रशियात 8 ठिकाणी युक्रेनचा ड्रोन अटॅक
3 ऊर्जा केंद्रांसह इंधन भांडार नष्ट : रशियाकडून 50 ड्रोन उद्ध्वस्त केल्याचा दावा
► वृत्तसंस्था/ मॉस्को
युक्रेनच्या स्पेशल फोर्सेसनी शनिवारी रात्री उशिरा दीर्घ पल्ल्यापर्यंत मारा करणाऱ्या ड्रोन्सद्वारे रशियातील 8 ठिकाणी हल्ले केले आहेत. या हल्ल्यात रशियातील 3 ऊर्जा केंद्रे आणि एक इंधन भांडार नष्ट झाले आहे. या हल्ल्यांमध्ये 2 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. सुरक्षा यंत्रणेने युक्रेनचे सुमारे 50 ड्रोन्स नष्ट केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने रविवारी केला आहे.
रशिया देखील युक्रेनमध्ये अशाप्रकारचे हल्ले करून ऊर्जा सुविधांना लक्ष्य करत असतो. युक्रेनमध्ये थंडीमुळे सातत्याने तापमानात घट होत आहे. तेथे किमान तापमान उणेमध्ये नोंदले जात आहे. रशियाचे सैन्य या स्थितीचा लाभ घेत युक्रेनवर हल्ला करून सर्वसामान्यांना त्रास पोहोचवू पाहत आहे.
युक्रेनने शनिवारी रात्री सुमारे 2 वाजता अनेक ड्रोन्स रशियातील 8 भागांमध्ये पाठविले, या ड्रोन्सद्वारे रशियाच्या एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य करण्यात आले आहे. हा हल्ला युक्रेनची सिक्युरिटी सर्व्हिस, डिफेन्स इंटेलिजेन्स आणि स्पेशल फोर्सेसची एक संयुक्त मोहीम होती. युक्रेनच्या हल्ल्यानंतर अनेक भागांमधील वीज आणि पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.
रशियाला झटका
अलिकडच्या काळात युक्रेनने रशियातील तेलशुद्धीकरण प्रकल्प, टर्मिनल्ससोबत एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चरवरील हल्ले वाढविले आहेत. युक्रेन रशियाला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले करत आहे. हे हल्ले दीर्घपल्ल्याच्या आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या ड्रोन्सच्या मदतीने घडवून आणले जात आहे. यापूर्वी मार्च महिन्यात युक्रेनने रशियाच्या 3 तेलशुद्धीकरण प्रकल्पांना लक्ष्य केले होते.
अमेरिकेकडून आर्थिक मदतीचे विधेयक संमत
अमेरिकेच्या संसदेने युक्रेनला आर्थिक मदत देण्याचा मार्ग मोकळा करणारे विधेयक संमत केले आहे. हे विधेयक संमत झाल्याने युक्रेनला अमेरिकेकडून सुमारे 5 लाख कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. यात 1 लाख 91 हजार कोटी रुपयांची अमेरिकन शस्त्रास्त्रs आणि सुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. 1 लाख 16 कोटी रुपयांद्वारे युक्रेनला अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त असलेल्या शस्त्रास्त्रांची खरेदी करता येणार आहे.
युद्ध संपविण्यासाठी निधी वापरू
युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी विधेयक संमत झाल्याप्रकरणी अमेरिकेच्या खासदारांचे आभार मानले आहेत. अमेरिकेचे खासदार आणि विशेषकरून सभापती माइक जॉन्सन यांचे आभार मानू इच्छितो. या युद्धाच्या प्रारंभापासूनच अमेरिकेने स्वत:चे नेतृत्व दाखवून दिले आहे. जगात शांतता आणण्यासाठी अशाप्रकारच्या नेतृत्वाची गरज आहे. आम्ही अमेरिकेच्या मदतीचा वापर युद्ध संपविण्यासाठी करू असे उद्गार झेलेंस्की यांनी काढले आहेत.