Ratnagiri News: उल्लास नवभारत साक्षरता कार्यक्रमाला गती
रत्नागिरी जिल्ह्याचा निकाल 99.44 टक्के
रत्नागिरी: नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत ‘उल्लास’ अभियानाने रत्नागिरी जिह्यात साक्षरतेचा एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. मागील आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये राष्ट्रीय मुक्त विद्यालय शिक्षण संस्थेने 23 मार्च रोजी घेतलेल्या ‘उल्लास’ परीक्षेचा निकाल 10 जुलै रोजी जाहीर झाला. यात रत्नागिरी जिह्याचा निकाल 99.44 टक्के इतका लक्षणीय लागला आहे. या परीक्षेत 9,800 नवसाक्षर उत्तीर्ण झाले आहेत. त्यांनी असाक्षरतेचा शिक्का पुसून काढला आहे.
या निकालामुळे कोल्हापूर शैक्षणिक विभागाची कामगिरी लक्षवेधी ठरली आहे. ज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिह्यांचा समावेश आहे. विभागाचा निकाल 99.63 टक्के लागला असून राज्यभरातील 98.75 टक्के निकालापेक्षा तो अधिक आहे.
गेल्या दोन वर्षांपासून ‘उल्लास’ अभियानात कोल्हापूर विभाग पिछाडीवर होता. मात्र, राज्य योजना कार्यालयाच्या अथक पाठपुराव्यामुळे आणि जिल्हा व तालुकास्तरावरील समित्यांच्या सक्रिय सहभागामुळे विभागाने असाक्षर नोंदणी आणि त्यांना परीक्षेस बसवण्याचे दिलेले उद्दिष्ट यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.
जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारीयांची जिल्हास्तरावरील भूमिका तर तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांची तालुकास्तरावरील भूमिका या यशात महत्वपूर्ण ठरली आहे.
मागील वर्षी कोल्हापूर विभागाला 68,872 असाक्षरांच्या नोंदणीचे उद्दिष्ट होते. यासह मागील वर्षी नोंदणी केलेले परंतु परीक्षेस बसू न शकलेले आणि सुधारणा आवश्यक असलेले असाक्षर, तसेच चालू वर्षाचे उद्दिष्ट मिळून एकूण 74,827 असाक्षरांना परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते.
प्रत्यक्षात विभागात 84,218 जणांची नोंदणी झाली आणि 83,529 जण परीक्षेस बसले. त्यापैकी 83,224 जण उत्तीर्ण झाले. केवळ 305 असाक्षरांना ‘सुधारणा आवश्यक’ असा शेरा मिळाला आहे. रत्नागिरी जिह्याच्या बाबतीत 9,337 नोंदणीचे आणि 12,094 परीक्षेस बसवण्याचे उद्दिष्ट होते.
राज्याचे योजना शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील यांनी या निकालाबाबतचे प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षेचा निकाल एनआयओएसच्या संकेतस्थळावर ऑनलाईन उपलब्ध आहे. उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र जिल्हा योजना शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत लवकरच वितरित केले जाईल.