महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भक्तिमहात्म्य ऐकून उद्धव धन्य झाला

06:55 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय एकोणतीसावा

Advertisement

लोकांच्याबाबतीत मी एव्हढा कनवाळू असतो की, मरताना एखाद्याच्या तोंडी योगायोगाने किंवा चुकून जरी माझे नाव आले तर तो राजा आहे का रंक आहे हे पहात न बसता मी त्याचा उद्धार करतो. मी भक्तावर कृपा तर करतोच पण माझ्या कृपेमुळे भक्त एव्हढा सामर्थ्यवान होतो की, त्याने जर एखाद्याकडे नुसते बघितले तर तोही माझा अनन्य भक्त होतो. असा माझा सामर्थ्यशाली भक्ताची कधी अवगती होईल ही कल्पनाच मला सहन होण्यासारखी नाही. भक्तासाठी मी काय वाटेल ते करायला तयार असतो त्याची यादी सांगायचीच झाली तर तो भली मोठी होईल. हर प्रयत्नाने मी भक्तांचे रक्षण करण्यास सज्ज असताना माझ्या भक्ताला मी अधोगतीला जाऊन देईनच कसा? उद्धवा, एखाद्या गवताच्या पात्याने जरी माझी भक्ती केली तर त्या पात्यासारख्या शुल्लक गोष्टीचाही मी उद्धार करतो मग अत्यंत जिवाभावाने माझी भक्ती करणाऱ्या माझ्या भक्तांची अवगती होणारच नाही. काया, वाचा, मन आणि धन हे सर्व मला अर्पण करून जे मला अनन्यशरण येतात त्यांच्या योगक्षेमाची काळजी मी स्वत: घेत असतो. अशा पध्दतीने अनन्यभक्तीचा महिमा सांगताना भगवंतांचा उत्साह ओसंडून वहात होता. तो ऐकून भगवंतांच्याबद्दल वाटणाऱ्या प्रेमाने उद्धवाचा रोम रोम पुलकित झाला. भक्तीचे भगवंतांनी सांगितलेले महिमान ऐकून आणि उद्धवाच्या भगवंतांवरील प्रेमाचा पूर पाहून, परीक्षित राजाला भागवतातील हा प्रसंग सांगताना शुकमुनी सुखावले आणि स्वानंदाने डोलू लागले. शुकमुनींचे महात्म्य फार मोठे आहे. ज्ञानियांचा ज्ञाननिधी, निजबोधाचा सागर, आनंदाचा क्षीरसागर असं ज्यांचं वर्णन करता येईल असे शुकमुनी भगवंत व उद्धव यांचा संवाद ऐकून हरखून गेले. ते परीक्षित राजाला म्हणाले, राजा, हरिभक्त हा स्वर्ग, मृत्यू आणि पाताळ ह्या तिन्ही जगतात धन्य असून त्याला सर्वार्थाने मुक्ती मिळते असं श्रीहरींनी आत्ताच सांगितलं. मुनी पुढं म्हणाले, ज्याप्रमाणे भक्तीचे महिमान गहन आहे त्याप्रमाणेच भगवंतांवरील उद्धवाचे प्रेम गहन असल्याने त्याचा अंतपार लागणे अवघड आहे. भक्त आणि भगवंत ह्यांच्या एकमेकांवरील अलोट प्रेमाची ही कथा आहे. तुझे महाभाग्य म्हणून तुला भगवंतांची कथनी ऐकायचा योग आला त्याअर्थाने तुला श्रवणसौभाग्यचक्रवर्ती सम्राटच म्हणायला हवं. श्रीकृष्णांचे महात्म्य काय सांगावं, ज्यांना सुर नर असुर वंदन करतात, ज्यांची महासिद्धी स्तुती करतात, ज्यांचं महात्म्य वेद वर्णन करतात, योगिवृंद ज्यांच्या कीर्तीचे स्तवन करत असतात त्या श्रीकृष्णांनी भक्तीचे महात्म्य अत्यंत प्रेमाने सांगितले. ते म्हणाले, अनन्यभक्ति करण्यामध्ये जे सुख आहे ना, त्यापेक्षा कोणतेच सुख मोठे नाही. हे सर्व सारांचे सार असून सुरवरादिक सगळ्यांच्यासाठी माझी भक्ती करण्यासारखे अन्य कोणतेच मोठे साधन नाही. भक्तियोगाचा योगमार्ग समूळ सप्रेम आणि शुद्ध आहे. भगवंतांचे बोलणे उद्धवाने मन लावून ऐकले. ते ऐकताना

Advertisement

उद्धवाचे मन द्रवले. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. सर्व शरीर रोमांचित होऊन चित्त आनंदाने विभोर झाले. त्याचा गळा दाटून आला, सर्वांग घामाने भरून गेले, त्याचा प्राण तेथेच थबकला, डोळे चमकून अर्धोन्मीलित झाले, उत्सुकतेने तो स्वानंदी समरस झाला. देही असून विदेही अशी त्याची अवस्था झाली. तो त्याची देहावस्था जरी विसरला असला तरी प्रारब्धामुळे तो भानावर आला. ज्याप्रमाणे पाण्यात नाव जरी उलटली तरी तिला बांधलेल्या दोरामुळे तिला पुन्हा सावरता येते त्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलेल्या भक्तिमहात्म्याशी एकरूप झाल्याने उद्धवाचे उद्धवपण जरी मावळले असले तरी प्रारब्धाने अजून तशी परवानगी दिली नसल्याने तो पुन्हा भानावर आला. अत्यंत धैर्याने त्याने स्वत:ला सावरले व भगवंतांच्याबद्दल आलेले प्रेमाचे भरते आवरून धरले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article