मुंबईच्या विजयात जैस्वालचे नाबाद शतक
हरियाणाचा चार गड्यांनी पराभव
वृत्तसंस्था/ अंबी (पुणे)
सय्यद मुस्ताक अली चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेतील रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या सुपर लीग ब गटातील सामन्यात यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईने हरियाणाचा चार गड्यांनी पराभव केला. जैस्वालने या सामन्यात 48 चेंडूत शतक झळकाविले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हरियाणाने 20 षटकात 3 बाद 234 धावा जमविल्या. त्यानंतर मुंबईने 20 षटकात 6 बाद 238 धावा जमवित सामना जिंकला. हरियाणाच्या डावामध्ये कर्णधार अंकित कुमारने 42 चेंडूत 89 धावांची खेळी केली. अष्टपैलू निशांत सिंधूने 38 चेंडूत नाबाद 63 धावा झोडपल्या. अंकित कुमार आणि निशांत सिंधू यांनी 8.1 षटकात 110 धावांची शतकी भागिदारी केली. मुंबईतर्फे साईराज पाटीलने 44 धावांत 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना अनुभवी अजिंक्य रहाणेने 10 चेंडूत 21 धावा जमविल्या. जैस्वालने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. त्याने हरियाणाच्या अनशुल कंबोज व इशांत भारद्वाज यांच्या गोलंदाजीवर चौकार आणि षटकार ठोकले. कंबोजने आपल्या 4 षटकात 63 धावा देताना 1 गडी बाद केला. तर भारद्वाजने 3 षटकात 56 धावांत 1 गडी बाद केला. जैस्वालने पूलचे फटके अप्रतिम मारले. जैस्वालने 50 चेंडूत 16 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 101 धावा झळकाविल्या. सर्फराज खानने 24 चेंडूत 64 धावा जमविल्या. त्याने अर्धशतक केवळ 16 चेंडूत पूर्ण केले. न्यूझीलंड विरुद्धच्या आगामी होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी जैस्वालच्या शतकाने पुन्हा प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवारच्या सामन्यात जैस्वालला सामनावीराचा पुरस्कार (50 हजार रु.) देण्यात आला. बक्षीस वितरण समारंभावेळी जैस्वालने हा पुरस्कार स्वीकारताना सर्फराज खानलाही आपल्या समवेत राहण्याची विनंती केली.
संक्षिप्त धावफलक - हरियाणा 20 षटकात 3 बाद 234 (अंकित कुमार 89, निशांत सिंधू नाबाद 63, साईराज पाटील 2-44), मुंबई 20 षटकात 6 बाद 238 (यशस्वी जैस्वाल नाबाद 101, सर्फराज खान 64, अनशुल कंबोज 1-63, ईशांत भारद्वाज 1-56).