युक्रेनने पकडले उत्तर कोरियाचे सैनिक
कुर्स्क भागातून घेतले ताब्यात : रशिया, उत्तर कोरियात खळबळ
वृत्तसंस्था/ कीव्ह
युक्रेनने रशियाच्या कुर्स्क क्षेत्रात दोन उत्तर कोरियन सैनिकांना ताब्यात घेतले आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की यांनी याची माहिती दिली आहे. युक्रेनने पहिल्यांदाच उत्तर कोरियन सैनिकांना जिवंत पकडल्याची घोषणा केली आहे. ऑक्टोबर महिन्यात उत्तर कोरियाच्या सैनिकांनी रशियाच्या वतीने युद्धक्षेत्रात प्रवेश केला होता, प्रारंभी उत्तर कोरियन सैनिकांची संख्या 10 हजार किंवा त्याहून अधिक असल्याचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता.
उत्तर कोरियाच्या सैनिकांना कीव्ह येथे आणले गेले आहे. युक्रेनची देशांतर्गत गुप्तचर यंत्रणा, सिक्युरिटी सर्व्हिस ऑफ युक्रेनकडून उत्तर कोरियाच्या सैनिकांची चौकशी केली जात आहे. युद्धाच्या सर्व कैद्यांप्रमाणेच या दोन उत्तर कोरियन सैनिकांना आवश्यक वैद्यकीय सहाय्य मिळत आहे. तसेच या उत्तर कोरियन सैनिकांशी बोलण्याची संधी पत्रकारांना दिली जाणार असल्याचे झेलेंस्की यांनी म्हटले आहे. उत्तर कोरियाचे सैनिक रशियाच्या वतीने कुर्स्क भागात लढत आहेत. कुर्स्क भागावर युक्रेनने नियंत्रण मिळविले आहे.
रशियाला शस्त्रास्त्रपुरवठा
उत्तर कोरिया रशियाला मोठ्या प्रमाणात तोफगोळ्यांचा पुरवठा करत आहे. रशियाने कुर्स्क भागात उत्तर कोरियन सैनिक लढत असल्याची पुष्टी दिलेली नाही तसेच नाकारले देखील नाही. तर सैनिकांना पकडण्यात आल्याप्रकरणी रशिया तसेच उत्तर कोरियाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. युक्रेनने यापूर्वी देखील उत्तर कोरियाच्या सैनिकांना पकडले होते, परंतु ते गंभीर जखमी असल्याने त्यांचा काही काळातच मृत्यू झाला होता.
युक्रेनच्या स्पेशल फोर्सेसची कारवाई
उत्तर कोरियन सैनिकांना युक्रेनच्या स्पेशल फोर्सेसने पकडले आहे. स्पेशल फोर्सेसने ड्रोनद्वारे चित्रित केलेला एक व्हिडिओ पोस्ट केला असून यात ऑपरेशनचा एक हिस्सा दाखविण्यात आला आहे. यात वनक्षेत्रात ओला सूट परिधान केलेले 5 जण दिसुन येत आहेत. तर पकडण्यात आलेले उत्तर कोरियाचे दोन सैनिक अन्य एका व्हिडिओत दिसुन येत असून यातील एक जण जखमी तर दुसरा स्ट्रॉद्वारे मद्यपान करत असताना दिसून येतो.
दक्षिण कोरियाची यंत्रणा चौकशीत सामील
उत्तर कोरियाच्या एका सैनिकाच्या चेहऱ्यावर घाव होता आणि त्याच्यावर उपचार करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या सैनिकाच्या पायात फ्रॅक्चर झाला आहे. उत्तर कोरियाच्या सैनिकांना चौकशीसाठी कीव्ह येथे आणले गेले आहे, कारण त्यांना युक्रेनी, रशियन किंवा इंग्रजी भाषा अवगत नाही. याचमुळे दक्षिण कोरियाच्या एआयएस गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने त्यांची कोरियन भाषेत चौकशी केली जात असल्याचे युक्रेनच्या स्पेशल फोर्सेसकडून सांगण्यात आले.
रशियन नावाने नोंदणी
उत्तर कोरियाच्या सैनिकांना रशियात नोंदणीकृत अन्य नावाच्या रशियन सैन्य दस्तऐवजासोबत पकडण्यात आले होते. हे सैनिक अनुक्रमे 2021 आणि 2016 पासून उत्तर कोरियन सशस्त्रदलांमध्ये कार्यरत होते. दोन्ही कैद्यांना आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार वागणूक दिली जात असल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आले.