30 दिवसांच्या युद्धविरामास युक्रेन तयार
अमेरिकेकडून सैन्यमदतीची घोषणा : रशियाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष
वृत्तसंस्था/ जेद्दाह
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बोलावून अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांचा पाणउतारा केला होता, यामुळे युरोपीय देशांना धक्का बसला होता. ट्रम्प हे रशियाधार्जिणे असल्याचा आरोप होऊ लागला होता. परंतु आठवडाभरातच ट्रम्प हे युक्रेनला मदत करण्यास तयार झाले आहेत. सौदी अरेबियात अमेरिका आणि झेलेन्स्की यांच्यात झालेली चर्चा युक्रेनच्या दृष्टिकोनातून यशस्वी ठरली. युक्रेन युद्धात 30 दिवसांचा संघर्षविराम आणि अमेरिकेकडून रोखण्यात आलेले सर्व सहाय्य पुन्हा सुरू करण्यावर सहमती झाली आहे. आता पुढील घडामोडी या रशियावर निर्भर असणार आहेत.
अमेरिका आणि युक्रेन यांच्यात झालेली सहमती ही रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांच्यासाठी झटकाच आहे. बैठकीच्या एक दिवस अगोदर पुतीन यांनी ट्रम्प यांच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकत नसल्याची टिप्पणी केली होती. ट्रम्प यांच्या निर्णयांपासून आताच रशिया यशाच्या मार्गावर असल्याची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल असे पुतीन यांचे म्हणणे होते. एकप्रकारे पुतीन यांची भीती खरी ठरली आहे.
सौदी अरेबियातील चर्चेत काय घडले?
सौदी अरेबियातील जेद्दाह येथे मंगळवारी अमेरिका आणि युक्रेनमध्ये उच्चस्तरीय चर्चा झाल्यावर संयुक्त वक्तव्य जारी करण्यात आले आहे. यात युक्रेन अमेरिकेचा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार असून याच्या अंतर्गत ‘तत्काळ तात्पुरता 30 दिवसांचा संघर्षविराम लागू केला जाईल, जो दोन्ही बाजूंच्या परस्पर सहमतीने वाढविला जाऊ शकतो’ असे नमूद आहे.
पुतीन यांचे मन वळवू : ट्रम्प
हा प्रस्ताव 30 दिवसांसाठी पूर्णपणे युद्धविराम लागू करेल, क्षेपणास्त्र, ड्रोन आणि बॉम्बवर्षाव थांबण्यासोबत काळा समुद्र आणि पूर्ण सीमेवरील संघर्ष रोखला जाईल असे झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. तर रशिया संघर्षविराम प्रस्तावाचा स्वीकार करेल अशी अपेक्षा आहे, अमेरिका यासंबंधी रशियासोबत चर्चा करणार असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. युद्धविराम कराराच्या प्रस्तावाचे फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी कौतुक करत चेंडू आता रशियाच्या कोर्टात असल्याचे म्हटले आहे. युक्रेनने युद्धविराम करारात युरोपीय महासंघाला सामील करण्याची मागणी केली आहे.
अमेरिकेने निर्णय घेतला मागे
चर्चेतील प्रगतीनंतर अमेरिकेने गुप्तचर माहिती रोखण्याचा निर्णय मागे घेण्यात येईल आणि युक्रेनला सुरक्षा सहाय्य पुन्हा प्रदान करणार असल्याची घोषणा केली आहे. अमेरिकेने मागील आठवड्यात हे सहाय्य रोखले होते, यामुळे रशियाच्या सैन्य हालचालींवर नजर ठेवण्याची, क्षेपणास्त्र हल्ल्यांपासून बचावाची आणि हल्ला करण्याची युक्रेनची क्षमता प्रभावित झाली होती.
ट्रम्प-झेलेस्की यांच्यात सहमती
अमेरिका आणि युक्रेनच्या संयुक्त वक्तव्यावरून कराराची गाडी रुळावर परतल्याचे संकेत मिळाले आहेत. दोन्ही देश युक्रेनच्या महत्त्वपूर्ण खनिज संपदांच्या विकासासाठी लवकरच एक व्यापक करार करण्यावर सहमती झाले आहेत, याच्या माध्यमातून युक्रेनच्या अर्थव्यवस्थेला चालना दिली जाईल आणि त्याच्या दीर्घकालीन समृद्धी आणि सुरक्षेची हमी देता येईल असे अमेरिकेने म्हटले आहे.