For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला उद्धव तयार झाला

06:30 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करायला उद्धव तयार झाला
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

सद्गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन कधीही न करणे हा सद्गुरू भक्तीचा महत्त्वाचा नियम असला तरी उद्धवाला श्रीकृष्णावर प्रेम करायची अतिशय आवड असल्याने, सगळ्यात प्रिय असलेल्या भगवंतांचा त्याग करून, द्वारका सोडून तो बद्रिकाश्रमात जायला सहजासहजी तयार होत नव्हता. एकीकडे श्रीकृष्णावरील प्रेमापोटी त्याच्या सहवासाची अत्यंत आवड तर दुसरीकडे सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन असा दुहेरी पेचात उद्धव सापडला होता. उद्धवाचे विचारचक्र सुरु होते. सद्गुरू आज्ञा म्हणून श्रीकृष्णाचा त्याग करून बद्रिकाश्रमात जावे तर मी तेथे गेल्यावर हा निजधामाला जाईल. त्यामुळे मला पुन्हा ह्याचे दर्शन होणार नाही, ह्याविचाराने उद्धवाची अवस्था अनावर झाली. त्याला अत्यंत प्रिय असलेले श्रीकृष्णाचे रूप त्याच्या डोळ्यासमोर उभे राहिले. निळ्यासावळ्या घनदाट ढगाप्रमाणे रंग, कमळासारखे डोळे असलेला परिपूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण त्याच्या मनात घर करून राहिला होता. डोक्यावर मुकुट, कानात कुंडले, कमरेला मेखला, कपाळावर पिवळा तिलक, गळ्यात एका पदकाची माळ आणि कौस्तुभ मण्याची माळ, दंडात वाकी, पायात गजर करणारे तोडर, विजेप्रमाणे सळसळत असणारा पीतांबर अशा सगळ्या गोष्टी शारंगधराला शोभुन होत्या. गळ्यात पायापर्यंत रुळणाऱ्या वनमाळा घातलेला घवघवीत घनसांवळा श्रीकृष्ण बघितला की उद्धवाच्या डोळ्याचे पारणे फिटत असे आणि मन निवत असे. असे श्रीकृष्णदर्शन ह्यापुढे आपण घेऊ शकणार नाही ह्या कल्पनेने उद्धव संपूर्णपणे प्रेमव्हीवळ झाला होता. खरं तर उद्धवाला पूर्ण ब्रह्म प्राप्त झाले होते. त्यामुळे त्याला सगुण रूपाचे काय कौतुक असणार पण सगुण रूपातील श्रीकृष्णाच्या प्रभेचा प्रकाश एव्हढा तेजस्वी होता की, त्या तेजात चिद्घन आत्मवस्तु संपूर्णपणे दिसत असे. तूप जरी थिजलेले असले किंवा पातळ असले तरी त्याचे तूपपण लोप पावत नसते. त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या सगुण रुपात आणि ईश्वराच्या निर्गुण रुपात काहीच फरक नव्हता. श्रीकृष्णात सगुण आणि निर्गुण दोन्ही प्रकार विसावले होते. भगवंतांच्या सगुण रूपापेक्षा ईश्वराचे निर्गुण रूप श्रेष्ठ आहे म्हणून सगुण रूप त्याज्य असून निर्गुण रूप पूज्य आहे असा विचार पंडित लोक मांडतात पण जी संत मंडळी असतात त्यांना निर्गुण रूपाची काहीच किंमत वाटत नसते. त्यामुळे त्याला ते गवताच्या काडीसमान किंवा पाषाणासारखे लेखतात. उद्धव त्याच विचारांचा होता. त्याला निर्गुण रूपाचे महत्त्व पटले होते परंतु भगवंतांचे सगुण रूपही त्याला तितकेच महत्त्वाचे वाटत होते. आता तीच भगवंतांची सगुण मूर्ती नजरेसमोरून नाहीशी होणार ह्या कल्पनेने तो दु:खी झालेला होता. सद्गुरूंच्या आज्ञेचे उल्लंघन करायचे नाही ह्या एकाच विचाराने अत्यंत नाईलाजाने उद्धवाने द्वारकेतून निघायचे ठरवले. निघताना त्याने भगवंतांच्या पायावर स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या चरणांना मिठी मारून ते हृदयाशी धरले. आता हे चरण पुन्हा दिसणार नाहीत ह्या कल्पनेने त्या चरणांना सोडून त्याला तेथून निघवेना. तो मनात म्हणाला, खरी शांती कृष्णचरणामृती मिळत असल्याने मला त्या बद्रिकाश्रम नावाच्या महातीर्थाचे काहीच महत्त्व वाटत नाही. उलट ते तीर्थ माझ्यासाठी श्रीपतीचा त्याग घडवून आणत आहे. भगवंतांविषयीच्या अत्यंत प्रेमाने आणि त्यांच्या त्यागाच्या कल्पनेने तो चळचळा कापू लागला. त्याचा गळा दाटून आला. अंगभर घाम फुटून शरीर रोमांचित झाले. भगवंतांच्या पाया पडून उद्धव जायला निघत असे पण पुन्हा भगवंतांच्या प्रेमाचा उमाळा दाटून येऊन पुन्हा परत येऊन हरीचे चरण पकडत असे. त्याचे चित्त हरीच्याठायी गुंतले असल्याने हरीला नमस्कार करून निघणे पुन्हा परत येऊन लोटांगण घालणे असे वारंवार घडू लागले.

क्रमश:

Advertisement

Advertisement
Tags :

.