सीरियातील बंडखोरांशी युक्रेनची मैत्री
रशियाचा प्रभाव संपताच तातडीने उचलले पाऊल : युक्रेनच्या विदेश मंत्र्यांनी घेतली जुलानीची भेट
वृत्तसंस्था/ दमास्कस
सीरियातून बसर अल-असाद यांनी पलायन करताच आणि तेथील रशियाचा दबदबा संपुष्टात येताच युक्रेन तेथे सक्रीय झाला आहे. युक्रेनचे विदेशमंत्री एंद्री सिबिहा यांनी सीरियन बंडखोरांचे नेते अबु मोहम्मद अल जुलानी यांची भेट घेतली आहे. आम्ही युक्रेनसोबत रणनीतिक भागीदारी इच्छितो. सीरिया आणि युक्रेनच्या लोकांनी एकप्रकारचे कष्ट झेलले असल्याचे सीरियाचे विदेशमंत्री असाद हसन अल शिबानी यांनी म्हटले आहे. तर सीरियाला पूर्वीपेक्षा अधिक मदतसामग्री पाठवू असे आश्वासन युक्रेनने दिले आहे.
अनेक वर्षांपर्यंत रशियाच्या हस्तक्षेपानंतर आम्ही सीरियात स्थिरता आणण्यास मदत करू शकतो असे उद्गार युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी काढले आहेत. यापूर्वी युक्रेनने सीरियात 500 टन धान्य पाठविण्याची घोषणा केली होती. युक्रेनने आता सीरियाच्या नव्या प्रशासनासोबत संबंध दृढ करण्यासाठी पुढाकार घेत रशियावर कुरघोडी केली आहे.
सीरिया हा देश आता अनेक बदलांना सामोरा जात आहे. बंडखोरांचे समर्थनप्राप्त असलेल्या सरकारने पहिल्यांदाच एका महिलेला देशाच्या मध्यवर्ती बँकेच्या प्रमुखपदी नियुक्त केले आहे. मयासा सैबरिन या देशाच्या पहिल्या महिला बँक गव्हर्नर असतील. त्यांच्याकडे वित्तीय क्षेत्रात काम करण्याचा 15 वर्षांचा अनुभव आहे.
रशिया-इराणचा प्रभाव संपुष्टात
पश्चिम आशियात सीरिया हा रशियाचा सर्वात विश्वासू भागीदार होता. 2011 मध्ये बसर यांच्याविरोधात झालेल्या बंडापासून रशिया आणि इराणनेच त्यांची सत्ता कायम राखण्यासाठी सैन्य, आर्थिक आणि रणनीतिक मदत पुरविली होती. 2016 मध्ये सीरियात रशिया आणि इराण यांच्या पाठबळाच्या जोरावरच असाद यांनी स्वत:ची सत्ता मजबूत केली होती. त्यावेळी त्यांच्या सैन्यदलाने अलेप्पो तसेच हमा आणि होम्स या शहरांवर नियंत्रण मिळविले होते. परंतु 2022 मध्ये युक्रेनमध्ये युद्ध सुरू होताच रशियाला तेथे स्वत:चे सैन्यबळ खर्च करावे लागले, यामुळे रशियाने स्वत:च्या सैनिकांना सीरियातून माघारी बोलाविले होते. त्यानंतर 2023 मध्ये इस्रायल आणि हमास यांच्यात संघर्ष सुरू होताच इराण तसेच हिजबुल्लाहला सीरियावर लक्ष केंद्रीत करता आले नव्हते.
जुलानींकडे सर्वांच्या नजरा
या पार्श्वभूमीवर जुलानी यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरांनी केवळ 11 दिवसात सीरियातील सत्ता उलथवून टाकली आहे. सीरियात आता इराण तसेच तुर्कियेला स्वत:चा दबदबा निर्माण करता येऊ नये म्हणून अमेरिकेचे प्रयत्न सुरू असल्याचे मानले जात आहे. तर दुसरीकडे जुलानी यांच्या विरोधात जाहीर करण्यात आलेले 85 कोटीचे इनाम अमेरिकेने मागे घेतले आहे. सीरियात शांतता नांदावी हीच केवळ इच्छा असल्याचे अमेरिकेच्या विदेश मंत्र्यांनी म्हटले आहे.