक्षा जपावी अन्यथा शिवसेना शिंदे गट उग्र आंदोलन करेल असा इशारा दिला आहे.
दरम्यान, उंब्रज हे महामार्गावरील संवेदनशील व बाजारपेठेचे गाव आहे. येथे वर्दळीच्या ठिकाणी व मुख्य चौकांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा उभारने गरजेचे आहे. सध्यस्थितीत बाजारपेठेसह काही ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने पोलीसांनाही गुन्हेगारांना शोधणे कठीण झाले आहे.
सीसीटीव्ही यंत्रणा अधिक व्यापक पध्दतीने राबवल्यास वाढत्या चोऱ्या तसेच गैरकृत्य व गुन्हेगारीला आळा बसण्यास मदत होणार आहे. उंब्रज ग्रामपंचायतीने व्यापक समाजहित लक्षात घेऊन सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी संपूर्ण गावातून होत आहे.