For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उज्ज्वल निकम यांनी फेटाळले आरोप

06:23 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
उज्ज्वल निकम यांनी फेटाळले आरोप
Advertisement

भारतीय जनता पक्षाचे उत्तरमध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि सुप्रसिद्ध सरकारी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याच्यासंबंधी केलेले सर्व आरोप फेटाळले असून हे आरोप देशाच्या न्यायव्यवस्थेची अवमानना करणारे आहेत अशा अर्थाचे विधान केले आहे. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या हल्ल्यात महाराष्ट्र एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांच्यासह तीन अधिकाऱ्यांची हत्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केली होती. तथापि काँग्रेस नेते वडेट्टीवार यांनी करकरे यांची हत्या दहशतवाद्यांनी केली नसून ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इशाऱ्यावर पोलिस अधिकाऱ्यांनीच केली असे खळबळजनक विधान केले होते. तसेच उज्ज्वल निकम हे महान विधिज्ञ नसून ‘देशद्रोही“ (ट्रेटर) आहेत, असा आरोप केला होता. त्यांच्या विधानांचा आणि आरोपांचा खरपूस समाचार उज्ज्वल निकम यांनी घेतला आहे. वडेट्टीवार यांचे आरोप अशोभनीय आणि धादांत खोटे आहेत. कसाबविरोधात न्यायालयात रीतसर कारवाई पुराव्यानिशी झाली असून न्यायालयाने फाशीची शिक्षा दिली होती, ही वस्तुस्थिती त्यांनी स्पष्ट केली.

Advertisement

वडेट्टीवार यांचे विधान काँग्रेसची कोंडी करणारे ठरले आहे. देशात लोकसभा निवडणूक होत असताना केलेल्या या विधानामुळे काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता अनेकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काँग्रेसने हे वडेट्टीवार यांचे व्यक्तीगत विधान आहे, अशी सारवासारवी करण्याचा प्रयत्न केला आहे. तथापि, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसवर टीका केली असून या विधानातून काँग्रेसची मनोवृत्ती स्पष्ट होते अशी टिप्पणी केली आहे. पाकिस्तानचे एवढे प्रेम काँग्रेसवर का, याचे उत्तर वडेट्टीवार यांच्या या विधानातून मिळते असाही खोचक टोला या पक्षाने लगावला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.