पाकिस्तानमध्ये सापडला सोन्याचा प्रचंड साठा
अटक शहरामध्ये 32 हजार किलो सोने सापडल्याचा दावा
वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तानातील पंजाब राज्यातील माजी खाण मंत्री इब्राहिम हसन मुराद यांनी अटक शहरात 2 अब्ज डॉलर्स (17 हजार कोटी रुपये) किमतीचे सोन्याचे साठे सापडल्याचा दावा केला आहे. मुराद यांच्या मते, अटकेमध्ये 32 किलोमीटर परिसरात 32,658 किलो (28 लाख तोळे) सोन्याचा साठा सापडला आहे. हसन मुराद यांनी 10 जानेवारी रोजी ‘एक्स’ पोस्टमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे. हा शोध पाकिस्तानच्या खनिज संपत्तीचा शोध घेण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्यामुळे देश आर्थिकदृष्ट्या मजबूत होईल आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी नवीन संधी निर्माण होतील, असा दावा केला जात आहे. पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षणाच्या शास्त्रज्ञांनी केलेला हा शोध पंजाबमधील नैसर्गिक संसाधनांच्या अफाट क्षमतेवर प्रकाश टाकतो. येथून पाकिस्तानच्या भूगर्भीय सर्वेक्षण पथकाने 127 ठिकाणांहून नमुने गोळा केले होते.