युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही : ट्रम्प
क्रीमिया देखील परत मिळणार नाही : झेलेंस्कींसोबतच्या बैठकीपूर्वी वक्तव्य : युरोपीय देशांचा चर्चेत सहभाग
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी नाटोमधील युक्रेनच्या समावेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील होणार नाही तसेच क्रीमिया (रशियाच्या कब्जातील भूभाग) त्याला परत मिळणार नसल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे रशियासोबतचे युद्ध त्वरित समाप्त करू शकतात असे म्हणत ट्रम्प यांनी युद्धविरामाचा चेंडू युक्रेनच्या कोर्टात ढकलला आहे. ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यांच्यात अनेक युरोपीय नेत्यांच्या उपस्थितीत सोमवारी रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरू होती. या चर्चेत युक्रेन आणि अन्य युरोपीय देशांसमोर ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासोबत झालेल्या चर्चेचा तपशील मांडल्या आहेत.
युक्रेनने नाटोचे सदस्यत्व घेऊ नये असे म्हणत ट्रम्प यांनी रशियाच्या कब्जात असलेला क्रीमिया देखील त्याला परत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की हे इच्छा असल्यास रशियासोबतचे युद्ध त्वरित समाप्त करू शकतात किंवा ही लढाई जारी ठेवू शकतात. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात युक्रेनच्या क्रीमियावर रशियाने कब्जा केला होता आणि तो भूभाग युक्रेनला परत मिळणार नाही. तसेच युक्रेन नाटोमध्ये सामील होणेही शक्य नाही, काही गोष्टी कधीच बदलू शकत नाही असे उद्गार ट्रम्प यांनी काढले आहेत.
युरोपीय नेत्यांसोबत चर्चा
व्हाइट हाउसमध्ये अनेक युरोपीय नेत्यांसोबत एका खास दिनाची तयारी मी करत आहे. इतके सर्व युरोपीय नेते एकत्र कधीच भेटलेले नाहीत. त्यांचे स्वागत करणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे म्हणत ट्रम्प यांनी रशिया-युक्रेन यांच्यात युद्धविराम घडवुन आणण्याच्या प्रयत्नांकरता होणाऱ्या चर्चेस तयार असल्याचे दाखवून दिले. ही चर्चा सोमवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होती. या चर्चेच्या फलितावरच रशिया-युक्रेन यांच्यात युद्धविराम होणार की नाही हे ठरणार असल्याचे मानले जातेय.
बैठकीत अनेक नेते उपस्थित
युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की हे युरोपचे वरिष्ठ नेते आणि नाटोच्या सदस्यांसह सामील झाले. युरोपीय महासंघाच्या अध्यक्ष उर्सुला वॉन डेर लेयेन, इटलीच्या पंतप्रधान जियोर्जिया मेलोनी, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज आणि नाटो महासचिव मार्क रुट तसेच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी बैठकीत सहभागी होत भूमिका मांडली आहे.
युक्रेनला सुरक्षेची हमी
युरोपीय नेत्यांसोबत झालेल्या चर्चेदरम्यान अमेरिकेकडून सुरक्षेची हमी मिळाल्याबद्दल झेलेंस्की यांनी आनंद व्यक्त केला. तसेच झेलेंस्की यांनी शांतता करारासाठी अमेरिका, रशिया आणि युक्रेनचे एक त्रिस्तरीय स्वरुप तयार करण्याचे आवाहन केले आहे. महत्त्वाच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी युक्रेनला थेट स्वरुपात चर्चेत सामील करण्याच्या मागणीला सर्वांनी समर्थन दर्शविले आहे. अमेरिकेकडून युक्रेनला सुरक्षा हमी देण्याचा निर्णय ऐतिहासिक आहे. परंतु हे व्यवहार्य असायला हवे आणि यामुळे युक्रेनला जमिनीसोबत आकाश आणि समुद्रातही सुरक्षा मिळायला हवी असे वक्तव्य झेलेंस्की यांनी केले आहे.
मॅक्रॉन यांची टिप्पणी
रशियासोबत शांतता करार करायचा असेल तर युक्रेनला गमावलेल्या भूभागांना सोडून देण्याची तयारी दाखवावी लागेल. आमचा देश युक्रेनसोबत ठामपणे उभा आहे. तसेच युक्रेनला सुरक्षा हमी देण्याच्या मुद्द्यावर आम्ही अमेरिकेसोबत मिळून काम करणार आहोत अशी टिप्पणी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केली आहे.