रशियावर हवाई हल्ल्याचायुक्रेनचा प्रयत्न, 16 ड्रोन नष्ट
वृत्तसंस्था/ मॉस्को
रशिया-युक्रेन युद्ध स्थिरावल्याचे चित्र निर्माण झाले असताना पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. रशियाच्या सैन्याकडून युक्रेनवर हल्ले करण्यात येत आहेत. गुरुवारी रात्री उशिरा युक्रेनने रशियावर प्रत्युत्तरादाखल हल्ला करण्याचा प्रयत्न केला, परंतु रशियाच्या सुरक्षा यंत्रणेने क्रीमियाच्या आकाशात 16 युक्रेनियन ड्रोन नष्ट केले आहेत .युक्रेनच्या अन्य ड्रोन हल्ल्यात रशियातील पत्रकार बोरिस मक्सूदोव यांचा मृत्यू झाला आहे.
युक्रेन आणि रशिया यांच्यात झालेल्या गोळीबारात खेरसॉन क्षेत्रात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या सैन्याने डोनेट्स्क क्षेत्रातील युक्रेनच्या तळांवर हल्ला केला होता असा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.
रशियाने 2014 मध्ये क्रीमियावर कब्जा केला होता. आता युक्रेन हा भूभाग परत मिळवू पाहत आहे. रशियाने स्वत:च्या नौदलाचा ताफा क्रीमियानजीकच्या समुद्रात तैनात केला आहे. याच भागाद्वारे रशिया स्वत:च्या सैन्यासाठी रसदपुरवठा करत आहे.
युक्रेनची राजधानी कीव्हवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरल्यापासून रशियाच्या सैन्याने पूर्व युक्रेनवर लक्ष केंद्रीत केले आहे. रशियाने आतापर्यंत युक्रेनच्या सुमारे 20 टक्के भूभागावर कब्जा केला आहे. तर हा भूभाग पुन्हा मिळविण्याकरता युक्रेनचे सैन्य प्रयत्नशील आहे.