उज्वल निकम पुन्हा बनले विशेष सरकारी वकील; राज्यातील सर्व खटले पुन्हा निकमांकडे
मुंबई बॉम्बस्फोट खटला, अजमल कसाब खटला असे भारतातील बहुचर्चित कटले विशेष सरकारी वकील म्हणून चालवणारे ॲड. उज्वल निकम पुन्हा एकदा सरकारचे वकील बनले आहेत. लोकसभा निवडणुकीदरम्यान मुंबईतून उमेदवारी करण्यासाठी त्यांनी राजीनामा दिला होता.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांच्या विरोधात भाजपचे उमेदवार म्हणून ॲड. उज्वल निकम हे मैदानात उतरले होते. त्यामुळे उमेदवारी मिळण्यापूर्वी त्यांनी विशेष सरकारी वकील म्हणून चालवत असणारे सर्व खटले सोडून पदाचा राजीनामा दिला होता. मात्र या निवडणुकीत ॲड. निकम यांचा निसटता पराभव झाला. त्यानंतर निकम काय करणार याकडे न्यायालयीन वर्तुळाचे लक्ष लागले होते.
दरम्यान, राज्य सरकारने पुन्हा एकदा त्यांच्याकडे विशेष सरकारी वकील पदाची जबाबदारी सोपवली असून राज्यातील सर्व खटले पुन्हा त्यांच्याकडे सोपवले आहेत. सांगली येथील अनिकेत कोथळे खून प्रकरणात निकम हे विशेष सरकारी वकील असून या खटल्यास एकूण 16 खटले राज्य सरकारने पुन्हा त्यांच्याकडे सोपवले आहेत. लवकरच ते आपल्या मूळ जबाबदारीवर पुन्हा रुजू होतील असे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.