उधमपूरमध्ये तीन संशयित दहशतवादी दिसल्याने खळबळ
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काश्मीरच्या उधमपूर जिह्यात शुक्रवारी तीन संशयित दहशतवादी दिसल्यानंतर सुरक्षा दलांनी उच्चस्तरीय शोधमोहीम सुरू केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, तिन्ही संशयितांनी चिल्ला बालोठा गावातील एका स्थानिक व्यक्तीकडून जेवण घेतले. त्यानंतर ते जवळच्या जंगलात पळून गेले. यासंबंधीची माहिती मिळताच लष्करी जवान आणि पोलिसांनी संपूर्ण परिसराला वेढा घालत बसंतगडच्या घनदाट जंगलात शोधमोहीम सुरू केली. याप्रसंगी ड्रोन आणि स्निफर डॉग देखील तैनात करण्यात आले आहेत. डोंगराळ प्रदेश आणि घनदाट जंगलामुळे कारवाईत अडथळा येत होता.
संशयित दहशतवाद्यांच्या उपस्थितीमुळे सुरक्षा दलाकडून घरोघरीही तपासणी सुरू होती. या मोहिमेसाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले होते. कोणताही संशयित पळून जाऊ नये म्हणून संभाव्य पळून जाण्याच्या मार्गांवर अनेक चौक्या उभारण्यात आल्या आहेत. स्थानिकांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही संशयास्पद हालचालींची त्वरित पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 10 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील बॉम्बस्फोटांपासून सुरक्षा दल जम्मू काश्मीरमध्ये शोधमोहीम राबवत आहेत. दहशतवाद्यांशी असलेले संबंध तपासले जात आहेत. पोलिसांनी शुक्रवारीही येथे बंदी घातलेली दहशतवादी संघटना जमात-ए-इस्लामीशी (जेईआय) संबंधित अनेक व्यक्तींच्या लपण्याच्या ठिकाणांवरही छापे सुरू ठेवले होते.