युक्रेनला ‘ईयू’ सदस्यत्व मिळणार
सदस्यत्व प्रक्रिया सुरू करण्यास ईयू तयार : 4 लाख कोटीच्या मदतनिधीला हंगेरीची आडकाठी
वृत्तसंस्था/ ब्रसेल्स
युरोपीय महासंघाचे नेते युक्रेनला सदस्यत्व देण्याची प्रक्रिया सुरू करण्यास तयार झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा युरोपीय महासंघाच्या 27 सदस्य देशांची परिषद झाली असून यात युक्रेन आणि मोल्दोवाला सदस्य करण्याची प्रक्रिया सुरू करण्यावर सहमती निर्माण झाली आहे. 27 पैकी 26 देशांनी युक्रेनला सदस्यत्व देण्याच्या बाजूने मतदान केले, तर केवळ हंगेरीने याच्या विरोधात मतदान केले आहे.
हंगेरीच्या विरोधामुळे युरोपीय महासंघाकडून युक्रेनला देण्यात येणाऱ्या 4.58 लाख कोटी रुपयांच्या मदतनिधीवर सहमती निर्माण होऊ शकलेली नाही. तर युरोपीय महासंघाचे सदस्यत्व मिळाल्यावर युक्रेनला आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच त्याची सैन्यशक्ती वाढून रशियाविरोधात त्याला मोठे बळ मिळू शकणार आहे. सदस्य देशावर कुणी हल्ला केल्यास युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्य देशांनी एकत्र येत संबंधित देशाला मदत करण्याची तरतूद आहे. याकरता म्युच्युअल डिफेन्स नावाची तरतूद आहे.
मुक्त बाजारपेठ उपलब्ध होणार
आर्थिकदृष्ट्या युरोपीय महासंघाचा सदस्य झाल्यावर युक्रेनला सर्व युरोपीय देशांची खुली बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. तर युक्रेनच्या नागरिकांना अनेक प्रकारचे अधिकार प्राप्त होणार आहेत. युक्रेनचा कुठलाही नागरिक कोणत्याही युरोपीय देशात निर्बंधांशिवाय प्रवास करू शकेल. तीन वर्षांपर्यंत वास्तव्यासाठी युक्रेनच्या नागरिकांना व्हिसा अर्ज करण्याची गरज भासणार नाही.
सदस्यत्वाची प्रक्रिया
युरोपीय महासंघाचे सदस्यत्व मिळावे अशी युक्रेनची जुनी मागणी आहे. नाटोचे सदस्यत्व युक्रेनसाठी महत्त्वपूर्ण आहे, त्याच धर्तीवर युरोपीय महासंघाचे सदस्य होणे देखील त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. परंतु युरोपीय महासंघाचे सदस्यत्व मिळविण्याची प्रक्रिया अत्यंत जटिल आणि दीर्घ आहे. याकरता अनेक वर्षांचा कालावधी लागू शकतो. सर्वप्रथम युरोपीय महासंघात सामील होणाऱ्या देशाला मुक्त बाजारपेठ अर्थव्यवस्था व्हावे लागणार आहे. मग संबंधित देशाला युरोपीय महासंघाचे सर्व कायदे मान्य करावे लागणार आहेत. यानंतर युरोपीय महासंघाच्या सर्व सदस्यांना एकमताने कुठल्याही देशाच्या सदस्यत्वासाठी मान्यता द्यावी लागते. या प्रक्रियेत अनेक टप्प्यांमधील अर्ज आणि चर्चा सामील आहे.
मदतनिधीवर सहमती नाही
14 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत युक्रेनला देण्यात येणाऱ्या 4.58 लाख कोटीच्या मदतनिधीवर सहमती होऊ शकलेली नाही. म्हणजेच युरोपीय महासंघ आता युक्रेनला मदतनिधी देऊ शकणार आहे. बेल्जियमच्या ब्रसेल्समध्ये झालेल्या बैठकीत युक्रेनला देण्यात येणाऱ्या मदतीच्या प्रस्तावाला हंगेरीने विरोध दर्शविला आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे अमेरिकेकडून आर्थिक मदत मिळवू पाहत आहेत, परंतु तेथील संसदेत रिपब्लिकन पार्टीने काही अटींच्या पूर्ततेनंतरच मदतनिधीसाठी समर्थन देऊ, अशी भूमिका घेतली आहे. रिपब्लिकन पार्टीच्या समर्थनाशिवाय अध्यक्ष जो बिडेन यांना मदतनिधी मंजूर करता येणार नसल्याची स्थिती आहे.