उदित अंतिम तर दीपक, मुकुल उपांत्य फेरीत
वृत्तसंस्था/ अम्मान, जॉर्डन
येथे सुरू असलेल्या आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या उदितने पुरुषांच्या 61 किलो फ्रीस्टाईल गटात अंतिम फेरी गाठत सुवर्णपदकाकडे झेप घेतली आहे तर दीपक पुनिया (92 किलो) व मुकुल दाहिया (86 किलो) यांनी उपांत्य फेरी गाठली आहे.
उदितने चीनच्या वानहाओ झोयूचा 2-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. त्याआधी त्याने कीर्गिझस्तानच्या बेकबोलोत मीर्झानझार उलूवर 9-6 अशी मात केली होती. पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र न ठरलेल्या दीपक पुनियाने जोरदार पुनरागमन करताना पहिल्या लढतीत बेकझट रखिमोव्हवर संघर्षपूर्ण विजय मिळविला. कीर्गिझस्तानच्या रखिमोव्हने त्याला कडवा प्रतिकार केला, पण शेवटी त्याने 12-7 असा विजय मिळवित उपांत्य फेरी गाठली. जपानच्या ताकाशी इशिगुरोशी होईल.
मुकुल दाहियाचा विजय हा आजच्या दिवसातील सरप्राईज ठरले. त्याने दोन शानदार विजय नेंदवत उपांत्य फेरी गाठली. सिंगापूरचा वेंग लुएन गॅरी चौ याच्याविरुद्ध एकही गुण न गमविता तांत्रिक सरसतेवर विजय मिळविल्यानंतर कीर्गिझचा जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या मुखम्मद अब्दुल्लाएव्हवर 3-1 अशी मात केली. उपांत्य फेरीत त्याची लढत इराण जागतिक तिसऱ्या मानांकित अबोलफझ्ल वाय रहमानी फिरौझाईविरुद्ध होईल.
याशिवाय दिनेशने 125 किलो हेविवेट गटात उपांत्य फेरी गाठली असून त्याने चीनच्या बुर्हीदुनवर तांत्रिक सरसतेवर विजय मिळविला तर जयदीप अहलावतला मात्र कडवा प्रतिकार करूनही 74 किलो वजन गटात पराभूत व्हावे लागले. जपानच्या हिकारु ताकाताने त्याला पहिल्या फेरीच्या लढतीत 10-5 अशा गुणांनी हरविले.