‘अल्ट्राटेक’ची नजर ओरिएंट सिमेंटवर
दोन्ही कंपन्यांमधील चर्चेची अंतिम फेरी : महाराष्ट्र व तेलंगणामधील स्थान मजबूत करण्याचा अल्ट्राटेकचा प्रयत्न
वृत्तसंस्था /मुंबई
कुमार मंगलम यांनी खुलासा केला की कंपनी अल्ट्राटेक सिमेंट लवकरच एका सिमेंट व्यवसायाचे अधिग्रहण करु शकते. सिमेंट व्यवसायात अदानींशी स्पर्धा करण्यासाठी कंपनीने तयारी केली असून आगामी काळात ओरिएंट सिमेंट लिमिटेड ताब्यात घेण्याच्या हालचाली कंपनीने वाढवल्या आहेत. ओरिएंट सिमेंट खरेदी करण्यासाठी बिर्ला कंपनीचे प्रवर्तक सीके बिर्ला यांच्याशी चर्चा करण्यात येत असून ही चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे.
देशातल्या दक्षिण भाग आणि पश्चिम भागात आपले बस्तान अधिक वाढवण्यासाठी कुमार बिर्ला हे अधिक प्रयत्नशील आहेत. महाराष्ट्र व तेलंगाणामध्ये अल्ट्राटेकचे स्थान मजबूत करण्यावर कंपनीचा भर असणार आहे. याआधी गेल्या वर्षी ओरिएंट सिमेंट खरेदी करण्यासाठी या दोन कंपन्यांमध्ये चर्चा झाली होती, मात्र त्यानंतर खरेदीबाबत अंतिम निर्णय घेण्यात आला नव्हता.
मागील आठवड्यात इंडिया सिमेंट्सच्या अधिग्रहणास मान्यता
मागील आठवड्यात 27 जून रोजी, अल्ट्राटेक सिमेंटच्या संचालक मंडळाने इंडिया सिमेंटमधील 23 टक्के इक्विटी स्टेक घेण्यास मान्यता दिली. कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये याबाबत माहिती दिली होती. अल्ट्राटेकने सांगितले होते की अधिग्रहण पूर्ण करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी असणार आहे.
अल्ट्राटेक सिमेंटचे शेअर्स 0.96 टक्के घसरले
अल्ट्राटेक सिमेंटच्या शेअर्समध्ये गुरुवारी 0.96 टक्क्यांची घसरण झाली. गेल्या 5 दिवसात कंपनीचा शेअर 1.48 टक्के आणि 1 महिन्यात 18.56 टक्के वाढला आहे. त्याच वेळी, अल्ट्राटेक सिमेंटने गेल्या 1 वर्षात 39.79 टक्के परतावा दिला.
ओरिएंट सिमेंटचे समभाग 0.90 टक्के वाढले
याचदरम्यान वरील बातमीचा ओरिएंट सिमेंटवर मात्र सकारात्मक परिणाम दिसून आला. ओरिएंट सिमेंटच्या शेअर्समध्ये 0.90 टक्के वाढ दिसून आली. गेल्या 5 दिवसात कंपनीचा शेअर 19.38 टक्के आणि 1 महिन्यात 59.98 टक्क्यांनी वाढला आहे. त्याच वेळी, ओरिएंट सिमेंटने गेल्या 1 वर्षात 137.05 टक्के परतावा दिला आहे.