For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियाच्या 74 गावांवर युक्रेनचा कब्जा

06:13 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
रशियाच्या 74 गावांवर युक्रेनचा कब्जा
Advertisement

2 लाख रशियन नागरिकांना करावे लागले स्थलांतर : दुसऱ्या महायुद्धानंतरच पहिल्यांदाच रशियावर नामुष्की

Advertisement

वृत्तसंस्था/ कीव्ह/मॉस्को

युक्रेनच्या सैयाने रशियाच्या कुर्स्क भागातील 74 गावांवर कब्जा केला आहे. युक्रेनचे सैन्य रशियाच्या भूभागात पुढे सरकत असून रशियाच्या सैनिकांना ताब्यात घेत असल्याचा दावा युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी केला आहे. युक्रेनच्या अचानक हल्ल्यानंतर दोन लाख रशियन नागरिकांना स्वत:चे घर सोडावे लागले आहे. या रशियन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

Advertisement

युक्रेनने 6 ऑगस्ट रोजी रशियाच्या कुर्स्क भागावर हल्ला सुरू केला होता. 13 ऑगस्टपर्यंत युक्रेनने रशियाच्या 1000 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच एखाद्या देशाने रशियाच्या सीमेत दाखल होण्याची कामगिरी केली आहे.

युद्धाला 900 दिवस पूर्ण

24 फेब्रुवारी 2022 रोजी सुरू झालेल्या  रशिया-युक्रेन युद्धाला मंगळवारी 900 दिवस पूर्ण झाले आहेत. अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या या युद्धात मागील आठवडा रशियासाठी अत्यंत प्रतिकूल ठरला आहे. पहिल्यांदाच युक्रेनने रशियाच्या भूभागावर कब्जा मिळविला आहे. रशियाने चालू वर्षात जितक्या युक्रेनियन भूभागावर कब्जा केला आहे, तितकाच रशियन भूभाग युक्रेनने केवळ 7 दिवसांत ताब्यात घेतला आहे. अमेरिकेतील इन्स्टीट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉरनुसार रशियाने 2024 मध्ये युक्रेनच्या 1,175 चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे.

रशियाची पिछेहाट

रशियाने युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत अडीच वर्षांमध्ये युक्रेनच्या 1 लाख चौरस किलोमीटर भूभागावर कब्जा केला आहे. हे प्रमाण युक्रेनच्या एकूण भूभागाच्या 18 टक्के आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल युक्रेनने आता जोरदार मोहीम उघडून रशियाच्या तुलनेत त्याच्या एक टक्के भूभागावर नियंत्रण मिळविले आहे.

पुतीन यांचा आदेश

पुतीन यांनी कुर्स्कच्या स्थानिक नेते आणि अधिकाऱ्यांसोबत अलिकडेच बैठक घेतली आहे. या बैठकीत बोलताना पुतीन यांनी युक्रेनच्या हल्ल्यांना चिथावणीपूर्ण ठरविले आहे. युक्रेनच्या सैन्याला रशियन भूभागातून पिटाळून लावण्याचा आदेश त्यांनी संरक्षण अधिकाऱ्यांना दिला आहे. रशियन भूभागावर कब्जा करत युक्रेन शस्त्रसंधीसाठी स्वत:ची बाजू वरचढ करू पाहत आहे, परंतु आम्ही त्याच्यासोबत कुठलीही तडजोड करणार नाही. युक्रेनने रशियन नागरिकांची हत्या करत आण्विक ऊर्जा प्रकल्पानजीक हल्ला केल्याचा आरोप पुतीन यांनी यावेळी केला.

मोहिमेबाबत अत्यंत गुप्तता

युक्रेनने स्वत:च्या मोहिमेची तयारी अत्यंत गुप्त ठेवली होती. ओक आणि मेपलच्या जंगलांमध्ये युक्रेनच्या सैन्याने स्वत:ची शस्त्रास्त्रs लपविली होती. देखाव्यासाठीच्या प्रशिक्षण अभ्यासांद्वारे सैन्य हालचाली लपवून ठेवण्यात आल्या होत्या. हल्ल्याच्या तीन दिवसांपूर्वी जंगलात झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांनी रशियावर  आक्रमण करणार असल्याची घोषण केली होती. सैनिकांना ही माहिती केवळ एक दिवस अगोदर देण्यात आली होती. युक्रेनच्या या गुप्ततेमुळेच रशियाला स्वत:वर होणाऱ्या हल्ल्याचा सुगावा लागू शकलेला नाही. तसेच यातून रशियन गुप्तचर यंत्रणांचे अपयश ठळकपणे समोर आले आहे.

Advertisement
Tags :

.