पतीच्या खुनाची पत्नी उमाकडून अखेर कबुली
आंबिलमधून झोपेच्या गोळ्या : फेसबुक फ्रेंडच्या साथीने उशीने दाबले तोंड : तिघांना अटक
बेळगाव : खासगी सावकार व रियल इस्टेट व्यावसायिक संतोष पद्मण्णावर (वय 46) याचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. पत्नीने आपल्या फेसबुक फ्रेंडच्या मदतीने पतीला संपविल्याचे उघडकीस आले असून गुरुवारी पत्नीसह तिघा जणांना अटक करण्यात आली आहे. नाचण्याच्या आंबिलीतून झोपेच्या गोळ्या देऊन त्यानंतर उशीने नाक दाबून संतोषचा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे.
या घटनेने संपूर्ण शहरात एकच खळबळ माजली आहे. संतोष दुंडाप्पा पद्मण्णावर या खासगी सावकाराचा 9 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. हृदयाघाताने त्याचा मृत्यू झाल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी 10 ऑक्टोबर रोजी त्याच्या मृतदेहावर सदाशिवनगर येथील लिंगायत स्मशानभूमी येथे दफनविधी करण्यात आला होता. संतोषची मुलगी संजना हिने 15 ऑक्टोबर रोजी आपल्या आईसह पाच जणांविरुद्ध फिर्याद दिली होती. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक होन्नाप्पा तळवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बुधवार दि. 16 ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या परवानगीने पुरलेला मृतदेह बाहेर काढून स्मशानभूमीतच उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण केली होती. संतोषच्या पत्नीने खुनाची कबुली दिली असल्याची माहिती मिळाली आहे.
संतोषची पत्नी उमा पद्मण्णावर (वय 41) रा. अंजनेयनगर बेळगाव, तिचा फेसबुकवरील मित्र शोभराज एस. एन. उर्फ शोभित गौडा (वय 27), त्याचा मित्र पवन रामनकुट्टी (वय 27) दोघेही राहणार शनिवार पेठ, कोडगू यांना अटक केली आहे. शोभित गौडासह दोघा जणांना हुबळीत ताब्यात घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सायंकाळी या सर्व तिघा जणांना न्यायाधीशांसमोर हजर करण्यात आले. न्यायाधीशांच्या आदेशावरून त्यांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली. पत्नी उमासह पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आले होते. यामध्ये एका अज्ञाताचा समावेश होता. तो अज्ञातच शोभित गौडाचा साथीदार पवन असल्याची माहिती मिळाली आहे. सीसीटीव्ही फुटेजवरून या दोघा जणांचा संतोषच्या घरी वावर आढळून आला होता. ज्या दिवशी संतोषचा मृत्यू झाला, त्या दिवशी हे दोघे त्याच्या घरी होते. पोलिसांनी याप्रकरणी तिघा जणांना अटक केली असून पत्नीसह तिघा जणांना लवकरच पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.
उशीने श्वास गुदमरून घेतला जीव
उपलब्ध माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासून संतोष व पत्नी उमा यांच्यात वैयक्तिक कारणावरून वाद सुरू होता. फेसबुक फ्रेंड शोभित गौडाशी आपल्या पत्नीची मैत्री संतोषला खटकत होती. त्यामुळे या दोघांमधील वाद टिपेला पोहोचला होता. 9 ऑक्टोबर रोजी नाचण्याच्या आंबिलीतून झोपेच्या गोळ्या दिल्यामुळे संतोषला गाढ झोप लागली. पत्नीने प्रयत्न करूनही त्याचा जीव गेला नाही. शेवटी आपल्या फेसबुक फ्रेंडशी संपर्क साधून उमाने त्याला घरी बोलावून घेतले. त्यानंतर उशीने श्वास गुदमरून त्याचा जीव घेण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे.