महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्धवा, भक्तांच्या कलाकलाने घेत मी त्यांचा उद्धार करतो

06:20 AM Nov 09, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंतानी उद्धवाला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला त्यामुळे त्याचे धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ सिद्ध झाले. म्हणून भगवंतानी उद्धवाला प्रेमाने आलिंगन दिले. त्यामुळे दोघेही एकमेकात विरघळून गेले. भगवंत परिपूर्ण होतेच. उद्धवही आता परिपूर्ण होऊन त्यांच्या रांकेत जाऊन बसला. उद्धवाला निजपद प्राप्त झाले. उद्धवाच्या हातून पुढे लोकोत्तर कार्य होणार असल्यामुळे तो आत्ताच निजपदी विराजमान होऊन चालणार नव्हते. म्हणून सर्वज्ञ असलेल्या श्रीकृष्णांनी उद्धवाला घातलेली मिठी सैल केली आणि उद्धवाला त्याचे उद्धवपण पुन्हा बहाल केले. उद्धव भानावर आला आणि आपण ब्रह्मस्वरूप झालो होतो हा मोठाच चमत्कार झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला बसलेल्या धक्यातून सावरल्यावर उद्धवाने भगवंताना विचारले, देवा, ही आत्मवस्तू अशी स्वत:जवळच असली तरी, ती आपल्यापाशीच आहे हे लोकांच्या लक्षात येत नसल्याने ती त्यांच्या हाताला लागत नाही. ती त्यांना सहजी कशी प्राप्त होईल ह्याबद्दल कृपया काही सांगा. त्यावर भगवंत म्हणाले, उद्धवा, जी मंडळी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्तीसाठी, इतर सर्व उपाय सोडून, मला अनन्यभावाने शरण येतील त्यांना, तुला प्राप्त झालेली ही आत्मस्वरूपस्थिती किंवा निजात्मवस्तू तत्काळ प्राप्त होईल. त्यातही माझ्या भजनाला लागल्यावर त्यांची काही वासना शिल्लक राहिली असेल तर तीही पुरवून, मग त्यांना मी माझ्या सदनी माझ्या बरोबर राहण्यासाठी घेऊन येईन. आणखीन काय पाहिजे सांग? एकदा जो कुणी माझ्या भजनी लागतो त्यांची सर्व काळजी मी वाहतो. पण त्यासाठी माझ्या वचनावर त्याचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. कित्येकवेळा अभक्त मंडळी त्यांचा बुद्धिभेद करायचा प्रयत्न करतात त्यावेळी त्यांनी घट्टपणे पाय रोवून माझ्या भजनाला वाहून घेतले पाहिजे म्हणजे त्यांचे मनोरथ मी पूर्ण करीन असा माझा शब्द आहे. त्यासाठी मी त्यांना कसकशी मदत करतो, मार्गदर्शन करतो ते तुला सांगतो. प्रारब्धानुसार प्रत्येक भक्ताला नियतीने स्वधर्म म्हणजे विशिष्ठ कर्म नेमलेलं असतं पण ते करत असताना जे माझ्या भजन पंथाला लागतील त्यांच्या कर्मातून अकर्म निर्माण होणार नाही असा बोध मी त्यांना करतो. बऱ्याचवेळा कर्मातून अकर्म निर्माण होऊन विनाकारण कर्माचा पसारा वाढत जातो पण माझ्या बोधामुळे त्यातून त्यांची मुक्तता होते. कर्मातून अकर्म निर्माण होण्याचे प्रमुख कारण म्हणजे कर्म करत असताना ठराविक पद्धतीने कर्म करण्याचे सोडून, लोक स्वत:चे डोके वापरून भलत्याच पद्धतीने कर्म करायला जातात आणि त्यातच घुटमळतात. ते कर्म करण्यातच त्यांचा बराचसा वेळ निघून जातो पण मी केलेल्या बोधाने त्यांच्या वाटणीला आलेले काम ते योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत पूर्ण करतात. त्यामुळे माझे भजन करण्याला त्यांना पुरेसा वेळ मिळतो. माझ्या सर्वच भक्तांना तुम्ही निरिच्छ व्हा म्हणून मी सांगत असतो तरी त्यांच्या स्वभावानुसार त्यांना लगेच निरिच्छ होणे जमतंच असं नाही. त्यांची ही अडचण ओळखून त्यांना काही भोग भोगण्याची इच्छा झाली तर ती मी पूर्ण करत असताना त्यात गुंतून कसं पडायचं नाही हे मी त्यांना सांगतो. त्यामुळे त्या भोगातून आणखीन भोग भोगायची इच्छा त्यांच्या मनात येत नाही. पृथ्वीवर कितीही धन कमावले तरी ते शेवटी आपल्या बरोबर येत नाही हे भक्तांना माहित असतं, तरीही त्यातील काही जणांना आपल्याला अपार अर्थसंपन्नता लाभावी असे वाटत असते. अर्थात त्यासाठी आवश्यक ते भांडवल त्यांच्यापाशी नसते. अशावेळी माझे सर्व ऐश्वर्य मी त्यांच्या ओट्यात घालतो. ह्यामागे माझा उद्देश एकच असतो की, अपार धनसंपदा जरी मिळाली तरी पुरुषार्थ सिद्धीसाठी त्याचा काहीही उपयोग नसतो हे त्यांच्या लक्षात यावे.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article