For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्धवा मी केलेले विवेचन तुला समजले की नाही?

06:04 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
उद्धवा मी केलेले विवेचन तुला समजले की नाही
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंतांनी आपला उद्धार केला असून आपले जीवन कृतार्थ झाल्याचे उद्धवाच्या लक्षात आले. भगवंतांच्या उपकाराची अंशत: का होईना परतफेड करावी ह्या उद्देशाने त्याने त्यांना देण्यासाठी अनेक भेटवस्तूंचा विचार केला पण पूर्णकाम असलेल्या भगवंतांना कोणती वस्तू दिली म्हणजे ती त्यांना आवडेल हे त्याच्या लक्षात येईना. मुळातच भगवंत निरिच्छ असल्याने त्यांना आपण दिलेल्या मायिक आणि म्हणून नष्ट होणाऱ्या वस्तूंचे काय अप्रूप असणार हे लक्षात येऊन तो खिन्न झाला. अगदी काया, वाचा, मन, धन हे सगळं जीवप्राणासह सद्गुरूंना अर्पण केले तरी त्यांच्या उपकारांची परतफेड होणार नाही हे उद्धवाने ओळखले. विचार करून करून तो अगदी थकून गेला. ज्याच्यामुळे औषधालासुद्धा दु:ख शिल्लक रहात नाही असे निजसुख ज्यांनी दिले त्यांचे उपकार मी आता कसे फेडू ह्याविचारांनी गोंधळून गेलेल्या उद्धवाने काहीही न बोलता भगवंतांना साष्टांग नमस्कार घातला आणि भगवंतांच्या चरणावर अतीव कृतज्ञतेने डोके टेकवले. भगवंतांनी त्याला उठवले व आत्यंतिक प्रेमाने जवळ बसवून अतिशय गोड आवाजात विचारले, उद्धवा, मी निजधामाला जाणार म्हणून कळल्यावर माझ्या वियोगाच्या कल्पनेने तुला अत्यंत दु:ख झाले होते. माझ्या सहवासाचा तुला अत्यंत मोह जडला असल्याने माझा विरह सहन होण्यासारखा नव्हता म्हणून मलाही तुमच्याबरोबर निजधामाला घेऊन चला असा लकडा माझ्यामागे लाऊन तू माझ्या पायाला मिठी घालून ओक्साबोक्शी रडला होतास. तुझं हट्ट कसा अनाठायी आहे हे तुझ्या लक्षात येण्यासाठी तू, मी व समोर दिसणारे सर्वजण कधी ना कधी नष्ट होणारे आहेत. त्यामुळे त्यांच्या वियोगाचे दु:ख करण्यात अर्थ नाही हे मी तुला आत्मतत्वाच्या आत्तापर्यंत केलेल्या विवेचनातून समजावून सांगितले. त्यामुळे मी निजधामाला जाणार ह्या कल्पनेने तुला झालेले दु:ख आणि माझ्या सहवासाचा मोह ह्या दोन्ही गोष्टी कमी झाल्या की नाही ते सांग. भगवंतांचा प्रश्न ऐकून उद्धव चकित झाला कारण एखाद्याला परोपरीने समजावून सांगणे म्हणजे काय ह्याचा जणू वस्तुपाठच घालून द्यावा अशा पद्धतीने भगवंतांनी संपूर्ण निरुपण केले होते. तसेच उद्धवाची कोणतीही शंका अनुत्तरीत राहू नये ह्याचीही दक्षता घेतली होती आणि तरीही ते उद्धवाला त्यांनी केलेले विवेचन समजले की नाही हे अत्यंत प्रेमाने विचारत होते. त्यातूनही मनात काही शंका असेल तर विचार असेही म्हणत होते. भगवंतानी केलेली विचारपूस पाहून त्यांना आपल्याबद्दल किती प्रेम वाटत आहे हे लक्षात घेऊन त्यांच्याबद्दल त्याला वाटणारा आदर कैकपटीने वाढला. श्रीचरणांना वंदन करून दोन्ही हात जोडून तो उभा राहिला. त्याला गहिवरून आले. स्वत:ला सावरून भगवंतांच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे म्हणून तो भगवंतांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. भगवंतांचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे तेजस्वी दिसत होता. ज्याप्रमाणे चंद्रकिरणांचे सेवन करून चकोर तृप्तीची ढेकर देतो त्याप्रमाणे भगवंतांचे मुखकमल पाहून उद्धव अतिशय समाधान पावला. भगवंतांच्या प्रश्नाचे उत्तर आता त्याला द्यायचे होते. सकलदेवचूडामणी, यादवात अग्रगणी, अज्ञानाचा नाश करणारा, ब्रह्मवेत्त्यात शिरोमणी अशा श्रीकृष्णाशी तो स्वानंदाच्या भरात उस्फूर्ततेने बोलू लागला. अत्यंत आनंदाने तो श्रीहरिची स्तुती करू लागला. तो म्हणाला, सर्वांचा आद्यप्रणेता ब्रह्मा ज्या नारायणाच्या नाभीतील कमळापासून निर्माण झाला तो तू कमळनाभि नारायण, मायेसह वर्तमान ब्रह्मतत्वाचा जाणता आहेस. मी अविद्येच्या महारात्रीत अडकलो होतो, मोहाच्या अंधाराने ग्रासलो होतो. मला तेथून बाहेर काढण्यासाठी कुणीही समर्थ नव्हते पण तुझ्या सुर्यासारख्या तेजस्वी वचनांनी माझ्या शोक, मोह आणि अज्ञानाच्या अंधाराचा नाश झाला. खरोखरच हा चमत्कार आहे आणि तो केवळ तुझ्यामुळेच घडला.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.