उदिता दुहान सर्वात महागडी महिला हॉकीपटू
32 लाखाला बेंगाल टायगर्स खरेदी केले, यिबी जान्सेन महागडी विदेशी खेळाडू
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची डिफेंडर उदिता दुहान ही महिला हॉकी इंडिया लीगच्या लिलावातील सर्वात महागडी खेळाडू ठरली आहे. मंगळवारी झालेल्या महिलांच्या लिलावात उदिताला श्राची रार्ह बेंगाल टायगर्सने 32 लाखाला खरेदी केले.
नेदरलँड्ची ड्रॅगफ्लिकर यिबी जान्सेन ही सर्वाधिक बोली मिळविणारी दुसऱ्या क्रमांकाची खेळाडू ठरली. तिला ओडिशा वॉरियर्सने 29 लाखाला आपल्या संघात सामील करून घेतले. भारतीय खेळाडू लालरेसियामी (25 लाख, एसआर बेंगाल टायगर्स), सुनेलिता टोप्पो (24 लाख, दिल्ली एसजी पायपर्स), संगीता कुमारी (22 लाख, दिल्ली एसजी पायपर्स) यांनीही महिलांच्या लिलावातील पहिल्या टप्प्यात लक्षवेधी बोली मिळविली. अनेक विदेशी खेळाडूंनीही बऱ्यापैकी बोली मिळविली. त्यात बेल्जियमची चार्लोट एन्गलबर्ट (15 लाख, सूरमा हॉकी क्लब), जर्मनीची चार्लोस स्टॅपेनहॉर्स्ट (16 लाख, सूरमा हॉकी क्लब), ऑस्ट्रेलियाची जोसेलीन बार्टरम (15 लाख, ओडिशा वॉरियर्स) यांचा समावेश आहे.
भारताची अनुभवी स्ट्रायकर वंदना कटारियाला एसआर बेंगाल टायगर्सने 10.5 लाखाला घेतले, तर भारतीय कर्णधार सलिमा टेटेला 20 लाख, इशिका चौधरीला 16 लाख, नेहा गोयलला 10 लाख रुपयांना ओडिशा वॉरियर्सने खरेदी केले. माजी कर्णधार सविता पुनियाला 20 लाख, शर्मिला देवीला 10 व निक्की प्रधानला 12 लाखाला सूरमा हॉकी क्लबने खरेदी केले. दिल्ली एसजी पायपर्सने भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू नवनीत कौर (19 लाख), युवा गोलरक्षिका बिछू देवी खारिबम (16 लाख), दीपिका (20 लाख) यांनाही खरेदी केले. सर्व चारही फ्रँचायजींनी धोरणात्मक बोली लावत खेळाडूंना आपल्या ताफ्यात घेतले आहे.