For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धवगीता

06:30 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
उद्धवगीता
Advertisement

अध्याय एकतिसावा

Advertisement

नाथमहाराज म्हणाले, ही पावन कृष्णकीर्ती जे वाचक वाचतील ते उद्धरून जातील. एव्हढेच नव्हे तर अन्य कुणी वाचत असताना त्याचे श्रवण करतील तर तेही भवसिंधु तरुन जातील. कलियुगात माणसे मंदमती असल्याने त्यांना भवसागर तरुन जायला श्रीकृष्णकीर्तीचे पठण व श्रवण करणे हा फारच सुगम उपाय आहे. ही अतिपावन असलेली श्रीकृष्णकीर्ती भागवतात जागोजागी वर्णन केली आहे, त्यातही भागवताच्या दहाव्या खंडात अतिगोड अशी श्रीकृष्णकीर्ती श्रीकृष्णाच्या जन्मदिवसापासून चढत्यावाढत्या श्रेणीने वर्णन केली आहे. नर-नटाचा वेष घेऊन हृषीकेश पृथ्वीवर अवतरले आणि त्यांनी नानाचरित्रविलासाचा दिवसेंदिवस विस्तार करायला सुरुवात केली. त्यातही त्यांचे लहानपणीचे बाळचरित्र मधुर, सुंदर आणि अतिपवित्र आहे. युवावस्थेत त्यांनी जरासंधाचा पराभव होईल अशी व्यवस्था केली नंतर कालयवनाचे निर्दलन केले. रुक्मिणीचे श्रीकृष्णावर प्रेम होते. तिने त्याला मला घेऊन जायला या म्हणून पत्र पाठवले. त्यानुसार श्रीकृष्णाने तिच्या गावी येऊन तिचे हरण केले. तिला घेऊन द्वारकेला जात असताना रुक्मिणीचा भाऊ रुक्मी मोठ्या आवेशात येऊन श्रीकृष्णाचा पाठलाग करत होता. त्या रुक्मीचे श्रीकृष्णाने रणात पारिपत्य केले. रुक्मीने रुक्मिणीचा विवाह शिशुपालाशी करायचे ठरवले होते. तोही रुक्मिच्या मदतीला धावून आला. त्याला श्रीकृष्णाने सळो की पळो करून सोडले. अशा पद्धतीने श्रीकृष्णाने केलेले रुक्मिणीचे हरण ही एक परम पावन हरिलीला होय. नंतर भौमासुराचे निर्दलन करून पट्टमहीशीला वरणे, स्वर्गातून पारिजात पृथ्वीवर आणणे, सोळा सहस्त्र कन्यांना नरकासुराच्या तावडीतून सोडवणे आणि नंतर त्यांचे पाणीग्रहण करणे, समुद्र हटवून द्वारका नगरी वसवणे, कुणाचीही झोप न चाळवता मथुरावासियांना रातोरात द्वारकेत आणणे हे सर्व प्रसंग म्हणजे कृष्णाची अभिनव कीर्ती होय. अत्यंत प्रेमाने गायीवासरांचे रूप घेऊन श्रीकृष्णाने त्याचे पूर्णपण दाखवले ते पाहून ब्रह्मादिकसुद्धा चकित झाले. रात्री उशिरा वनवासात असलेल्या पांडवांच्याकडे भोजन मागणाऱ्या दुर्वास मुनींना केवळ एक भाजीचे पान खाऊन तृप्ततेची ढेकर द्यायला लावणे इत्यादि प्रसंगातून श्रीकृष्णाचे ज्ञानप्राधान्य परम पावन चरित्र पहायला मिळते. श्रीकृष्णाच्या लीला परम अद्भुत असून त्या वाचणाऱ्याला त्या परमपावन करतात. भागवत महापुराणाच्या दहाव्या स्कंधात त्या सविस्तर सांगितल्या आहेत.

सध्या आपण वाचत असलेल्या एकादश स्कंधाचे वैशिष्ट्या म्हणजे श्रीकृष्णांनी स्वत: परम प्राप्ती होण्यासाठी ज्ञान-वैराग्य-भक्ती-मुक्ती ह्याबद्दल विवेचन केलेले आहे. ह्या ग्रंथाची अवतरणिका म्हणजे गोषवारा आता नाथमहाराज देत आहेत. पहिल्या पाच अध्यायात वैराग्य पूर्ण असे मुख्य अधिकाराचे लक्षण नारद वसुदेव संवादातून सांगितले आहे. नंतर निमि आणि जयंत ह्यांच्या संवादातून निर्भय कसा असतो, उत्तम भागवत कोण, मायातरण कर्म ब्रह्म कसे असते, इत्यादि विदेहाचे नऊ प्रश्न आणि त्यांची उत्तरे सांगितली आहेत. पाचव्या अध्यायाच्या शेवटी देवांनी श्रीकृष्णाची प्रार्थना केली की, आता अवतारसमाप्ती करून निजधामाला या. त्यावर माजलेल्या यादवांचा नि:पात करून मी निजधामाला येतो असे श्रीकृष्णांनी देवांना सांगितले. ते ऐकल्यावर मलाही तुमच्याबरोबर निजधामाला घेऊन चला असा उद्धवाने त्यांच्याकडे हट्ट धरला. त्यावर त्याला अर्जुनाप्रमाणे सविस्तर उपदेश करण्याचे श्रीकृष्णांनी ठरवले. तो संपूर्ण कथाभाग येथून पुढील अध्यायात आपल्याला वाचायला मिळतो म्हणून भागवत महापुराणातल्या ह्या एकादश स्कंधाला उद्धवगीता असेही म्हणतात.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :

.