महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उद्धवाला भगवंतानी ठेवणीतली देणगी दिली

06:35 AM Dec 06, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतिसावा

Advertisement

भगवंताकडून मुक्तीनंतरही भक्ती करण्याचे वरदान मिळाल्यामुळे उद्धवाची थोर ख्याती झाली. भगवंत म्हणाले, उद्धवा, जे मुक्तीनंतरही माझी भक्ती करत असतात त्यांना माझ्या अवतारातल्या शक्तींच्या कितीतरी पट शक्ती प्राप्त होते. आता अवतारात माझी शक्ती केव्हढी असते हे मी तुला वेगळे सांगायला नको. उत्पत्ति-स्थिति-प्रलय हे सर्व घडवून मी आणतो परंतु त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त असतो. म्हणून कर्मे करून मी अकर्ता किंवा भोग भोगून अभोक्ता असतो हे लक्षात घे. हे कर्मात किंवा भोगात न गुंतणे  मला माझ्या अवतारातील शक्तीमुळेच शक्य होते. माझ्यापाशी ही शक्ती असल्याने मला संसार सुखरूप वाटतो. खरं म्हणजे मुक्तीनंतर भक्ती करण्याची इच्छा उद्धवाने भक्तीपोटी मागितली होती परंतु त्यामागे एव्हढी शक्ती दडली असेल ह्याची त्याला कल्पनाही नव्हती. मोठ्या प्रेमाने उद्धवाला श्रीकृष्णानी अवतारस्थिती प्राप्त करून द्यायचे ठरवले. भगवंतानी उद्धवाला अवतारस्थिती कुणाचेही न ऐकता द्यायचीच असे ठरवले होते. त्यामुळे ही गोष्ट ब्रह्मवेत्त्यांनाही कळली नाही की, वेदांची रचना करणाऱ्यांच्याही लक्षात आली नाही.  ज्याप्रमाणे शिष्याला सर्व ज्ञान जरी दिले तरी सद्गुरुंकडे ठेवणीतले म्हणून काही ज्ञान असते आणि ते त्यांच्या मर्जीनुसार त्याचा वापर करतात. त्याप्रमाणे वेद हे जरी देवांचे मनोगत असले तरी त्यात देवांच्या मनातले सर्वकाही आले असेलच असे नाही. उद्धवाला भगवंतानी दिलेली अवतारस्थिती ही त्यांची खास ठेवणीतली देणगी होती त्यामुळे वेदात त्याचा उल्लेख झाला नाही किंवा ब्रह्मज्ञान झालेल्या ब्रह्मवेत्याना परमात्मा पूर्णपणे कळला असे होत नसल्याने उद्धवाला दिलेली ठेवणीतली देणगी ब्रह्मवेत्त्याना कळण्याच्या पलीकडली होती. उद्धवावर असलेल्या भगवंताच्या कृपेच्या बळावर ही देणगी त्याला मिळाली होती. पूर्वी देव आणि उद्धव एकरूप झाल्यावर आता माझा उद्धार झाला असे उद्धव म्हणाला होता. आता त्याही पुढे जाऊन देवांनी त्याला गुरुभजन करण्याची संधी प्राप्त करून दिल्यावर ही केव्हढी मोठी संधी आहे आणि त्यातलं गूढ काय आहे ते केवळ भगवंतानाच माहित होतं. उद्धवाने मुक्तीनंतरची भक्ती मागितली आणि भगवंतानी त्याला ती दिल्याबरोबर श्रीकृष्णाच्या अवतारातली मायेचे नियंत्रण करण्याची शक्ती उद्धवाच्या हातात आपसूकच आली. जो मायेचे मिथ्यत्व पूर्णपणे जाणतो, तिला प्रेरणा देतो आणि तिला आवर घालतो त्याला मायेचे नियंत्रण करण्याची शक्ती प्राप्त होते. ही मायेचे नियंत्रण करणारी शक्ती उद्धवाला श्रीकृष्णांनी आपणहून दिली होती. अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने असे म्हणतात. त्याचाच प्रत्यय उद्धव घेत होता. त्याच्या निरपेक्ष भक्तीने त्याने देवांना अंकित करून घेतलेले असल्याने त्याने देवांनी दिलेली मुक्ती नाकारली आणि भक्ती करण्याची संधी द्या अशी मागणी केली. देवांनी ते मान्य केल्याबरोबर त्याला देवांच्या अवतार कार्यात ते वापरत असलेल्या शक्तीपेक्षा कितीतरी जास्त शक्ती प्राप्त झाली. भगवंत पुढे म्हणाले, उद्धवा, बुद्धिबळाच्या खेळात काहीही पूर्वपुण्याई नसताना राजा, प्रधान, शिपाई तयार होतात. बघायला गेलं तर सर्व सोंगट्या एकाच लाकडापासून तयार केलेल्या असतात. एकाच लाकडापासून तयार झालेल्या असल्याने कोण कुणाचे वैरी असणार? तरीही त्या निर्जीव सोंगट्या झुंजत असतात, मारामारी करत असतात. लोक म्हणतात, गेला गेला हत्ती गेला, घोडा, प्रधान मेले. खरं म्हणजे ह्यात कुणाचाही प्राण गेलेला नसतो. खेळात काहीवेळा शिपायाचा प्रधान होतो पण म्हणून काही त्याला गजांतलक्ष्मी मिळत नाही. त्यापैकी कुणाच्यातही जीव नसताना मेले मेले म्हणून गजर करतात. कुणी अत्यानंदाने मी जिंकलो मी जिंकलो असे म्हणतात, कुणी मी हरलो म्हणून शोक करतात. ह्यांना तू काय म्हणशील ?

Advertisement

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article