कॅनडात जस्टिन ट्रुडो पराभूत होणार : मस्क
कॅनडातील निवडणुकीवर वक्तव्य : जर्मनीचे चॅन्सेलर मुर्ख
वृत्तसंस्था/ न्यूयॉर्क
अमेरिकेतील अब्जाधीश उद्योजक इलॉन मस्क यांनी कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या पराभवाची भविष्यवाणी केली आहे. जर्मनीतील राजकीय संकटादरम्यान एका युजरने कॅनडाला ट्रुडोंपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी मस्क यांची मदत हवी असे नमूद केले होते. यावर मस्क यांनी कॅनडात ट्रुडो पुढील निवडणुकीत स्वत:च पराभूत होतील असे म्हटले आहे.
जर्मनीतील राजकीय संकटावरून मस्क यांनी चॅन्सेलर शॉल्ज यांच्यावर उपहासात्मक टिप्पणी करत त्यांना ‘मूर्ख’ संबोधिले आहे. जर्मनीत चॅन्सेलर शॉल्ज यांनी अर्थमंत्री क्रिस्टियान लिंडनर यांची हकालपट्टी केली आहे. लिंडनर हे फ्री डेमोक्रेटिक पार्टीचे (एफडीपी) नेते असून या पक्षाचा शॉल्ज सरकारला पाठिंबा प्राप्त होता. एफडीपीने आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याने शॉल्ज यांचे सरकार अल्पमतात आले आहे. जर्मनीत यापूर्वी सोशल डेमोक्रेटिक, एफडीपी आणि ग्रीन पार्टी यांचे आघाडी सरकार होते. या आघाडीला ‘ट्रॅफिक लाइट’ नाव देण्यात आले होते
युक्रेनची मदत केल्याने आर्थिक संकट
चॅन्सेलर शॉल्ज यांनी देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी अर्थमंत्र्याची हकालपट्टी करणे आवश्यक ठरले होते असा दावा केला आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जर्मनीची अर्थव्यवस्था काहीशी संकटात सापडली आहे. अमेरिकेनंतर युक्रेनला जर्मनीच सर्वाधिक आर्थिक मदत करत आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था सुधारावी म्हणून चॅन्सेलर शॉल्ज हे वित्तीय संस्थांकडून अधिक कर्ज इच्छित होते, परंतु अर्थमंत्र्यांचा याला विरोध होता. अर्थमंत्री हे खर्चात कपात करण्यावर भर देत होते. अर्थमंत्र्यांनी कर्ज घेण्याची अनुमती न दिल्याने चॅन्सेलर शॉल्ज यांनी त्यांची मंत्रिपदावरून गच्छंती केली आहे.
मदतनिधीवरून मतभेद
चॅन्सेलर शॉल्ज हे युक्रेनसाठीचा मदतनिधी 27 हजार कोटी रुपयांवरून 1.63 लाख कोटी रुपये करू इच्छित होते. अर्थमंत्र्यांनी यावर आक्षेप घेत नकार दिला होता. लिंडनर यांना जगाची पर्वा नाही, ते छोट्या उद्देशावर लक्ष केंद्रीत करून आहेत अशी टीका शॉल्ज यांनी केली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल देशाच्या जनतेवर आणखी कर लादू इच्छित नसल्याची टिप्पणी केली होती.
..तर होणार निवडणूक
15 जानेवारी 2025 रोजी संसदेत बहुमत मिळविण्याचा प्रयत्न करणार आहे. सरकारला बहुमत न मिळघ्ल्यास मार्चच्या अखेरपर्यंत देशात निवडणूक होऊ शकते असे शॉल्ज यांनी म्हटले आहे. जर्मनीत पुढील निवडणूक सप्टेंबर महिन्यात प्रस्तावित आहे. जर्मनीत दर 4 वर्षांनी निवडणूक होत असते. जर्मनीत मुदतपूर्व निवडणूक करविण्याचा अधिकार कनिष्ठ सभागृह किंवा चॅन्सेलर यांच्याकडे नसतो. याकरता राष्ट्रपती आणि अनेक घटनात्मक संस्थांची मंजुरी घ्यावी लागते. जर्मनीच्या कनिष्ठ सभागृहात 733 सदस्य आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी 367 संख्याबळ असणे आवश्यक आहे.
कॅनडातही पुढील वर्षी निवडणूक
अल्पमतातील सरकार चालविणाऱ्या जस्टिन ट्रुडो यांच्या कॅनडामध्ये पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. ट्रुडो हे 2015 पासून सत्तेवर आहेत. 2019 आणि 2021 मध्ये ट्रुडो यांच्या पक्षाला बहुमत मिळू शकले नव्हते. अन्य पक्षांच्या समर्थनाद्वारे ते सरकार चालवत आहेत. सप्टेंबर महिन्यात जगमीत सिंह यांचा पक्ष एनडीपीने ट्रुडो सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला होता. यामुळे ट्रुडो सरकार अल्पमतात आले आहे. कॅनडात पुढील वर्षी ऑक्टोबरमध्ये निवडणूक होणार असून यात ट्रुडोंच्या लिबरल पार्टीला कॉन्झर्वेटिव्ह पार्टी समवेत न्यू डेमोक्रेटिक पार्टी,ब्लॉक क्यूब कॉइन्स आणि ग्रीन पार्टीचे आव्हान पेलावे लागणार आहे. कॅनडात महागाई, घरांशी निगडित मुद्द्यांवरून लोकांमधील निराशा वाढली आहे. ट्रुडो यांची लोकप्रियता सातत्याने खालावत आहे.