केरळच्या स्थानिक निवडणुकीत युडीएफची सरशी
राज्यात सत्ताविरोधी लाट असल्याचा दावा
वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम
केरळमध्ये 31 प्रभागांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था पोटनिवडणुकीत 16 जागांवर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने (युडीएफ) विजय मिळविला आहे. युडीएफने सत्तारुढ माकपकडूनही काही जागा ताब्यात घेतल्या आहेत. पोटनिवडणुकीत माकपच्या नेतृत्वाखालील एलडीएफने 11 प्रभाग तर भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआने दोन जागांवर यश मिळविले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे.
निवडणूक निकाल पाहता राज्यातील लोक सत्तारुढांच्या विरोधात असल्याचे स्पष्ट आहे. हा विजय 2025 मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी युडीएफला ऊर्जा देणार आहे. लोक वर्तमान सरकारला हटवू पाहत आहेत. डाव्यांचे सरकार भ्रष्टाचार अन् घराणेशाहीने वेढलेले असल्याचा दावा विधानसभेतील विरोधी पक्षेनेते आणि काँग्रेस नेते व्ही.डी. सतीशन यांनी केला आहे. युडीएफ स्वत:च्या जागांची हिस्सेदारी वाढविण्यास यशस्वी ठरला आहे. एलडीएफकडून आम्ही 9 जागा मिळविल्या आहेत असे सतीशन यांनी म्हटले आहे.