महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्धवा, माझ्या भक्ताला चारही मुक्ती शरण येतात

06:30 AM Nov 10, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंतांनी उद्धवाला मिठी मारल्याक्षणी उद्धव ब्रह्मस्वरूप झाला. भगवंतांनी मिठी सैल केल्यावर तो भानावर आला. आपल्याप्रमाणे इतरांनाही ब्रह्मस्वरूप होण्याचा अनुभव मिळाला पाहिजे असे त्याला वाटले. म्हणून उद्धवाने भगवंतांना विचारले, देवा, ही आत्मवस्तू स्वत:जवळच असली तरी, ती आपल्यापाशीच आहे हे लोकांच्या लक्षात येत नसल्याने ती त्यांच्या हाताला लागत नाही. ती त्यांना सहजी कशी प्राप्त होईल ह्याबद्दल कृपया काही सांगा. त्यावर भगवंत म्हणाले, उद्धवा, जी मंडळी धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्तीसाठी, इतर सर्व उपाय सोडून, मला अनन्यभावाने शरण येतील त्यांना, आत्मस्वरूपस्थिती किंवा निजात्मवस्तू तत्काळ प्राप्त होईल. त्यातही माझ्या भजनाला लागल्यावर त्यांची काही वासना शिल्लक राहिली असेल तर तीही पुरवून, मग त्यांना मी माझ्या सदनी माझ्याबरोबर राहण्यासाठी घेऊन येईन. एकदा जो कुणी माझ्या भजनी लागतो त्यांची सर्व काळजी मी वाहतो. पण त्यासाठी माझ्या वचनावर त्याचा पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. त्यांनी घट्टपणे पाय रोवून माझ्या भजनाला वाहून घेतले की, त्यांचे मनोरथ मी पूर्ण करीन. त्यासाठी मी त्यांना आवश्यक ती मदत करतो, मार्गदर्शन करतो. ह्यापाठीमागे माझा उद्देश असा असतो की, एकदा माझ्या भक्ताने मला आपले मानले की, मीही त्याला आपला मानतो. त्याचा उद्धार होण्याच्या दृष्टीने माझ्या हालचाली सुरु होतात. माझा भक्त, कोणत्या पातळीवर उभा आहे हे मला माहितच असते. त्या पातळीवरून तो उच्च पातळीवर यावा ह्यासाठी मी त्याला प्रोत्साहन देतो. त्याच्या आवडीच्या भौतिक गोष्टी त्याला मिळाव्यात अशी व्यवस्था करतो. ज्याप्रमाणे निरनिराळे प्रयोग करण्यासाठी धडपडणारा वैद्य प्रत्येक रोग्याची काय खाण्याची इच्छा आहे हे जाणून घेऊन त्यांना जे खायला हवे आहे ते देऊन त्यातून त्यांच्यावर आवश्यक ते रसप्रयोग करून त्यांना वाचवतो त्याप्रमाणे माझ्या भक्तांच्या ज्या ज्या धर्मार्थकामवासना असतील त्या जाणून मी पूर्ण करतो. भौतिक गोष्टीतील आनंद तात्पुरता असतो हे हळूहळू मी त्याच्या लक्षात आणून देतो. हे पटले की, तो पूर्णपणे माझ्या भक्तीत रमून जातो. असे करत करत मी त्याचा उद्धार होण्यासाठी त्याची आवश्यक ती चित्तशुद्धी होईल ह्याची दक्षता घेतो. थोडक्यात भक्ताने एकदा शरण आल्यावर स्वस्थ राहून मी प्रेरणा देईन तशी साधना करावी म्हणजे माझ्याकडून उद्धार करून घेणे हा त्याचा हक्क बनतो आणि त्याला न्याय देण्याच्या दृष्टीने त्याचा उद्धार कसा होईल ह्याची सर्व जबाबदारी माझ्यावर येऊन पडते आणि मी ती आनंदाने पार पाडतो. त्यांच्या कलाकलाने घेऊन त्यांना माझ्या सदनी घेऊन येतो. त्यामुळे त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त होते. माझा वास सर्वांच्यात असल्याने, ज्याची चित्तशुद्धी झालेली आहे त्या भक्ताला समोर दिसणाऱ्या सर्व भूतात माझे दर्शन होते. त्यामुळे अत्यंत प्रीतीने तो त्यांच्याबरोबर व्यवहार करतो. असे केल्याने त्याला उद्धवा चारही मुक्ती शरण येतात. सर्वत्र समदृष्टी ठेवणारे माझे भक्त आध्यात्मिक दृष्ट्या एव्हढ्या उच्च पातळीवर पोहोचलेले असतात की, त्यांना मुक्ती मिळवण्यासाठी वेगळी अशी कोणतीही खटपट करावी लागत नाही. लोक स्वत:च्या डोक्याने किंवा कुणीतरी सांगितली आहे म्हणून काही साधना, व्रतवैकल्ये करत असतात आणि आपण साधना, उपासना करतोय हे काहीतरी विशेष करतोय असे समजून त्याचा त्यांना विलक्षण अभिमान वाटत असतो. आपला उद्धार व्हावा म्हणून जे मला अनन्य शरण येतील त्यांनी मात्र एक पथ्य म्हणून आजपर्यंत करत आलेल्या साधनेचा, उपासनेचा अभिमान सोडला पाहिजे. असे जे करतील त्यांना स्वरूपाची प्राप्ती करून द्यायचं काम माझ्याकडे लागलं म्हणून समज आणि मी ते निश्चितपणे पार पडतो. उद्धवा हा माझा शब्द आहे.

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article