युगांडाचे सारा चिलेनगेट,चिपतेगी विजेते
वृत्तसंस्था/बेंगळूर
रविवारी येथे झालेल्या टीसीएस विश्व अॅथलेटिक्स गोल्ड लेबल 10 कि.मी. पल्ल्याच्या रोडरेसमध्ये युगांडाच्या धावपटूंनी आपले निर्विवाद वर्चस्व राखले. पुरुषांच्या विभागात जोशुवा चिपतेगी तर महिलांच्या विभागात सारा चिलेनगेट यांनी अजिक्यपद पटकाविले. या स्पर्धेत भारतीय स्पर्धकांच्या विभागामध्ये पुरुष गटात अभिषेक पालने तर महिलांच्या विभागात संजीवनी जाधवने विजेतेपद मिळविले. युगांडाच्या चिलेनगेट आणि चिपतेगी यांना प्रत्येकी 26 हजार अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस देण्यात आले.
बेंगळूरमध्ये या रोडरेसला सकाळी 5.30 वाजता प्रारंभ झाला. पुरुषांच्या विभागात या शर्यतीच्या निम्या टप्प्याअखेर विविध देशांचे सुमारे 12 स्पर्धक आघाडीवर होते. तांझानियाच्या गॅब्रियल गेईने या टप्प्याअखेर 14.01 मिनिटांचा कालावधी घेत आघाडी घेतली होती. पहिल्या पाच कि.मी.चा टप्पा संपल्यानंतर शेवटच्या पाच कि.मी. टप्प्याच्या शर्यतीमध्ये युगांडाच्या जोशुआसह अन्य पाच स्पर्धकांनी 8 कि.मी.चे अंतर 22.35 मिनिटांमध्ये पार केले. मात्र शेवटचे 1 कि.मी. अंतर बाकी असताना जोशुआने आपला धावण्याचा वेग सुसाट केला आणि त्याने 27.53 मिनिटांचा कालावधी नोंदवित पहिल्या स्थानासह विजेतेपद हस्तगत केले. शेमॉनने 27.55 मिनिटांचा कालावधी नोंदवित दुसरे स्थान तर केनियाच्या व्हिनसेंट लेगाटने 28.02 मिनिटांचे अंतर नोंदवित तिसरे स्थान तसेच तांझानियाच्या गेईने 28.03 मिनिटांचे अंतर नोंदवित चौथे स्थान मिळविले.
महिलांच्या विभागात युगांडाच्या सारा चिलेनगेटने 31.07 मिनिटांचे अंतर नोंदवित महिल्या स्थानासह विजेतेपद मिळविले. गुटेनीने 31.09 सेकंदांचा अवधी घेत दुसरे स्थान पटकाविले. 2018 च्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत साराने दुहेरी सुवर्णपदक पटकाविले होते. तर 2024 च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत तिने महिलांच्या 10 हजार मिटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक मिळविले होते. भारतीय स्पर्धकांच्या गटामध्ये पुरुष विभागात अभिषेक पालने तर महिलांच्या विभागात संजीवनी जाधवने प्रथम स्थान मिळविले.