उध्दव ठाकरेना मराठा आरक्षणही टिकवता आले नाही ? मंत्री चंद्रकांतदादा पाटील
शिरोळ येथे भाजपाचा मेळावा संपन्न
शिरोळ ता. 19
महाराष्ट्रात अनेक मुख्यमंत्री मराठा समाजाचे झाले. त्यांनी मराठा समाजाला कधीही आरक्षण दिलेले नाही. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा मराठा समाजाला आरक्षण देऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री काळात मराठा समाजाला दिलेले आरक्षण टिकवता आले नाही. तसेच मराठा समाजातील युवकांना न्याय देण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ या माध्यमातून दोन हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी वाटप करण्यात आले आहे. असे असताना विरोधकांनी देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही अशी दिशाभूल केली. यामुळे मराठा समाजाने या अपप्रचाराला बळी न पडता 400 चा नारा पार करण्यासाठी खा धैर्यशील माने यांनाच विजयी करावे असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले.
शिरोळ येथे समर्थ मंगल कार्यालयात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या कार्यकत्याचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मंत्री पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी गुरुदत्त शुगसचे चेअरमन माधवराव घाटगे होते.
यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, घटना बदलता येत नाही दुरुस्ती करता येते, काँग्रेसच्या काळात 106 वेळा घटनादुरुस्ती केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकहितासाठी एक वेळा घटनादुरुस्ती केली आहे. आणि दुसर्यांदा 370 कलम रद्द करण्यासाठी घटनादुरुस्ती केली असे असताना घटना बदलण्याचा जो अपप्रचार केला जात आहे तो पूर्णपणे चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, लोकसभेची निवडणूक सोपी आहे. पण गांभीर्याने घ्यावे लागेल. काँग्रेसच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 10 वर्षाच्या कार्यकाळात भ्रष्टाचाराचा एकही डाग लागलेला नाही असे सांगून महायुतीचे उमेदवार माने यांना विजयी करा असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे म्हणाले, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या माध्यामातून शिरोळ तालुक्याच्या विकासाठी सुमारे 75 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. महापुराचे पाणी मराठवाड्यात वळविण्यासाठी 3 हजार 200 कोटीचा निधी मंजूर झाला त्यांच्या कामाला लवकरच सुरवात होणार आहे. भाजपाने इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन दिले. साखरचे दर व कोटा ठरवून साखरेचा हमीभाव ठरूवून दिल्याने साखर उद्योग स्थिर असल्याचे त्यांनी सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसर्यांदा पंतप्रधान करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांना निवडून आणवे असे त्यांनी सांगितले.
लोकसभा उमेदवार धैर्यशील माने म्हणाले, कोविड नंतरच्या दोन वर्षाच्या कार्यकाळात आठ हजार कोटी रुपयांची विकास कामे केली आहेत. शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावात विकासासाठी निधी दिला आहे. माजी खासदार असणार्या शिरोळ शहरात विविध विकास कामासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला असून आम्ही प्रसिद्धीपासून दूर राहिलो अशी कबुली देत गट निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून सर्वाधिक मताधिक्य देऊन इतिहास घडवावा असे आवाहन माने यांनी केले.
प्रारंभी स्वागत भाजपा तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे यांनी तर प्रास्ताविक भाजपा कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांनी केले. यावेळी माजी आमदार सुरेश हळवणकर, हिंदुराव शेळके, दलितमित्र डॉ.अशोकराव माने, विजय भोजे, राहुल घाटगे,अन्वर जमादार, सदाशिव आंबी, डॉ.अरविंद माने, डॉ.नीता माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुष्पा पाटील, नूतन कुमारी, उदय डांगे, सोनाली मगदूम, सुरेश सासणे, भालचंद्र कागले, पोपट पुजारी, जयपाल माणगावे, मिश्रीलाल जाजू, सतिश मलमे, शिवाजीराव देशमुख, शिवाजीराव सांगले, सुनील माने, महेश देवताळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मिलिंद भिडे यांनी आभार मानले.