रशियासोबत युद्ध थांबवण्यासाठी युक्रेन-ब्रिटन-फ्रान्सची योजना
अमेरिकेसमोर प्रस्ताव मांडणार : ब्रिटनच्या पंतप्रधानांची माहिती
वृत्तसंस्था/ लंडन
रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याच्या योजनेवर ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांनी सहमती दर्शविली आहे. ही योजना अमेरिकेसमोर ठेवली जाणार आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्या ब्रिटन भेटीदरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी ही माहिती दिली आहे. स्टार्मर यांनी लंडनमध्ये युरोपीय देशांची संरक्षण शिखर परिषद आमंत्रित केली असून त्याला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कीही उपस्थित राहणार आहेत.
व्हाईट हाऊसमध्ये झेलेन्स्की आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील चर्चेनंतर चार देशांच्या नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत या योजनेचा उल्लेख करण्यात आला होता. ट्रम्प यांना युक्रेनमध्ये कायमस्वरूपी शांतता हवी आहे. त्यानुसार अमेरिकेने आपल्या सुरक्षा हमीचे पालन केल्यास ही योजना पुढे कार्यान्वित करण्याची पावले उचलली जातील असे स्टार्मर यांनी सांगितले.
आलिंगन देत झेलेन्स्कींचे स्वागत
अमेरिकेचा दौरा आटोपून युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की शनिवारीच इंग्लंडमध्ये पोहोचले. ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टार्मर यांनी झेलेन्स्की यांचे आलिंगन देत स्वागत केले. तसेच तेथील लोकांनी मोठ्या घोषणा देत झेलेन्स्की यांचे स्वागत केले. दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेदरम्यान ‘तुम्हाला संपूर्ण ब्रिटनचा पाठिंबा आहे’ असा शब्द स्टार्मर यांनी झेलेन्स्की यांना दिला. कितीही वेळ लागला तरी आम्ही युक्रेनसोबत उभे आहोत, असेही ते म्हणाले. या पाठिंब्याबद्दल झेलेन्स्की यांनी त्यांचे आभार मानले.
युक्रेनला 24 हजार कोटींचे कर्ज
ब्रिटनने युक्रेनला 24 हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले. यासाठी शनिवारी ब्रिटिश पंतप्रधान स्टार्मर आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी करारावर स्वाक्षरी केली. हे कर्ज जी-7 देशांच्या एक्स्ट्रा-ऑर्डिनरी रेव्हेन्यू अॅक्सिलरेशन उपक्रमांतर्गत देण्यात आले आहे. या कर्जाचा वापर युक्रेनसाठी आवश्यक शस्त्रs खरेदी करण्यासाठी केला जाईल. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये जी-7 देशांनी युक्रेनला 50 अब्ज डॉलर्स म्हणजेच 4.3 लाख कोटी रुपयांची मदत देण्याचे आश्वासन दिले होते.
सुरक्षा शिखर परिषदेचे आयोजन
लंडनमध्ये युरोपीय देशांची एक शिखर परिषद होणार आहे. या शिखर परिषदेत फ्रान्स, जर्मनी, डेन्मार्क आणि इटलीसह 13 देश सहभागी होतील. तसेच नाटोचे सरचिटणीस आणि युरोपियन युनियन आणि युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष उपस्थित राहतील.
पाठिंब्याबाबत काही देशांची नाराजी
युक्रेनला पाठिंबा देण्याच्या मुद्यावर युरोपियन युनियन (ईयु) मध्येही दुरावा दिसून येत आहे. स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांनी युक्रेनला आर्थिक किंवा लष्करी मदत देणार नसल्याचे म्हटले आहे. युक्रेन कधीही लष्करी बळाचा वापर करून रशियाला वाटाघाटीच्या टेबलावर आणू शकणार नाही. यापूर्वी हंगेरीचे पंतप्रधान व्हिक्टर ऑर्बन यांनीही झेलेन्स्की यांच्या विरोधात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांना पाठिंबा दिला होता. व्हाईट हाऊसमध्ये दोघांमधील खडाजंगीनंतर त्यांनी ट्रम्प यांना बलवान आणि झेलेन्स्की यांना कमकुवत म्हटले. तसेच त्यांनी ट्रम्प यांचे विशेष आभार मानले होते.
ब्रिटनच्या दौऱ्यापूर्वी झेलेन्स्की शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये पोहोचले होते. याप्रसंगी दोघांमध्ये जोरदार वाद झाला. ट्रम्प-व्हान्स आणि झेलेन्स्की एकमेकांकडे बोट दाखवताना दिसले. ट्रम्प यांनी झेलेन्स्की यांना अनेकवेळा फटकारले. जोरदार शाब्दिक वादावादीनंतर झेलेन्स्की व्हाईट हाऊसमधून बाहेर पडले होते.